पटनइक, पद्मचरण : (१६ नोहेंबर १८८७ – ? १९५५). प्रसिद्ध ओडिया भावकवी. जन्म पुरी जिल्ह्यातील पंचगाव येथे. शिक्षण कलकत्ता विद्यापीठात बी.ए. बी.एल्.पर्यंत. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुरी येथे वकिली सुरू केली. पुरी येथील नगरपालिकेचे आयुक्त तसेच अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

पद्मचरणांची एकूण अकरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांतील बहुतेक काव्यसंग्रह आहेत. त्यांनी ओडिया काव्यात आपल्या रचनेने मौलिक वा विशेष प्रकारची भर घातली नाही हे जरी खरे असले, तरी त्यांची भावकविता समाजाच्या विविध स्तरांतील लोकांत अतिशय लोकप्रिय आहे. इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींच्या अनेक कविताही त्यांनी ओडियात अनुवादित केल्या. निसर्गातील सौंदर्य, ओरिसाचे लोक व इतिहास, दैनंदिन व्यवहारात पहिलेल्या विविध व्यक्ती व त्यांच्यातील सुखद संवाद यांचे चित्रण त्यांनी आपल्या कवितेत अतिशय संवेदनशीलतेने केले आहे. त्यांची ‘धौली पहाडा’ वरील (सम्राट अशोकाचे कलिंग-आज्ञापत्र) उद्देशिका (ओड), तर ओरिसातील सर्वच शाळांमध्ये प्रार्थनागीत म्हणून लोकप्रिय ठरली आहे.

गोलापगुच्छ (१९३२), आशामंजरी (१९४०), स्वर्णरेणु (१९४४) हे त्यांचे काव्यसंग्रह उल्लेखनीय होत. त्यांची समग्र कविता पद्मपाखुडा (१९३२) आणि सूर्यमुखी (१९४०) या नावाच्या दोन खंडांत उपलब्ध आहे. प्रबंध पारिजातक (१९४०) आणि पारिबारिक प्रबंध (१९५१) हे त्यांचे निबंधसंग्रह होत. हिंदु आचार बिचार (दोन भाग, १९५१, १९५३) हा त्यांचा वैचारिक स्वरूपाचा धर्म-तत्त्वज्ञानपर ग्रंथ असून फकीरमोहन सेनापति (१९२६) हे त्यांनी लिहिलेले चरित्र होय.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) कर्णे, निशा (म.)