महांति, कान्हुचरण : (११ ऑगस्ट १९०६- ). आधुनिक ओडिया कादंबरीकार व कथाकार. जन्म ओरिसात सोनेपूर (जि. बोलानगीर) ह्या गावी. पाटणा विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते ओरिसाच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून प्रविष्ट झाले आणि १९६४ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांचे वास्तव्य सध्या कटक येथे आहे. १९६४ मध्ये सेवानिवृत्त् झाले. त्यांचे वास्तव्य सध्या कटक येथे आहे. प्रख्यात ओडिया कादंबरीकार व लेखक  गोपीनाथ महांती हे कान्हुचरणांचे धाकटे बंधू होत. १९५८ मध्ये कान्हुचरणांना त्यांच्या का. (म. शी. ‘ती’) ह्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.

कान्हुचरणांनी विपुल कादंबरीलेखन केले. त्यांच्या आजवर सु. चाळीस कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी काही कविता (संग्रह−मानसी, १९३२) व अनेक कथाही (संग्रह-नामटितारा चंपा, १९५२) लिहिल्या आहेत तथापि ओडियात एक लोकप्रिय कादंबरीकार म्हणूनच त्यांची प्रतिमा ठळक आहे. त्यांच्या कादंबऱ्यांना बरीच लोकप्रियता लाभली असली, तरी कलात्मक दृष्ट्या त्यांची गुणवत्ता साधारण अशीच आहे.

कान्हुचरणांनी प्राचीन काळापासून तो आधुनिक काळापर्यंतच्या ओरिसाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर कादंबरीलेखन केले. अलीकडील त्यांच्या कादंबऱ्यांत समाजवादाचा सूर उमटू लागला आहे. सामाजिक समस्यांचेही चित्रण त्यांच्या काही कादंबऱ्यांत आढळते. त्यांच्या काही कादंबऱ्यांची नाट्यरुपांतरेही झाली असून ती रंगभूमीवरही लोकप्रिय ठरली आहेत. बलिराजा (१९३१), स्वप्न ना सत्य (१९३३), हा अन्न (१९३५), परकीया (१९३९), झडर शेष ओलट पालट (१९३९), अदेखा हात (१९४३), शास्ती (१९४६), अभिनेत्री (१९४७), झंजा (१९५०), सर्बरी (१९५०), परी (१९५४), का (१९५५), बज्जबाहु (१९५८) इ. त्यांच्या उल्लेखनीय व लोकप्रिय कादंबऱ्या होत. शास्ती (म. शी. ‘शिक्षा’) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी समजली जाते. तीत त्यांनी एका खेड्यातील मुलीची (सबी हिची) करूण प्रेमकाहणी रंगविली आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)