मशरूवाला, किशोरलाल घनःश्यामलाल : (५ ऑक्टोबर १८९०–९ सप्टेंबर १९५२). गांधीयुगातील एक महान चिंतक व तत्त्वज्ञ. जन्म मुंबई येथे. शालेय शिक्षण अकोला व मुंबई येथे. विल्सन कॉलेज मुंबई येथून त्यांनी पदवी घेतली (१९०९). १९१३ मध्ये गोमतीबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, ठक्करबाप्पा इ. थोर नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. किशोरलाल स्वामीनारायण पंथाचे अनुयायी होते. केदारनाथजी वा नाथजी हे महाराष्ट्रीयन संत मोठे विचारवंत होते. किशोरलाल यांनी त्यांना गुरुस्थानी मानले. लहानपणी एका गंभीर अपघातातून किशोरलाल बचावले. त्यांचे वडील इच्छाराम हे स्वामीनारायण पंथाचे निष्ठावंत अनुयायी होते. तेव्हा त्यांनी किशोरलाल यांना स्वामीनारायणचरणी वाहिले. त्यामुळे वडिलांच्या नावाऐवजी किशोरलाल यांनी स्वामीनारायण पंथाच्या संस्थापकांचे मूळ नाव-घनःश्यामलाल यांचे नाव लावण्यास सुरुवात केली. १९१७ मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या चंपारण्य-सत्याग्रहात सहभागी होण्याची त्यांची इच्छा होती तथापि त्यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने गांधीजींनी त्यांना साबरमती आश्रमात अध्यापक म्हणून काम करण्यास सांगितले. स्वकर्तृत्वावर तेथे ते १९२० मध्ये कुलसचिव पदापर्यंत चढले. १९३० च्या मीठाच्या सत्याग्रहात तसेच १९३२ मध्ये व १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. ‘गांधी सेवासंघा’चे ते अध्यक्ष होते (१९३४-४०). १९३७ साली झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘मूलभूत शिक्षण समिती’ वरही त्यांनी काम केले. प्रदीर्घ काळ गांधीजींचे निकटवर्ती सहकारी म्हणून त्यांना त्यांचा सहवास लाभला. काही काळ ते गांधीजींचे खाजगी चिटणीसही होते. गांधीजींच्या हत्येनंतर सु. साडेचार वर्षे त्यांनी हरिजनचे संपादकतपद मोठ्या कौशल्याने व समर्थपणे सांभाळले. सहजानंद स्वामी, महात्मा गांधी आणि गुरू केदारनाथजी यांचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव पडला. वर्धा येथे ते निधन पावले.
किशोरलाल यांना उपजतच अष्टपैलू प्रतिभा लाभली होती. त्यांचा व्यासंग दांडगा होता व त्यांनी विपुल लेखनही केले आहे. अनेक विषयांमध्ये त्यांना उत्तम गती होती. ते स्वतः स्वामीनारायण पंथाचे अनुयायी असल्यामुळे नैतिकतेबाबत ते विशेष आग्रही होते. गांधी-तत्त्वज्ञानाचेही ते मोठे अधिकारी भाष्यकार मानले जातात. त्यांनी विविध विषयांवर विपुल व दर्जेदार ग्रंथरचना केली. त्यातील उल्लेखनीय पुढीलप्रमाणे : चरित्र–बुद्ध अने महावीर (१९२३), ईशु क्रिस्त (१९२३), राम अने कृष्ण (१९२३), सहजानंद स्वामी (१९२३) शिक्षण–केळवणीना पाया (१९२५), केळवणी–विवेक (१९४९), केळवणी–विकास (१९५०) तत्त्वज्ञान–समाजशास्त्र–जीवन शोधन (१९२९), गीतामंथन (१९३३), सत्यमय जीवन अने सत्यासत्यविचार (१९३३), स्त्री–पुरुष संबंधमर्यादा (१९३७), समूळ क्रांति (१९४८), संसार अने धर्म (२ भाग १९४८) अनुवाद–विदाय वेळाए (१९३५, खलील जिब्रानच्या ॲट द पार्टिंग चा अनु.), भगवद्गीतेचा वृत्तबद्ध अनुवाद गीताध्वनि (१९३३) गांधीवाद–गांधी विचार दोहन (१४ खंडात १९३२), गांधीजी अने साम्यवाद (१९५१), अहिंसा विवेचन (१९५२) इंग्रजी-गांधी अँड मार्क्स (हरिजनमधून क्रमशः प्रसिद्ध, १९५१), अ व्हिजन ऑफ फ्यूचर इंडिया (१९५३).
गांधीजींप्रमाणेच पाश्चात्य स्वरूपातील औद्योगिकीकरणास त्यांचा विरोध होता. सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी सत्याग्रह हेच खरे साधन आहे, असा त्यांचा गांधीजींप्रमाणे विश्वास होता. भारताच्या राजकीय-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी बहुभाषी राज्ये, सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले प्रशासन आणि श्रमिकाभिमुख अर्थव्यवस्था हे उपाय होत, असे त्यांना वाटे. त्यांना समूळ क्रांती हवी होती. ही मूलभूत क्रांती (समूळी क्रांति) घडून येण्यासाठी ते शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन मानत. त्यांच्या सर्वच शिक्षणविषयक ग्रंथांतून सदाचारसंपन्न समाजरचनेसाठी सदाचारसंपन्न माणूस घडवला पाहिजे स्वयंसेवा, अहिंसा आणि समता हे शिक्षणाचे व सदाचारसंपन्न माणूस घडविण्याचे तीन आधारस्तंभ होत, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथांच्या नायकांचे (राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, ख्रिस्त इ. ) अतिमानवी वा दैवी स्वरूप तसेच त्यांच्या जीवनातील चमत्कार त्यांना मान्य नव्हते केवळ कर्तृत्ववान मानवी व्यक्ती म्हणूनच ते त्यांच्या चरित्राची बुद्धिवादी चिकित्सा करतात. त्यांच्या चरित्रातील त्रुटीही ते निर्भयपणे दाखवून देतात. त्यांचा निखळ बुद्धिवादी दृष्टिकोन व तर्कशुद्ध विश्लेषण त्यांच्या ह्या चरित्रलेखनात दिसून येते.
त्यांचे उत्कृष्ट बौद्धिक कर्तृत्व त्यांच्या तत्त्वज्ञानपर ग्रंथांत दिसून येते. जीवनविषयक उत्कृष्ट व सखोल तत्त्वचिंतनाचे त्यांत विलोभनीय दर्शन घडते. बुद्धीचे प्रामाण्य मानणाऱ्या आघाडीच्या प्रज्ञावान भारतीय विचारवंतांत म्हणूनच त्यांची गणना केली जाते. त्यांच्या विचारांत चिद्वाद व व्यवहारवाद यांचा सुंदर समन्वय झाला आहे. अनेकदेवतावादास आणि पारंपारिक अंधश्रद्धांना त्यांचा कडवा विरोध होता. स्त्री–पुरुषसंबंधांबाबतच्या त्यांच्या विचारांवर प्रतिगामी म्हणून काहींनी टीकाही केली तथापि ते खरे सुधारणावादीच होते. त्यांनी घटस्फोट, विधवाविवाह यांचे परिस्थितीनुरूप समर्थनचा केले तसेच जातीयतेच्या उतरंडीस विरोध करून सामाजिक समतेचा हिरिरीने पुरस्कारच केला. त्यांच्या ठिकाणी दृष्टीची मौलिकता, विचारांची स्पष्टता व तर्कशुद्धता तसेच शैलीची सुबोधता, संक्षेप, काटेकोरपणा, सरलता, साधेपणा हे गुणविशेष प्रकर्षाने जाणवतात. नरहरी पारीख (श्रेयार्थी नी साधना – १९५३) आणि मुकुल कलार्थी (किशोरलाल भाई ना जीवनप्रसंग–१९६३) यांनी मशरूवालांच्या जीवनावर व कार्यावर परिचयपर ग्रंथ लिहिले आहेत. केवळ गुजरातमधीलच नव्हे, तर अखिल भारतीय पातळीवरचे एक थोर विचारवंत व तत्त्वचिंतक म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे.
सुर्वे, भा. ग.
“