मले भाषा : मलाया, इंडोनेशियातील मुख्यतः सुमात्रा-बोर्निओ बेटांवरील मेलायू वा मलायी लोकांची ही भाषा. ऑस्ट्रोनेशियन किंवा मलायो-पॉलिनीशियन या भाषा-कुटुंबातील इंडोनेशियन शाखेतील मले ही एक भाषा आहे. सु. ९०,००,००० लोक ही भाषा बोलतात. सुमात्रात बोलल्या जाणाऱ्या मिनांगकबू, केरिन्तजी, रेजांग या भाषांशी तिचे साधर्म्य आहे. मले भाषा अनेक बोलींची बनलेली आहे. ब्रूनेद् मले, सांबस मले, कुतई मले अशा तिच्या बोली आहेत. चिनी व्यापारी कामचलाऊ मले वापरतात. ती बाजारी मले सुद्धा एक बोलीच. दक्षिण मलाया भागात बोलली जाणारी मलेची बोली ही प्रमाण बोली मानण्यात येते. इंडोनेशियाची ही बोली अधिकृत भाषा तिला बहासा (ब्हाशा) इंडोनेशिया अथवा इंडोनेशियन असे म्हणतात. १९४५ मध्ये इंडोनेशियाची ती अधिकृत भाषा झाली. मलेशियाची अधिकृत भाषा म्हणून मात्र तिला बहासा मलेशिया या नावाने ओळखतात. हिचे खरे नाव मात्र मेलायू.
मले भाषेचा इतिहास तसा अज्ञातच आहे. सुमात्रामध्ये इ.स. सातव्या शतकातील शिलालेख सापडले. त्यातील भाषा ही जुनी मले. इ.स. चौथ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत हिंदू धर्माचा मलाया, इंडोनेशिया, सुमात्रा या बेटांवर प्रभाव होता. पण या कालातील वाङ्मय आज उपलब्ध नाही. त्यानंतर या बेटांवर इस्मालचा प्रभाव पडला. १९४८ मध्ये ड्रेव्हीस यांना सोळाव्या शतकातील अरबी भाषेचा प्रभाव असलेल्या मसे भाषेतील काही कागदपत्रे सापडली. अठराव्या शतकात पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच व्यापाऱ्यांशी मलायी लोकांचे संबंध आले. परिणामतः आधुनिक मलेमध्ये संस्कृत, अरबी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतील शब्द सापडतात.
मले भाषा प्रत्ययप्रधान आहे. शब्दांना सुरुवातीस, शेवटी किंवा मध्येही प्रत्यय लागतात. उदा., बेली या शब्दाचा अर्थ ‘विकत घे’ असा आज्ञार्थी आहे. दिबेली म्हणजे ‘विकत घेतलेले’ तर मेंबेली म्हणजे ‘विकत घेणे’. पुनरूक्तीचे प्रमाणही मलेमध्ये मोठे आहे. उदा., समाह म्हणजे ‘घर’ तर समाहसमाह म्हणजे ‘घरे’ बहासाबहासा ‘(अनेक) भाषा’ (बहासा शब्द भाषापासून आलेला आहे). येथे नामाचे वचन बदलण्यास पुनरूक्तीचा वापर केला आहे. आधुनिक मलेचे लेखन दोन प्रकारे होते. रोमन लिपी वापरून किंवा अरबी वर्णमालेच्या जावी या लिपीमध्ये.
संदर्भ : Sebeok, T.A. Ed. Current Trends in Linguistics, Vol.8, Oceania, Mouton, 1971.
धोंगडे, रमेश वा.
“