चिकामात्सू मोनझाएमोन : (? १६५३–६ जानेवारी १७२५). एक श्रेष्ठ जपानी नाटककार. मूळ नाव सुगिमोरी नोबुमोरी. त्याने कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांसाठी, तसेच ⇨काबुकी या पारंपरिक जपानी नाट्यासाठी कलागुणांनी संपन्न अशी नाटके लिहिली. ओसाका येथे तो हयातभर राहिला. वयाच्या तिशीनंतर त्याने नाट्यलेखनास सुरुवात केली.
चिकामात्सूचे खरे कलावंत मन काबुकीपेक्षा ‘जोरूरी’मध्येच रमले. काबुकी कलावंत मूळ नाट्यसंहितेत मन मानेल तसा बदल करीत व ही गोष्ट चिकामात्सूला पसंत नव्हती. जोरूरी म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचे नाट्य. जोरूरीचे दोन प्रकार सामान्यपणे मानले जातात. पहिला जिदाई-मोनो आणि दुसरा सेवा-मोनो. पहिल्या नाट्यप्रकारात ऐतिहासिक विषय असून ही नाटके कल्पनारम्य असतात. या प्रकारातील कोकूसेन्या कासेन (इं. भा. द बॅटल्स ऑफ कॉक्सिंगा ) हे चिकामात्सूचे नाटक अजूनही लोकप्रिय आहे. कॉक्सिंगा हा एक धाडसी नायक असून चीनमध्ये मिंग राजवंशाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न त्याने केला. सेवा-मोनो या कौटुंबिक शोकात्मिका असून त्यांत विवाहबाह्य प्रेमसंबंध आणि परिणामतः नायक-नायिकांची आत्महत्या हा ठराविक साचा आढळतो. यांत एक किंवा दोनच अंक असत. चिकामात्सूने शंभरच्या वर जिदाई-मोनो प्रकारातील व वीसच्या वर सेवा-मोनो प्रकारातील नाटके लिहिली, असे मानले जाते. त्याची अनेक सेवा-मोनो नाटके प्रत्यक्षात घडलेल्या घटनांवर आधारित आहेत. ती वास्तव आणि कल्पित यांच्या सीमारेषेवर वावरतात आणि जीवनाचा सखोल प्रत्यय घडवितात. सोनेझाकी शिन्जू (१७०३), म्हणजे सोनेझाकी येथील प्रेमिकांची आत्महत्या, हे त्याचे अत्यंत लोकप्रिय नाटक अशा प्रकारच्या प्रत्यक्षातील आत्महत्येच्या घटनेनंतर फक्त पंधरा दिवसांच्या आतच त्याने लिहिले, असे म्हणतात. जपानी नाट्यपरंपरेत त्याच्या सेवा-मोनोतील दुहेरी म्हणजे नायक-नायिकेच्या आत्महत्येचा साचा विशेष प्रसिद्ध आहे. जपानी नाट्यरचनेत अठराव्या शतकापर्यंत जे जे काही उत्तम होते, ते ते सर्व चिकामात्सूच्या नाट्यरचनेत आढळते. त्याच्या शिष्याच्या नानिवा मियाज (१७३८) नावाच्या पुस्तकात त्याच्या नाट्यविषयक कल्पना मांडलेल्या आहेत. त्यानुसार जोरूरी नाटकात वास्तववाद आणि आदर्शवाद या दोहोंत सुसंवाद साधला पाहिजे, अशी त्याची दृष्टी असल्याचे दिसते. जोरूरी आणि काबुकीच्या उत्तर परंपरेवर चिकामात्सूचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे.
त्याच्या काही नाटकांची इंग्रजी भाषांतरे उपलब्ध आहेत. उदा., डोनाल्ड कीनकृत द बॅटल्स ऑफ कॉक्सिंगा (१९५१), द लव्ह स्युइसाइड्स ॲट सोनेझाकी (१९५५), फोर मेजर प्लेज ऑफ चिकामात्सू (१९६४) व डोनाल्ड शिव्हलीकृत द लव्ह स्युइसाइड ॲट ॲमिजिमा (१९५३).
हिसामात्सु, सेन-इचि (इं.) जाधव, रा. ग. (म.)