मलाया :  आग्ने य आशियातील एक ऐतिहासिक व भौगोलिक प्रदेश. मलेशियाच्या तेरा राज्यांपैकी मले द्वीपकल्पातील (प. मलेशिया) दक्षिणेकडील अकरा राज्यांचा प्रदेश ‘मलाया’ या नावाने संबोधला जातो. मले द्वीपकल्पाचा सु. ७५% भाग (क्षेत्रफळ १,३१,५८७  चौ. किमी.) मलायाने व्यापला असून लोकसंख्या १,१४,२८,००० (१९८१) आहे. मलायाच्या उत्तरेस थायलंड, पश्चिमेस मलॅका सामुद्रधुनी, दक्षिणेस सिंगापूर व पूर्वेस दक्षिण चिनी समुद्र आहे. या प्रदेशात जोहोर, केडाह, केलांतान, मलॅका, नग्री संबीलान, पाहांग, पिनँग, पेराक, पेर्लिस, सलांगॉरव ट्रेंग्गानू या मलेशियाच्या अकरा राज्यांचा समावेश होतो. ही अकरा राज्ये म्हणजे पूर्वीचे मलाया संघराज्य (फेडरेशन) होय. या संघराज्यात सिंगापूर वगळता मले द्वीपकल्पाचा पूर्वीचा ब्रिटिशांकित सर्व प्रदेश होता. ३१ ऑगस्ट १९५७  पासून या भागाला स्वतंत्र संविधानीय राजसत्ता व राष्ट्रकुल देशांचे सभासदत्व होते.

प्राचीन काळापासून मलाया मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मूळच्या हिंदू व मुसलमान व्यापाऱ्यांना मागे हटवून यूरोपीय वसाहतकऱ्यांनी येथे आपला प्रभाव वाढविला. पोर्तुगालने १५११ मध्ये मलॅका काबीज करून ते डचांच्या ताब्यात पडेपर्यंत (१६४१) त्यावर राज्य केले. ग्रेट ब्रिटनने १७८६ मध्ये पिनँग बेट आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर ब्रिटनने आपल्या सत्तेचा विस्तार करून १९०० पर्यंत संपूर्ण मलाया काबीज केला. १९५७ मध्ये वसाहतींची सत्ता संपुष्टात येऊन मलाया स्वतंत्र झाला. १६ सप्टेंबर १९६३ रोजी मलाया संघराज्यातील अकरा सदस्य राज्यांना साबा (पूर्वीचा उत्तर बोर्निओ) व सारावाक हे भाग जोडून मलेशियाची निर्मिती करण्यात आली. १९६५ मध्ये एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून सिंगापूर हे मलेशियापासून वेगळे झाले, त्यामुळे एकूण तेरा राज्यांचा मिळून मलेशिया हा देश बनला.

पहा : मलेशिया 

चौधरी, वसंत