मलॅका सामुद्रधुनी : आग्नेय आशियातील मले (मलाया) द्वीपकल्प व इंडोनेशियाचे सुमात्रा बेट यांदरम्यानचा, तसेच हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारा अरुंद सागरी भाग. १० उ. ते ६० उ. अक्षांशांदरम्यान पसरलेल्या या सामुद्रधुनीचे क्षेत्रफळ ६५,००० चौ. किमी. असून तिची उत्तर-दक्षिण लांबी सु. ८०० किमी. व रुंदी ५० ते ३२० किमी. आहे. ही सामुद्रधुनी उत्तरेला रुंद असून दक्षिणेला खूपच अरुंद होत गेली आहे. जगातील एक महत्त्वाचा जलमार्ग व भारत-चीन यांच्यातील सागरी वाहतुकीचा सर्वांत जवळचा मार्ग म्हणून ही सामुद्रधुनी प्रसिद्ध असून तिच्या दक्षिण टोकाला सिंगापूर आहे. दक्षिण भागात २७ ते ३७ मी. पर्यंत खोल असलेली मलॅका सामुद्रधुनी वायव्येस अंदमान विभागापर्यंत २०० मी. पर्यंत खोल होत जाते. तिच्या दक्षिणेकडील सु. ४८ किमी. लांबीच्या पट्ट्यात अनेक लहानलहान बेटे पसरलेली आहेत. मलेशियाच्या पश्चिम भागातील पेराक, मलॅका, बर्नाम इ. महत्त्वाच्या नद्या या सामुद्रधुनीस येऊन मिळतात.
भूशास्त्रीय दृष्ट्या भूगर्भाच्या चतुर्थ युगातील (सु. २५,००,००० वर्षांदरम्यान) सखल अशा सूंदा शेल्फचा व या सामुद्रधुनीच्या तळाचा निकटचा संबंध असून उत्तर-तृतीयक युगात झालेल्या कवचस्तरांच्या हालचालींचा यावर कोणताही विशेष परिणाम झालेला दिसून येत नाही. या प्रदेशातील हवामान उष्ण, दमट असून ईशान्य व नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वार्षिक सरासरी पर्जन्य १९४ ते २५८ सेंमी.पर्यंत पडतो. मॉन्सूनच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी सरासरी ८ ते ११ किमी. असतो. मलायाच्या किनारी भागात सागरी लाटांची उंची २.८ मी.पर्यंत असते. या सामुद्रधुनीत पृष्ठभागावर पाण्याचे तपमान ३०.५० से. ते ३१० से., तर तळभागाशी ते दक्षिण भागात २८० से. पर्यंत असते उत्तरेकडे मात्र ते १२० से.पर्यंत कमी झालेले आढळते.
इतिहासप्रसिद्ध ‘मलॅका’ बंदराच्या नावावरून या सामुद्रधनीस ‘मलॅका सामुद्रधुनी’ हे नाव पडले. पूर्वीपासूनच व्यापाराच्या दृष्टीने या प्रदेशाची ख्याती आहे. मले द्वीपकल्पीय भागात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात ‘लंकाशुक’ हे भारतीय व्यापारी राज्य पाट्टानीजवळ वसल्याचा उल्लेख आढळतो. त्याकाळी या सामुद्रधुनीचा व्यापारमार्ग म्हणून उपयोग करण्यात आला असावा. त्यानंतर या सामुद्रधुनीवर व्यापारी मार्ग म्हणून क्रमाक्रमाने अरब, पोर्तुगीज. डच व ब्रिटिश यांचे नियंत्रण होते. ब्रिटिशांनी या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील पिनँग बेटावर व त्यानंतर १८१९ मध्ये दक्षिणेकडील सिंगापूरवरही आपली सत्ता प्रस्थापित केली. या ठिकाणांचा व सामुद्रधुनीचा त्यांनी अफूच्या व्यापारासाठी अधिकाधिक उपयोग करून घेतला. येथील चाचेगिरीला ब्रिटिश व डच या दोघांनीही आळा घालून व्यापारमार्ग सुकर केला.
सुमात्रामधील खनिज तेल मलेशियातील रबर बँका, बिलीटन (इंडोनेशिया) बेटांवरील कथिल इ. महत्त्वाच्या पदार्थांची परदेशी वाहतूक करण्यासाठी ह्या सामुद्रधुनीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. याशिवाय मासेमारीच्या दृष्टीनेही ही सामुद्रधुनी महत्त्वाची समजली जाते. मलॅका, पोर्ट वेल्ड, पोर्ट स्वेटनम, पोर्ट डिक्सन, बांदार पेंग्गाराम इ. मलेशियातील ठिकाणे तर बलावान, ताजुंगबालाई इ. सुमात्रामधील तसेच सिंगापूर ही शहरे या सामुद्रधुनीच्या किनारी प्रदेशात येतात. या सामुद्रधुनीद्वारे जपान, चीन, थायलंड, इंडोनेशिया हे देश ब्रम्हदेश, पाकिस्तान, भारत, श्रीलंका व यूरोपीय देशांशी जवळच्या जलमार्गाने जोडले गेले आहेत.
चौंडे, मा. ल. गाडे, ना. स.
“