मलवेदन : (मलई वेदन) : भारतातील एक आदिम जमात. ती प्रामुख्याने तमिळनाडू आणि केरळ राज्यांत आढळते. यांची वस्ती केरळ राज्यातील कोट्टयम आणि क्विलॉन जिल्ह्यात आढळते. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या १,२५८ होती. मल म्हणजे डोंगर आणि वेदन म्हणजे शिकारी यांपासून मलवेदन हे नाव प्रचलित झाले असावे. तमिळनाडूत ते वाल्मिकुलू या नावाने पूर्वी प्रसिद्ध होते. मलवेदन वे-तुवन, वेदन आणि कनकावेदन या नावांनीही ओळखले जात. यांच्यात वलियवेदन, चैरुवेदन, चिंगणीवेदन आणि एलिचठ्ठीवेदन अशा चार पोटजाती आहेत.
मध्यम उंची, लंबकपाली, काहीसे पुढे आलेले डोके, कुरळे केस, काळे डोळे व पिंगट तपकिरी रंग ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्रिया कमरेभोवती साडीसारखे कापड गुंडाळून ते उजव्या खांद्यावर टाकतात. स्त्री-पुरूष दोघेही हातात कडी, बांगड्या, कानांत वाळे घालतात. याशिवाय स्त्रिया गळ्यात विविध मण्यांच्या माळा घालतात. मलवेदनांची मलवेत्तवन ही उपशाखा बरीच सुधारली असून त्यांना जातीचा दर्जा मिळाला आहे. मलवेदन मांसाहारी आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शिकार हाच आहे. त्याशिवाय डोंगरातील औषधी वनस्पती, मुळे इ. गोळा करून ते विकतात तसेच काहीजण शेतमजूर म्हणूनही काम करतात.
मलवेदनांची वस्ती राखीव जंगलांच्या सीमा भागात सहा-सात झोपड्यांच्या समूहाने असते.
मलवेदनांत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून ते आपली संपत्ती मुलगा व भाचा यांच्यांत समान वाटतात. स्त्रियांना संपत्तीत वारसा नसतो. या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुलाचे वयाच्या अठराव्या वर्षी आणि मुलीचे दहाव्या वर्षी दात तासून टोकदार करून घेतात.
बालविवाह मान्य असून क्रयविवाह, औपचारिक अपहरण विवाह व सेवाविवाह रूढ आहेत. आते-मामे बहिणींच्या विवाहास अग्रक्रम दिला जातो. विवाहविधी साधा असून तो सकाळी करतात. ताली बांधणे हाच विवाहात मुख्य विधी असतो. तद्नंतर वधूने बनविलेल्या चटईवर बसून वधू-वर जेवतात. या विधीस कांडू कांजी कूडी म्हणतात. वधूमूल्य लग्नावपूर्वी द्यावे लागते. बहुधा एक कुदळ आणि टोपली या रूपातच वधूमूल्य दिले जाते. बहुपत्नीकत्व रूढ असून घटस्फोट व पुनर्विवाह मान्य आहे मात्र मेहुणीबरोबर आणि देवरविवाह निषिद्ध मानले जातात. साटेलोटे विवाहपद्धतीत वधूमूल्य द्यावे लागत नाही.
रजस्वला मुलीस चार दिवस तर स्त्रीस पाच दिवस स्वतंत्र झोपडीत ठेवतात. जननाशौच एक महिना पाळतात. नामकरण पिता करतो. गर्भधारणेच्या सातव्या महिन्यात पुलीकुडी नामक विधी करतात. हे लोक जडप्राणवादी असून गणचिन्हांची पूजा करतात. याशिवाय ते हिंदू देवदेवतांना भजतात. पूर्वपूजेस महत्त्वाचे स्थान आहे. ते ओणम्, कर्कदक व संक्रांत हे सण साजरे करतात. त्यांचा जादूटोण्यावर विश्वास असून ते शकून-अपशकून पाळतात. ते तमिळ आणि मलयाळम् मिश्रित बोलीभाषा बोलतात.
मलवेदन मृताला कापडात गुंडाळून दोन मीटर खोल खड्डा खणून त्यात पुरतात. मृताच्या तोंडात मुलगा किंवा पुतण्या तांदूळ ठेवतो. थडग्यावर नारळ आणि कांजीने भरलेले मडके ठेवतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की मृतात्मा ते खातो. स्त्रिया व मुले स्मशानात जात नाहीत. मृताशौच सोळा दिवस पाळतात. तोपर्यंत आप्तेष्ट शिकारीसाठी बाहेर पडत नाहीत. सोळाव्या दिवशी ज्ञातिभोजन घालतात.
संदर्भ : 1. Luiz A. A. D. Tribes of kerala, New Delhi, 1962.
2. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol.VII, Madras, 1965.
शेख, रुक्साना
“