मलयगिरी : ओरिसा राज्यातील धेनकानाल जिल्ह्याच्या पाललहरा तालुक्यातील एक प्रमुख शिखर. उंची १,१८८ मीटर. पाललहरा गावाजवळच आग्नेयीस एकाकी अशा अरूंद माथ्याच्या पठारावर हे टेकडीवजा शिखर असून शिखराचा उतार तीव्र आहे. याच्या नैर्ऋत्येकडील बाजूवर एक पाण्याचा झरा असून तेथे लहानसा जलाशयही तयार करण्यात आला आहे. येथील डोंगरात स्फटिक खडक व पायथ्याशी गार्नेटाचे साठे आढळतात. शिखरावरून परिसराचे सुंदर दृश्य दिसते. येथील पाणी व सपाट जागेच्या उपलब्धतेमुळे इमारती बांधण्यास तसेच एक पर्यटनकेंद्र म्हणून याचा विकास करण्यास मोठा वाव आहे.

चौधरी , वसंत