मलईकुडिय : भारतातील एक आदिवासी जमात. कर्नाटक आणि केरळ राज्यांतील विशेषतः दक्षिण कानडा व कननोर या अनुक्रमे जिल्ह्यांत तसेच तलिपारंब गावाच्या आसपास ही मुख्यतः आढळते. यांना स्थलपरत्वे वेगवेगळी नावे आहेत. उदा., कुडिय, मलकुडिय इत्यादी. अद्यापि अन्न संकलनाच्या अवस्थेत असणारे लोक मागासलेले असून त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ६६८ होती. केरळमध्ये आढळणाऱ्या या जमातीतील लोक आपले पूर्वज कुर्ग येथील असावेत, असे मानतात.
फिकट तपकिरी वर्ण, मध्यम उंची, अरूंद नासिका ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. पुरूष विविध प्रकारचे पोषाख करतात, तर स्त्रिया कुर्ग स्त्रियांप्रमाणेच कपडे वापरतात. स्त्रियांना आभूषणांची विशेष आवड आहे. नाक, कान यांत त्या आभूषणे वापरतात, तसेच हातात खूप बांगड्या घालतात. ही जमात जंगलात, डोंगराच्या उतारावर किंवा गुहेत वस्ती करते. यांच्या झोपड्या लहान पण आकर्षक असतात. ते घरात लाकडी वस्तू आणि पितळी भांडी वापरतात. स्त्रिया जंगलातील मध, फळे, फुले, मुळे आदी गोळा करतात. शेती हा व्यवसाय लोकप्रिय असून मोठ्या शेतकऱ्यांकडे शेतमजूर म्हणूनही ते काम करतात. कर्नाटकातील मलईकुडिय वेलदोड्यांच्या लावणी-कापणीच्या वेळी आपली वस्ती डोंगरावरून खाली आणतात व वेलदोडे गोळा करतात. ते सीमेवर आणून विकतात. केरळमधील मलईकुडिय पशुपालन, कुक्कुटपालन, जंगलातील वस्तू गोळा करणे, शेती व शेतमजूरी इ. व्यवसाय करतात. ते मांसाहारी असले, तरी गोमांस निषिद्ध मानतात. माकड व लाल खार यांची शिकार करून ते खातात आणि दारू पितात.या जमातीवर हिंदू संस्कृतीचा अधिक प्रभाव दिसून येतो. केरळमधील या जमातीत मातृसत्ताक कुटुंबपद्धती तर कर्नाटकात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे.
मलईकुडियींत अनेक बहिर्विवाही कुळी असून मुले-मुली वयातआल्यानंतर विवाह होतात. यांच्यात आते-मामे भावंडांच्या विवाहास प्राधान्य दिले जाते. पूर्वी या जमातीत विधवा आई थोरल्या मुलाबरोबर विवाह करीत असे परतु आता ही चाल लुप्त झाली आहे. वधूमूल्य २५ रूपयांपर्यंत दिले जाते. विधवाविवाह-पुनर्विवाह यांस मान्यता आहे. घटस्फोट प्रचलित आहे. बहुपत्नीकत्वाची चाल आहे. वराचा पिता सुवासिक तेल व पानसुपारी घेऊन वधूच्या घरी मागणी घालण्यासाठी जातो. वधूपित्यास मागणी मान्य असल्यास तो तेलाची बाटली ठेवून घेतो. विवाहसमारंभ वधूच्या घरी साजरा होतो. वधूवर एकमेकांच्या हातात हात देतात व वधूपिता त्यावर पाण्याची धार सोडतो. हाच मुख्य विवाहविधी होय.
मलईकुडिय जमातीत चार किंवा पाच वयोवृद्धांची एक पंचायत असते.जमात प्रमुखाला ‘गुरिकार’ म्हणतात. जमातीतील सर्व कारभार त्याच्या देखरेखीखाली चालतो. हे लोक जडप्राणवादी असून भैरव, कामंदेवरू आणि पाच पांडवांना भजतात तसेच लाकूड, धातू इत्यादींचीही ते पूजा करतात. या लोकांचा भुताखेतांवरही विश्वास आहे.
एखादी व्यक्ती वस्तीजवळ मृत्यू पावल्यास तिला जाळतात पण दूर ठिकाणी मरण पावल्यास व्यक्तीला पुरतात. तिसऱ्या दिवशी दफनस्थळी मुलगा व इतर नातेवाईक तीन प्रदक्षिणा घालून भात शिंपडतात. और्ध्वदेहिकाच्या वेळी पाच केळीची पाने जमिनीवर पसरतात व त्यावर कोंबडीचे मांस, भात व भाजी ठेवतात आणि मृतात्म्यास प्रार्थना करतात. सोळाव्या दिवशी पुन्हा हाच विधी करतात. जमातप्रमुख मेल्यास सात दिवसानंतर जाळलेल्या अथवा पुरलेल्या स्थळी एक मंडप उभारतात आणि गवताचा पुतळा करतात. पुतळ्यास धूतवस्त्र घालतात. खोबऱ्याच्या वाटीत तेल घालून दिवे लावतात. ते दिवे त्या मंडपाच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवतात. सर्व नातेवाईक त्या मंडपास रडत प्रदक्षिणा घालतात व मृतास पुरलेल्या ठिकाणावर भात शिंपडतात.
संदर्भ : Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. IV,
शेख, रूक्साना
“