मरुत् : एक वैदिक देवतागण. वैदिक साहित्यात मरुत्‍ हे महत्त्वाच्या देवतांपैकी आहेत. ऋग्‍वेदात त्यांना उद्देशून ३३ सूक्ते आहेत. मरूतांच्या गणांचा नेहमी उल्लेख येतो. त्यांची संख्या ७, २१ वा १८० असल्याने त्यांचा निर्देश नेहमी बहुवचनात होतो. ते रूद्राचे मुलगे म्हणून त्यांना ‘रूद्रियगण’ असे काही वेळा म्हटले आहे. पृश्र्नी ही त्यांची माता असल्याने मरूतांना काही वेळा ‘पृश्र्नीमातर :’ असेही म्हटले जाते. ते आकाशात उत्पन्न म्हणून ‘दिवस्पुत्र’ ( ऋग्वेद १०. ७७.२ ), तर समुद्रपुत्र म्हणून ‘सिंधुमातर:’ ( . १०. ७८.६ ) असेही त्यांचे निर्देश आढळतात. रोदसी ही त्यांची पत्‍नी. ते एकमेकांचे भाऊ असून त्याच्यांत कोणीच थोरला किंवा धाकटा नसतो तसेच ते दिसायलाही एकसारखे आहेत. त्यांचे वर्णन तेजस्वी म्हणून केले जाते तसेच त्यांचा विजेशाही संबंध जोडला जातो. हातांत कुर्‍हाडी व धनुष्ये तसेच खांद्यावर भाले घेऊन, सोनेरी चिलशते व सोनेरी शिरस्त्राणे धारण करून ते जातात. त्यांच्या गर्जनेचा वारंवार उल्लेख येतो. ते समुद्रातून निघून पर्जन्यवृष्टी घडवून आणतात. त्यांचा वेग प्रचंड वायूसारखा आहे. ह्या सर्व उल्लेखांवरून ते वादळीवार्‍यांचे देव असावेत, अशी कल्पना केली जाते. मात्र कून आणि बेन्फाय ह्यांसारख्या अभ्यासकांनी मृतांचे आत्मे हे मरूतांचे मूळ स्वरूप मानले आहे. ऐतिहासिक दृष्ट्या ते शक्य असले, तरी वैदिक साहित्यात या कल्पनेला पोषक असा पुरावा फार थोडा आहे. पं. सातवळेकरांच्या मते मरूत्‍हे सैनिकी संघटना आणि संचलन यांचे प्रतीक होय. ‘मरुत्‍’ हा शब्द ‘मर्‍’ ह्या धातूपासून साधता येतो. ‘मर्‍’ धातूचे मरणे, चिरडणे, चमकणे ह्यासारखे अर्थ आहेत. ऋग्वेदीय पुराव्याचा विचार करता चमकणे हा अर्थ जास्त संभाव्य वाटतो.

 

वैदिकोत्तर कालात मात्र त्यांना ‘वायु’ म्हटले असून ते दिती व कश्यप यांचे मानले गेले व त्यांची संख्या ४९ सांगितली आहे. त्यांचे सात गण आहेत ( शतपथ ब्राह्मण २. ५१.१३ ). पृथ्वी, सूर्य, सोम, ज्योतिर्गण, ग्रह, सप्तर्षी-मंडळ व ध्रुव ही त्यांची निवासस्थाने होत.

 

संदर्भ : Macdonell, A. A. Vedic Mythology, Varanasi, 1961.

 

थिटे, ग. उ.