मरी नदी : ऑस्ट्रेलियाची २, ५८९ किमी. लांबीची प्रमुख नदी. न्यू साउथ वेल्स राज्याच्या स्नोई पर्वतरांगेतील कॉझिस्को शिखरावरजवळ उगम पावणारी ही नदी प्रथम पश्चिमवाहिनी व नंतर साउथ ऑस्ट्रेलिया राज्यातील मॉर्गन गावापर्यत वायव्यवाहिनी होते नंतर ती एकदम दक्षिणेकडे वळून अँलेक्झांड्रिना सरोवरातून हिंदी महासागराच्या एन्. काउंटर उपसागराला मिळते. डार्लिंग, लॅच्लॅन, मरंबिजी, मिट्टा मिट्टा, ओव्हन्स, गोल्बर्न, कॅम्पॅस्पे व लॉडॉन ह्या मरी नदीच्या प्रमुख उपनद्या होत. मरीचे एकूण अपवाह क्षेत्र ( पाणलोट क्षेत्र ) १०, ७२, ९०५ चौं. किमी. असले, तरी ती सरासरी प्रतिवर्षी १५ लक्ष हे. मी. इतके जलवहन करते. तत्कालीन वसाहतीचा सचिव सर जॉर्ज मरी ह्याचे नाव या नदीला देण्यात आले ( १८३० ). मरीला उत्तरेकडून डार्लिंग नदी येऊन मिळते. मरी – डार्लिंग यांच्या संगमावरील ‘रिव्हरिना’ हा मैदानी प्रदेश सबंध ऑस्ट्रेलियात उत्कृष्ट सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो. मरी –डार्लिंग नदीसंहतीमध्ये सु. ९६० किमी. अंतरापर्यत नौकानयन करता येते. साउथ ऑस्ट्रेलियामधून सु. ४०० किमी. लांब वाहत जाणारा मरी नदीचा प्रवाह सु. ३० मी. उंचीच्या कड्यांमधून जात असल्याने हा भाग कोरून निघाला आहे. ह्या कड्यांतील चुनखडक तृतीय युगातील आहेत. न्यू. साउथ वेल्स व व्हिक्टोरिया या राज्यांच्या सरहद्दीवरून ही नदी वाहते.
एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकारंभीच्या काळात आग्नेय ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागातील प्रवास व व्यापार यांचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून मरी नदीचा उपयोग करण्यात आला. सांप्रत मात्र रेल्वे व मोटारी यांच्या स्पर्धेमुळे मरी नदीतून वाहतूक फारच थोड्या प्रमाणात केली जाते.
मरी नदीच्या पाण्याचे समान वाटप करण्याच्या दृष्टीने १९१५ मध्ये न्यू साउथ वेल्स, साउथ ऑस्ट्रेलिया व व्हिक्टोरिया ही तीन राज्ये आणि केंद्रशासन यांनी मिळून ‘मरी नदी आयोग’ नेमून एक करार केला व त्याअन्वये नदीवर धरणे बांधण्यात आली. अनेक धरणांमुळे सु. ६.१० लक्ष हे जमीन ओलिताखाली आली आहे. व्हिक्टोरिया व न्यू साउथ वेल्स या राज्यांच्या सरहद्दीवर, मरी नदी व तिची उपनदी मिट्टा मिट्टा यांच्या संगमावर ऑल्बरी गावाच्या दक्षिणेस १६ किमी. वर १.६ किमी. लांबीचे ३.१० लक्ष हे. मी. पाणी साठविण्याची क्षमता असलेले ह्यूम हे प्रचंड धरण १९३४ मध्ये बांधण्यात आले आणि या धरणाला ऑस्ट्रेलियन बुशमन व संशोधक हॅमिल्टन ह्यूम याचे नाव देण्यात आले. या नदीच्या मुखापाशी खार्या पाण्याचा प्रतिबंध करण्यासाठी पाच बंधारे बांधण्यात आले आहेत.
पूर्वेकडील उतारावरून येणारा पाण्याचा प्रचंड ओघ पश्चिमेकडे मरी – डार्लिंग नदीसंहतीला मिळविण्याच्या प्रयत्नात वीज उत्पादन व कमाल जलसिंचन योजना ह्यांना प्रकर्षाने चालना देण्याच्या हेतूने ‘स्नोई मौंटन्स जलविद्यूत् प्राधिकरणा’ची १९४९ मध्ये स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी या बहूद्देशी प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होऊन १९७४ मध्ये संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पामुळे ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी हा प्रदेश तसेच न्यू साउथ वेल्स व व्हिक्टोरिया ही राज्ये यांना वीजपुरवठा करण्यात येऊन सु. २, ६०० चौ. किमी. क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य झाले. सबंध जगामधील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती व जलसिंचन प्रकस्पांपैकी हा एक समजला जातो. या प्रकल्पामध्ये १७ कोटी धरणे, अनेक लहान धरणे, ९ विद्युतशक्तिउत्पादन केंद्रे, सु, १६० किमी. लांबीचे बोगदे, १३० किमी. लांबीचे जलसेतू, उच्च विद्युत्दाब प्रेषणमार्गाने जे इत्यादींचा समावेश होतो.
मरी नदीच्या काठावर फळबागा व द्राक्षमुळे, विस्तृत कुरणे व धान्यपिके, गाईगुरे व वाढत्या लोकवस्तीची शहरे या सर्वाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. हिच्या काठी ऑल्बरी, एछुका, स्वॉन हिल, मिल्डुरा, रेन्मार्क, मरी ब्रिज इ. शहरे विकसित झाली आहेत.
गद्रे, वि. रा.