मखा : (हिं. मरूवा क. मरूगा, मरगुपत्ती सं. मरूवक इं. स्वीट मर्जोरम लॅ. मॅजोरॅना हॉर्टिन्सिस, ऑरिगॅनम मॅजोरॅना कुललॅबिएटी). फुलझाडापैकी[वनस्पती, आवृतबीज उपविभाग] ही सुगंधी, शाखित (फांद्यायुक्त), बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी),लहान व सु. ३०-६० सेंमी. उंच ] ओषधी मूळची द. यूरोप, उ. आफ्रिका व आशिया मायनर येथील असून भारतात ही बागेत मोठ्या प्रमाणात लावतात. मॅजोरॅना या वंशात एकून सहा जाती असून त्यांपैकी ही एकच लागवडीत आहे. हिची पाने साधी, राखट हिरवी, सुगंधी, लहान, आयत-अंडाकृती असतात फुले फार लहान पांढरट किंवाजांभळट असून त्यांचे गुच्छ शेंड्याकडे येतात. त्यांची संरचना व वनस्पतीची इतर सामान्य लक्षणे ] लॅबिएटी अथवा तुलसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. बिया बारीक, गर्द तपकिरी व तैलयुक्त असतात.

सुगधाकरिता पाने मसाल्यात, भाजीत व शिर्क्यात (व्हिनेगरमध्ये ) आणि बिया मिठाईत घालतात. फुले व पाने यांपासून तीव्र सुगंधी तेल (ऑइल ऑफ स्वीट मर्जोरम) काढतात. त्यास जायफळ आणि पुदिना यांच्यासारख्या आल्हाददायक सुवास येतो. तेल रंगहिन किंवा पिवळट असते. साबण सुगंधी द्रव्ये, अत्तरे व मद्येयांत त्याचा वापर करतात, तसेच दातदुखी, मुरगळणे, खरचटणे, पक्षाघात इ. विकारांत बाहेरून लावण्यास त्याचा उपयोग करतात. ही वनस्पती वायुनाशी व कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी) व यकृतास पौष्टिक असते. पाने व बिया स्तंभक (आकुंचन करणार्‍या) असतात. वनस्पतीचा फांट [विशिष्ट प्रकारे काढण्यात येणारा काढा ” औषधिकल्प] उत्तेजक, स्वेदक (घाम आणणारा ), आर्तवजनक (मासिक ऋतुस्त्राव सुरू करणारा) व दुग्धवर्धक असतो. कौटिलीय अर्थशास्त्र, शुक्रनीती व कामंदकीय नीतिसार इ. संस्कृत ग्रंथांत मरूवकाचा उल्लेख आला आहे.

परांडेकर, शं. आ.

मरव्याची झाडे चांगल्या निचर्‍याची सुपीक व दुमट जमिनीत चांगली वाढतात. सपाटीच्या प्रदेशात ऑक्टोबरमध्ये आणि डोंगरळ भागात मार्च ते जूनपर्यंत रोपांकरिता कुंड्यांत बी पेरतात. दोन महिन्यांनी रोपे ३० २० -३० सेंमी. अंतरावर लावतात. छाट कलमांनीही लागवड करता येते. पीक साडेतीन महिन्यांत काढणीस तयार होते. फांद्याच्या शेंड्यांना मंजिर्‍या आल्यावर त्या खुडून सावलीत वाळवितात. बी तयार होण्यापुर्वी पानांत जास्तीत जास्त बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते ओल्या पानांतून व फुलोर्‍यांतून ०.३-०.४ % व वाळलेल्या पानाफुलांतून ०.७-३.५% तेल निघते.

चौधरी, रा. भो.