मत्स्यपारध : (मत्स्यक्रीडा). हा एक छंद आहे. यात मुख्यत्वेकरून गळाने मासे पकडले जातात. बंदुकीने, तिरकमठ्याने, भाल्याने किंवा अन्य काही प्रकारे मासे पकडणे हेही या छंदातच मोडते.

इतिहास : हा छंद मानवात फार पुरातन काळापासून आढळतो. आदिमानवांच्या वसाहतींच्या आसपास हाडापासून किंवा शिंपल्यापासून तयार केलेल्या गळांचे अवशेष आढळले आहेत यावरून त्यास मासे मारण्याचा छंद असावा, असे अनुमान निघते. अन्न प्राप्त करण्याच्या आवश्यकतेतूनच या छंदाची उत्पत्ती झाली असावी असे दिसते. झाडांचे मजबूत व लांब काटेही गळ म्हणून वापरले जात असावेत. शंखशिंपल्यांपासून केलेले गळ आजही ऑस्ट्रेलियन आदिवासी लोकांजवळ आढळतात. या गळांनी मासे पकडणे ही क्रिया नुसता छंद म्हणून नव्हे, तर ती अन्नार्जन या सदरात मोडते. मोहें – जो – दडोच्या उत्खननात लोखंडी गळ सापडले आहेत. तसेच तांबड्या मातीच्या भांड्यावर काढलेले महसीरसारख्या दिसणाऱ्या माशाचे चित्र व दगडावर कोरलेला मासाही आढळला आहे. यावरून असे अनुमान निघते की, सु, ४,००० वर्षांपूर्वीदेखील भारतात गळाने मासे पकडण्याची पद्धती अस्तित्वात असावी. ईजिप्त देशातही इ. स. पू. २,००० वर्षांच्या पुरातन काळात भिंतीवर कोरलेल्या चित्रात गळाने मासे पकडणे व जाळ्यात मासे पकडणे हे दोन्ही प्रकार दिसतात. चीनमध्ये इ. स. पू. चौथ्या शतकात बांबूची गळदांडी, रेशमाची गळदोरी व सुईचा केलेला गळ यांचा निर्देश आहे.ग्रीक, रोमन, अँसिरियन व ज्यू या लोकांत देखील गळाने मासे धरण्याची पद्धत प्रचलित होती. लांब व निमुळती गळदांडी आणि आमिष म्हणून कृत्रिम माशी यांचा उपयोग रोमन लोकांनी प्रथम केला.

एल्फ्रीक या गृहस्थांनी इ. स. ९९० साली मासे गरविण्याच्या (गळाने मासे पकडण्याच्या) प्रकारावर इंग्रजी भाषेत एक पुस्तिका लिहिली. हे या विषयावरचे पहिले पुस्तक असावे. यानंतर १४९६ साली Tratyse of Fysshynge with an Angle हे पुस्तक विंगकिन डे वॉर्ड या मुद्रकांनी वेस्टमिन्स्टर (इंग्‍लंड) येथे प्रसिद्ध केले. यात गळाने मासे पकडण्याच्या प्रकाराचे सविस्तर वर्णन डेम जुलिॲना बेर्नेर्स या बाईंनी लिहिले होते. यात आमिष म्हणून बारा प्रकारच्या कृत्रिम माश्या व त्या बनविण्याच्या कृती दिल्या आहेत. यांपैकी सहा प्रकारच्या माश्या अजूनही वापरात आहेत. यानंतर या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली. भारतात सु. ११२९ साली राजा सोमेश्वर यांनी मानसोल्लास हे पुस्तक लिहिले (या पुस्तकाची एक प्रत बडोदे येथील गायकवाड ग्रंथालयात जतन करून ठेवलेली आहे). या पुस्तकात ‘मत्स्यविनोद’ या शीर्षकाखाली मत्स्यपारध या विषयाचे विवरण केले आहे. मासे पकडण्यास आवश्यक असलेला गळ, दोरी, काठी वगैरेंचा तसेच माशांच्या निरनिराळ्या जातींचाही उल्लेख आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन भारतात मत्स्यपारध ज्ञात होती पण या कलेचा व छंदाचा प्रसार भारतापेक्षा पाश्चिमात्य देशांत जास्त झाला. यूरोप व अमेरिकेत मिळून तीस लाखांपेक्षा जास्त लोकांना हा छंद आहे. या छंदापायी प्रतिवर्षी कोट्यावधी डॉलरचा खर्च होतो. नेहमीच्या व्यवसायातून शक्य होईल तेव्हा हातात गळ घेऊन हे लोक नदीकाठी, तळ्याकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आढळतात. या छंदामुळे त्यांना धकाधकीच्या आयुष्यातून सुटका व रोजच्या यातायाती विसरून मनास शांतता मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात हा काळ झाल्यामुळे मनही प्रसन्न राहते. सर्वसाधारण माणसांचे तर राहोच पण सर्वकाळ कार्यमग्‍न असणारे दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटनचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल हेदेखील वेळ मिळताच एकदोन तास गळाने मत्स्यपारध करण्याच्या छंदात घालवीत असत व आपले मनोरंजन करीत असत.

हा छंद लोकप्रिय झाल्यामुळे याला पोषक असे इतर व्यवसायही अस्तित्वात आले. चांगल्या गळदांड्या तयार करणे, गळदोऱ्या व रिळे बनविणे या छोट्या व्यवसायांखेरीज मत्स्यपारध करण्यास लागणाऱ्या होड्या व या होड्यांवरील विशिष्ट तऱ्हेची साधने तयार करण्याचे कारखाने अस्तित्वात आले. गळास लावण्याकरिता आमिष म्हणून कृत्रिम मासे तयार करणे आणि जिवंत लहान मासे व किडे, अळ्या इ. तयार ठेवणे या धंद्यातही पुष्कळ लोक गुंतलेले आहेत.

स्वरूप व साधने : मत्स्यपारध करावयास आवश्यक असणाऱ्या साधनांत गळ, दोरी, गळदांडी व आमिष यांचा समावेश होतो. दोरीच्या एका टोकाला गळ बांधतात व दुसरे टोक गळदांडीस बांधले जाते. गळ झाकून जाईल अशा आकाराचे आमिष त्यावर अडकविले जाते. आमिष असलेला गळ पाण्यात सोडला की, यथाकाल मासा त्या आमिषावर झडप घालतो. माशाने झडप घातली हे लक्षात आले की, मासे धरणारा गळदांडीस चपळपणे हलकासा झटका देतो व दांडी वर ओढतो. यामुळे माशाच्या तोंडात गळ अडकून तो पाण्याबाहेर ओढता येतो. या सर्व प्रकारास ’मासा गरविणे’ असे म्हणतात. ही वर्णन केलेली मासे गरविण्याची अगदी साधी रीत झाली. वर्षानुवर्षाच्या अनुभवावरून गळाच्या रचनेत, तसेच दोरीत व गळदांडीत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. या साधनांत दोरी गुंडाळण्यासाठी रीळ, रिळास चाप वगैरेंची भर पडली आहे. जो मासा पकडावयाचा असेल त्याचे आकारमान व सवयी लक्षात घेऊन या साधनांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय मासे पकडणाराचे कौशल्य व चपळाई यांचेही या छंदात फार महत्त्व आहे.

मत्स्यपारधीची साधने : (अ) साधी बांबूची गळदांडी : (१) गळदोरी, (२) गळ, (३) गळाचा कानपा (आ) आधुनिक कृत्रिम प्रकारची गळदांडी : (१) गळदोरी, (२) मूठ, (३) दोरी गुंडाळण्याचे रीळ, (४) रीळ फिरविण्याची मूठ, (५) गळदांडीच्या कड्या (इ) मोठ्या माशांसाठी साखळी (ई) भोवरकडी (उ) गळांचे विविध प्रकार (ऊ) कृत्रिम माशी गळाचे दोन प्रकार (ए) कृत्रिम मासा गळ (ऐ) चमचा गळ. 


केवळ छंद म्हणून मासे गरविणारे जरी पुष्कळ लोक असले, तरी वरील प्रकारेच मासे पकडून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांची किंवा पकडलेले मासे बाजारात नेऊन विकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गळांची दावण करून पाण्यात सोडून ट्यूनासारखे मासे एकाच वेळी पुष्कळ धरता येतात.[⟶मत्स्योद्योग].

गळ : उत्तम पोलादाचे व विशिष्ट तऱ्हेने पाणी दिलेले गळ सध्या उपलब्ध आहेत. मासे पकडण्यास हे गळ चांगले असतात कारण ते वाकत नाहीत. गळाचे टोक तीक्ष्ण असावे लागते. या टोकास पाठीमागे वळलेला टोकदार कानपा असतो. असा गळ टुपला (खुपसला गेला) की, तो सुटून बाहेर येत नाही व माशाची गळापासून सुटका होत नाही. गळांतही विविध प्रकार आहेत [ आ. (उ) ]. काही गळांचा मूळ दांडा सरळ तर काहींचा मुद्दाम वाकविलेला असतो. यामुळे गळावरील आमिष नीट राहते व गळ टुपण्याची क्रिया चांगली होते. काही वेळा दोन किंवा तीन गळ मूळ दांड्यास जोडलेले असतात. यांना जोड गळ म्हणतात. मूळ दांड्याच्या वरच्या टोकाला कडी असते किंवा ते टोक चपटे केलेले असते. यामुळे त्याला बांधलेले दोरी निसटत नाही. ही दोरी बांधण्यातही कौशल्य असते. यासाठी निरनिराळ्या तऱ्हेच्या ठराविक गाठींचा उपयोग करावा लागतो. माशाने झटका दिला, तरी ती गाठ सुटणार नाही व मासा निसटणार नाही हे बघावे लागते. बागबीरसारख्या मोठ्या माशांची शिकार करताना गळाची दोरी माशाने चावून तो निसटू नये म्हणून गळापासून एक मीटर अंतरापर्यंत धातूची तार किंवा साखळी बांधतात व त्यानंतर दोरी सुरू होते [ आ. (इ)]. मासा गळाला लागला की, कधी कधी तो स्वतः भोवतीच फिरतो आणि त्यामुळे दोरीला पीळ पडून ती तुटण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी भोवरकडी वापरतात [ आ. (ई)]. गळाचा आकार, दांडीची जाडी व तिचे स्वरूप (सरळ की बाकदार) हे विचारात घेऊन गळाचे क्रमांक ठरविले जातात. या क्रमांकांचा पल्ला एक ते वीसपर्यंत असतो. जितका गळ बारीक तितका त्याचा क्रमांक जास्त वरचा अशी पद्धत आहे. मोठ्या मुश्या किंवा तारमासे पकडण्याचे गळ खूपच मोठे असतात व त्यांना विशेष क्रमांक दिला जातो.

मासे गरविण्याची साधी पद्धत : लहान मासे पकडण्याचे गळ लहान व साधे परंतु सरळ किंवा वाकलेल्या दांड्यांचे असतात. अशा गळावर आमिष म्हणून गांडूळ, भिजलेल्या चिकट गव्हाचा किंवा नागलीचा आटा, भाजका जाडा फुटाणा यांपैकी एक चिकटवितात. गळ ठराविक खोलीपर्यंत बुडावा म्हणून त्यास लहानसे वजन बांधतात. याला ‘डुबके’ असे म्हणतात. तसेच तंरगण्यासाठी हलक्या लाकडाचा किंवा बोरूचा तुकडाही बांधतात. याला ‘तरंग्या’ असे म्हणतात. गळाला लावलेले आमिष माशाने तोंडात धरले किंवा तो ते ओढू लागला की, तरंग्या हलतो व पाण्यात जातो. यावरून मासा गळास लागला आहे हे समजते. मासा लहान असेल, तर गळदांडीला हिसका देऊन माशाला वर काढता येते पण मासा जर मोठा असेल, तर कदाचित तो दोरी तोडील व त्याला बाहेर काढणे कठीण जाईल म्हणून त्याला प्रथम दमवावा लागतो. गळाची दोरी सैल सोडून त्याला पळविणे व पुन्हा दोरी ओढणे असे काही वेळा केले म्हणजे मासा दमतो व नंतर त्याला खेचून बाहेर ओढून काढता येते. ही शेवटची क्रियाही काळजीपूर्वक करावी लागते कारण माशास पाण्याबाहेर काढले की, सुटून जाण्याचा अखेरचा जोरदार प्रयत्‍न तो करतो. तो सुटून जाऊ नये म्हणून एक लहान हातजाळे वापरावे लागते. माशाच्या तोंडात अडकलेला गळ काढण्याचे कामदेखील काळजीपूर्वक करावे लागते. काही माशांचे दात तीक्ष्ण असतात व तो चावण्याचा किंवा हे दात लागण्याचा संभव असतो. एखाद्या वेळी गळाचे तीक्ष्ण टोक हातात रुतण्याचीही शक्यता असते.

आमिषाचे प्रकार : गळाला लावण्याचे आमिष माशांना आकर्षक वाटले पाहिजे, या दृष्टीने जिवंत गांडूळ, बेडकांची पिले, झुरळे, लहान झिंगे, गोगलगाई, कीटकांच्या अळ्या व लहान मासे हे आमिषाचे प्रकार जास्त उपयुक्त आहेत. यांखेरीज गव्हाचा आटा, चण्याचे पीठ वा नागलीचे पीठ थोडे ओले करून व त्याच्या गोळ्या करून गळाला लावतात. या पिठात हिंगजिऱ्याची पूडही मिसळतात. कटला, रोहू यांसारखे काही मासे या पुडीच्या वासाने आकर्षित होतात. काही वेळा केळे, उंबर, फणसाचे गरे, भाजके खोबरे या खाद्यपदार्थाचाही आमिष म्हणून उपयोग केला जातो.

कित्येक माशांना पाण्याच्या पृष्ठभागावर बसणारे किंवा फिरणारे कीटक व फुलपाखरे आवडतात. अशा माशांकरिता जेव्हा या प्रकारचे जिवंत प्राणी मिळत नाहीत तेव्हा कृत्रिम फुलपाखरे किंवा त्यासारखी दिसणारी इतर कृत्रिम रचना आमिष म्हणून गळास लावली जाते [ आ. (ऊ)]. मत्स्यपारध करावयास जाताना अशी संख्येने पुष्कळ असलेल्या कृत्रिम आमिषांची पेटी अगर थैली बरोबर नेणे सोईचे पडते. अशी कृत्रिम आमिषे तयार करण्याचा एक स्वतंत्र व्यवसायच निर्माण झाला आहे. चकचकीत पत्र्याचा कृत्रिम मासा करून तो आमिष म्हणून गळाला बांधतात. याचप्रमाणे एखादा त्रिकोणी अगर लांबट पत्रा घेऊन, त्याला योग्य तो बाक देऊन गळास अडकविल्यास याचाही आमिष म्हणून उपयोग होतो. असा गळास बांधलेला पत्रा गळदांडीने पाण्यात ओढला, तर तो धावत्या माशासारखा दिसतो व यास फसून त्याकडे मोठे मासे आकर्षित होतात आणि त्यास चावा घेतला की, पकडले जातात. अशा आमिषाच्या प्रकाराला चमचा गळ (स्पून) असे म्हणतात [आ. (ऐ)]. चमचा गळाच्या ऐवजी कृत्रिम मासाही वापरता येतो. [आ. (ए)].

गळदोरी : मासे पकडण्यास योग्य अशी गळदोरी असणे आवश्यक आहे. ही दोरी शक्य तेवढी बारीक, पाण्यात सहजासहजी न दिसणारी व मजबूत अशी असली पाहिजे. पूर्वी या दोऱ्या रेशीम, वाख, ताग किंवा अंबाडी अशा धाग्यांपासून बनवित असत परंतु आता नायलॉनाचा धागा वापरतात. ही दोरी एकधागी किंवा बहुधागी नायलॉनाची बनविलेली असते. नायलॉनाच्या धाग्याची वजन पेलण्याची शक्ती भरपूर असते आणि तो बारीक व गुळगुळीतही असतो. गरविण्याच्या स्पर्धात ठराविक ताकदीचीच दोरी वापरली पाहिजे, असे बंधन असते. दोरी गुंडाळण्यास रिळाची योजना केलेली असेल, तर दोरी मऊ असली पाहिजे म्हणजे गुंडाळणे सोपे जाते. दोरीची लांबी सर्वसाधारणपणे २०० मी. असते पण यांपेक्षा जास्त असली तरी हरकत नसते.


गळदांडी : गळाची दोरी सांभाळणाऱ्या काठीस गळदांडी म्हणतात. ही चांगली मजबूत, निमूळती व पेलण्यास हलकी असावी लागते. या दांडीची लांबी साधारणतः ४ मी. असते. बुंध्याजवळ तिची जाडी २ सेंमी. असून टोकाकडे ती निमुळती होत जाते. पूर्वी ही दांडी विशिष्ट प्रकारच्या बारीक, भरीव व निमुळत्या टोकाच्या बांबूची बनवीत असत [आ. (अ)]. अजूनही कित्येक ठिकाणी अशाच प्रकारची दांडी वापरतात. सध्या नवीन पद्धतीने केलेल्या दांड्या प्रचारात आल्या आहेत. या दांड्यांत एकच सलग छडी नसते. तीऐवजी लाकडाच्या निरनिराळ्या बारीक छड्या धातूच्या वेष्टनाने जोडलेल्या असतात. या दांडीच्या मुठीला कॉर्कचे (ओक वृक्षाच्या बाह्य सालीच्या बुचाचे) वेष्टन असते. यामुळे दांडी घट्ट पकडणे शक्य होते. बारीक छड्या धातूंच्या वेष्टनाने जोडल्या जातात, त्या वेष्टनावरच कड्या बसवून त्यांमधून गळदोरी ओवून नेलेली असते [आ. (आ)]. अलीकडे तंतुरूप काचेच्या मजबूत, रेखीव, टिकाऊ व आकर्षक अशा दांड्या होऊ लागल्या आहेत. त्यांची किंमतही बरीच असते परंतु ज्यांना मासे गरविण्याचा छंद आहे व ऐपत आहे असे लोक या दांड्या पसंत करतात. गळास लागलेला मासा सदोष साधनामुळे निसटून जाऊ नये म्हणून जास्त किंमत पडली, तरी चांगली किंमती साधने वापरावी, असेच मासे गरविण्याचा छंद असणाऱ्यास नेहमी वाटते.

रीळ : लहान मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गळदांडीस मध्यम लांबीची म्हणजे सरासरी ८ ते १० मी. लांबीची दोरी चालते पण मोठा मासा गळास लागला म्हणजे प्रथम त्यास फिरवून दमवावा लागतो आणि हे करण्यास खूप लांब दोरी लागते. ही दोरी झटपट सोडणे व परत ओढणे आवश्यक असते. हे करण्यासाठी गळदांडीच्या मुठीजवळ चांगले रीळ, ते फिरविण्यासाठी मूठ व ठेवण्यासाठी डबीची योजना असावी लागते [आ. (आ-३ व ४)].गळास लागलेल्या माशाने पळावयास सुरूवात केली की, रिळावरची गुंडाळलेली दोरी उलगडू लागते. रिळावर बसविलेला अडसर दाबला की, दोरीचे उलगडणे थांबते व पर्यायाने माशाचे पळणेही थांबते. काही लांबीची दोरी गुंडाळून परत सोडली की, मासा पुन्हा पळू लागतो. ही क्रिया पुनःपुन्हा केल्याने मासा दमतो व मग त्याला वर खेचणे सोपे जाते. रिळाचा वापर सोईचा व्हावा म्हणून ते गळदांडीवर बसविलेले असते. ही रिळे करणाऱ्या निरनिराळ्या कंपन्या असल्यामुळे रिळांचे पुष्कळ नमुने उपलब्ध आहेत. प्रत्येक नमुन्यात काही तरी वैशिष्ट्य असते. रीळ जरूर त्या वेगाने फिरण्यासाठी दंतचक्रांची योजना केलेली असते. प्रत्येक मासे धरणारा आपल्या आवडीप्रमाणे गळदांडी व रीळ पसंत करतो. या पसंतीत त्या रिळावर किती लांबीची दोरी राहू शकते, रिळाची फिरविण्याची मूठ व अडसर या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

गरविण्याच्या पद्धती : गरविण्याच्या निरनिराळ्या पद्धतींत तीन पद्धती मुख्य आहेत. यांतील पहिल्या पद्धतीस फेकणी पद्धत (फ्लाय फिशिंग) असे म्हणतात. यात पाण्याच्या पृष्ठभागावर गळ दांडीच्या साहाय्याने आमिष लावलेला गळ फेकून लगेच उचलला जातो. या गळास बहुधा कृत्रिम माशी आमिष म्हणून लावतात. पाण्यावर पडलेला गळ उचलला की, चतुर किंवा फुलपाखरू पाण्यावर आले आहे असा भास होतो व त्यामुळे पृष्ठभागाखाली असलेले मासे आकर्षित होऊन गळ पकडतात. काही वेळा कृत्रिम आमिषाऐवजी गळास बूच किंवा तत्सम लाकडाचा हलका तुकडा बांधतात व गळ कुशलतेने पाण्यावर लांबवर फेकतात. या वेळी रिळावरचा अडसर काढलेला असतो व त्यामुळे रिळावरील दोरी भरभर सुटते. गळ लांब अंतरावर पाण्यावर पडला की, रिळाच्या मुठीच्या साहाय्याने दोरी गुंडाळली जाते. परिणामी गळावर असलेले बूच अगर लाकडाचा तुकडा पाण्याच्या पृष्ठभागावरून सरसर माशासारखा सरकत जातो. पृष्ठभागाखालील माशांना बेडूक, लहान मासा किंवा इतर लहान प्राणी तरंगत जात असल्याचा भास होतो आणि ते गळावर झडप घालतात व पकडले जातात. या दोन्ही प्रकारात हाताची व मनगटाची कुशलतेने हालचाल करावी लागते. या पद्धतीची मत्स्यपारध किनाऱ्यावरून किंवा होडीत उभे राहून करता येते.

दुसऱ्या पद्धतीस धावता गळ पद्धत (स्पून फिशिंग) असे म्हणतात. ही पारध होडीत बसून करतात. गळाला कृत्रिम आमिष बांधून गळ पाण्यात सोडतात व गळदांडी हातात धरून होडीस वेग दिला जातो. गळदांडीवरच्या रिळावरील दोरीही सोडली जाते. आमिष असलेला गळ होडीमागे ओढला गेला की, पळणाऱ्या कीटकाचा भास होतो आणि त्यास पकडण्यासाठी मासा त्याच्यावर झडप घालतो व परिणामी गळास लागतो. काही वेळा चमच्यासारख्या आकाराचा चकचकीत पत्रा गळास बांधतात. यास चमचा गळ म्हणतात. होडी सुरू करून हा चमचा गळ गळदांडीच्या साहाय्याने होडीपासून थोडा दूर पाण्यात धरला की, तो पाण्याच्या प्रवाहात फिरू लागतो किंवा कंप पावतो व माशासारखा दिसतो. याला मासे फसतात व गळास लागतात. यापद्धतीत काही वेळा गळाला रंगीत तंतूंची बनविलेली कृत्रिम माशी लावतात. अशा आमिषास, इंग्रजीत ‘जिग’ म्हणतात. जिगच्या मागे फिरती कडी लावतात. त्यामुळे जिग पाण्यात फिरते व मासे आकर्षित करते. हा मत्स्यपारधीचा प्रकार पुष्कळ लोकप्रिय आहे.

तिसऱ्या पद्धतीस स्थिर गळ पद्धती म्हणतात. या प्रकारात गळाला आमिष लावून तो पाण्यात बुडकी व तरंग्या यांसह स्थिर असा लोंबकळत ठेवतात आणि मासा त्या आमिषावर केव्हा झडप घालतो याची वाट पाहत बसतात. ही सर्वांत साधी व जास्त प्रचारात असलेली पद्धत असून यायोगे किनाऱ्यावरून किंवा होडीत बसून मत्स्यपारध करता येते. या पद्धतीत जास्त साधने लागत नाहीत. मासे हमखास मिळावे म्हणून कित्येक वेळा ठराविक जागेवर पाण्यात भाताची शिते किंवा मसालामिश्रित पिठाच्या गोळ्या टाकतात. कटला, रोहू, मृगळ यांसारख्या माशांना मसाल्याच्या वासाचे विशेष आकर्षण असते व यामुळे ते या ठराविक जागेत येण्याची शक्याता वाढते. या जागेत आल्यावर गळावरचे आमिष हे आणखी एक आकर्षण असते. त्यावर झडप मारताच ते गळाला लागतात. निरनिराळी आमिषे वापरून मासे पकडले जातात.

छंद म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणून ट्यूना मासे पकडण्याची पद्धती फार मनोरंजक आहे. यात पुष्कळसे जिवंत लहान मासे समुद्रात फेकतात व ते खाण्यासाठी ट्यूना आले की, कानपा नसलेल्या जाड गळाने पकडून भराभर होडीत फेकले जाते.


गरविण्याच्या जागा :नदीतीरावर किंवा तलावाच्या काठी असलेल्या मोठ्या दगडावर बसून गळ टाकून माशाची वाट बघत बसणे किंवा होडीचा उपयोग करून नदीत किंवा तळ्यात मध्यावर जाऊन गळ टाकणे हे दोन प्रकार सर्वसाधारणपणे आढळतात. सागरी मत्स्य पारधीतही समुद्राच्या किनाऱ्यावर बसून किंवा होडीतून दूरवर जाऊन गळ टाकळे जातात. गळ टाकण्यापूर्वी माशांची वर्दळ कोणत्या ठिकाणी आहे याचा अंदाज घ्यावा लागतो या ठिकाणी शांतता असणेही आवश्यक असते. नदीवर किंवा तलावावर जेथे गायीगुरे पाणी पिण्यास येतात किंवा जेथे पाण्यावर पालापाचोळा पडलेला असून उजेड कमी असतो अशा ठिकाणी माशांची ये – जा सतत असते. संथ पाण्यात जास्त मासे आढळतात. जागा ठरविण्याच्या बाबतीत वैयक्तिक अनुभवास फार महत्त्व असते. नदीत किंवा तळ्यात मध्यावर जाऊन जर मत्स्यपारध करावयाची असेल, तर त्याला होडीची आवश्यकता असते. होडीला जर एंजिन जोडलेले असेल, तर वल्ही मारून होडी चालविण्याचा प्रश्नच येत नाही. पाहिजे तेथे थोड्या वेळात जाता येते व मोकळ्या हवेत राहण्याचा आनंद लुटता येतो. समुद्रावर जावयाचे असले, तरी होडी मोठी व एंजिनही जास्त अश्वशक्तीचे असणे आवश्यक असते. या होडीवर प्राणरक्षक साधने आणि स्वयंपाकाच्या व इतर सर्व सुखसोयी असणे फायद्याचे असते. काही हौशी मत्स्यपारधी ४ – ६ दिवस होडीने फिरतात आणि बागबीर, मुशी (शार्क), तारमासे, ट्यूना यांसारखे मोठे व वजनदार मासेही पकडून आणतात.

नदीत किंवा तळ्यात मत्स्यपारध करणे व समुद्रात मत्स्यपारध करणे यांत फरक आहे. दोन्ही प्रकारच्या पारधीत मूलतत्वे सारखीच आहेत पण परिस्थितीत मात्र पुष्कळ फरक आहे. समुद्रावरचे हवामान, किनाऱ्याजवळची भरती – ओहोटी, माशांच्या विविध जाती, त्यांची लांबी, वजन व आकारमान या सर्व गोष्टींचा विचार मत्स्यपारध्यास गळ टाकण्यापूर्वी करावा लागतो. किती वजनाचा व किती मोठा मासा गळास लागेल हे अनिश्चित असते. या सर्व अनिश्चिततेस तोंड देऊनही अमेरिका, ऑस्ट्रेलिया व यूरोपातील बहुसंख्य देशांच्या मत्स्यपारध्यांनी गळाने अजस्त्र मासे पकडून या छंदातील उच्चांक प्रस्थापित केले आहेत.

गरविण्यास लागणारी अन्य साधने : गळ, दोरी, गळदांडी, रीळ वगैरे साधनांचा निर्देश वर केलाच आहे. यांखेरीज इतरही काही गोष्टी आवश्यक आहेत. जर मत्स्यपारध होडीत बसून जलाशयात किंवा समुद्रात दूरवर जाऊन करावयाची असेल, तर वल्ही व बाह्य एंजिन यांनी सुसज्‍ज अशी चांगली होडी असणे आवश्यक आहे. या होडीत मासे ओढण्यासाठी हातजाळे, मासे ठेवण्यासाठी करंडा, एखादा स्प्रिंग तराजू व मोजपट्टी होडी असावीत. हा कार्यक्रम बरेच दिवस चालणार असेल, तर होडीत पिण्याच्या पाण्याचा व अन्नाचा पुरवठाही पुरेसा असला पाहिजे. होडी दूरवर नेऊन गोड्या पाण्यात खोल आढळणारे महसीरसारखे बलवान मासे पकडावयाचे असतील किंवा उघड्या समुद्रातील तारमासे किंवा मुश्या पकडावयाच्या असतील, तर कधीकधी तासन्तास बसावे लागते. यासाठी पुढेमागे सरकणारी विशिष्ट प्रकारची खुर्ची होडीवर असावी. तसेच काठीला आधार देण्यासाठी खोबणी असलेल्या चामड्याचे अगर इतर प्रकारचे मजबूत हातमोजे, दुर्बिण व थोडीफार उपयुक्त औषधेही होडीवर असावीत.

गरविण्यास योग्य मासे :सर्वच मासे गळ पकडतात असे नाही. जे मासे आपल्या खाद्यावर झडप घालून आपले अन्न पकडतात व नंतर ते गिळतात असे मासे या छंदात जास्त उपयुक्त ठरतात. अशा माशांत ट्राउट व सामन हे प्रसिद्ध आहेत. यांची उत्पत्ती आता निरनिराळ्या देशांत होऊ लागली आहे. भारतातील नद्यांच्या डोहांत सापडणारा व कधीकधी तलावांतही आढळणारा महसीर (टॉर टॉर, टॉ. पुटीटोरा, टॉ. खद्री इ. यांपैकी टॉर टॉर या जातीला पुणे – सातारा भागात खडशी म्हणतात) हा मासा गरविण्याच्या छंदात प्रख्यात आहे. गालर (बॅरिलियस बोला) किंवा बुंगरा या उत्तर भारतात आढळणाऱ्या माशास इंडियन ट्राउट असे म्हणतात. हा मासा आकारमानाने लहान, सु. १५ सेंमी. पर्यंत लांब असला, तरी आमिष म्हणून वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम माशीवर झटकन झडप घालतो व खऱ्या ट्राउटप्रमाणे लढत देतो. यामुळे गळकऱ्यास याची पारध करणे फार आवडते. खाडीच्या तोंडाजवळ किंवा खडकांच्या समूहात आढळणारे रावस व जिताडा (भेक्ती, भेकटी) हे मासेही गरविण्यास चांगले असतात. भारतातील नदी – तलावाच्या गोड्या पाण्यात आढळणारे मरळ, वडशिवडा व शिंगाळा हे मासे जिवंत आमिष लावून पकडले जातात. कटला, मृगळ व रोहू हे सूक्ष्मजीवांवर जगणारे मासे पकडण्यासाठी मसालामिश्रित ओला आटा, भजी, गांडूळ, केळी अशी आमिषे वापरतात. असले अन्न तोंडात धरून चघळू लागण्याचा प्रयत्‍न मासा करीत असताना जर कुशलतेने गळास झटका दिला, तर गळ त्याच्या तोंडात अगर गळ्यात अडकतो व मासा पकडला जातो. कधीकधी हा गळ त्याच्या तोंडात न अडकता गालावर अगर परामध्येही अडकतो. खरबी, तिलापिया, शिंगटी, कोय, मागूर इ. लहान मासे गांडुळासारख्या आमिषावर आकर्षित होतात व परिणामी पकडले जातात.

अमेरिकेतील बास, क्रॉपी, सामान, ट्राउट, टार्‍पन, पाइक, हेकरू, तांबुसा, कॉड व हॅलिबट हे मासेदेखील छंद म्हणून गळाने पकडले जातात. ट्राउट हा मासा अमेरिका, ब्रिटन या देशांतून आणवून ऑस्ट्रेलियातील निरनिराळ्या लहानमोठ्या वाहत्या व स्थिर जलाशयांत केवळ गरविण्यासाठी सोडण्यात आला आहे. तेथे या माशाचे प्रजननही होत असते. ऑस्ट्रेलियात समुद्रातील हेकरू, ब्‍लॅक मार्लिन, ब्‍ल्‍यू मार्लिन, बागबीर, मुशी यांसारखे मोठे मासे गळाने पकडतात. जपान, फिलिपीन्स, थायलंड या देशांतही गळाने मासे पकडण्याचा शौक मोठ्या प्रमाणावर आढळतो.


गरविण्यास योग्य मासे 

माशाचे चालू नाव

शास्त्रीय नाव

वसतिस्थान

वजन (किग्रॅ.)

गोड्या पाण्यातील मासे 

बार्बेल

बार्बस बार्बस

नॉर्वे, स्वीडन,फिनलंड, आयर्लंड यांखेरीज इतर बहुतेक यूरोपियन व आशियाई देश.

४ – ५

ब्‍लॅक बास (लार्जमाऊथ) 

मायकॉप्टेरस सामॉडिस

उत्तर अमेरिका, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, केन्या, फ्रान्स, स्पेन.

१ – २

सिल्व्हर ब्रीम

ब्‍लायका ब्यूर्नका

यूरोपियन देश

३ – ४

कॉमन कार्प

सायप्रिनस कार्पिओ

यूरोपियन देश, आग्‍नेय आशिया.

६ – ९

डोराडो

साल्मिनस मॅक्सिलोसस

दक्षिण अमेरिका

६ – ९

ईल (अहिर)

अँग्विला अँग्विला

यूरोप व अमेरिका, भारत.

ॲलिगेटर गार

लेपिसोस्टीअस स्पॅट्यूला

उत्तर अमेरिका

१५ – २५

हुकेन

साल्मो हुको

डॅन्यूब नदी

५ – ९

महसीर

टॉर वंशीय जाती

भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका.

१० – ५४

कटला

कटला कटला

भारत, पाकिस्तान.

१० – १८

रोहू

लेबिओ रोहिटा

भारत, पाकिस्तान.

४ – १०

मृगळ

सिऱ्हिनस मृगाला

भारत, पाकिस्तान.

३ – ८

अटलांटिक सामन

साल्मो सलार

उत्तर अमेरिका, यूरोप, रशिया.

७ – ९

चिनूक सामन

ऑकोऱ्हिकस ट्‍वाचा

उत्तर अमेरिका, न्यूझीलंड.

१८ – २७

व्हाइट स्टर्जन

एसिपेन्सर ट्रान्समाँटॅनस

उत्तर अमेरिकेचा पॅसिफिक किनारा

२७

ब्रुक ट्राउट

साल्व्हेलिनस फॉर्टिनॅलिस

उत्तर व दक्षिण अमेरिका, उत्तर यूरोप, दक्षिण आफ्रिका.

०.५ – ५

ब्राउन ट्राउट

साल्मो ट्रुटा

सर्व यूरोपियन देश, उत्तर व दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया.

लेक ट्राउट

साल्व्हेलिनस नामायकुश

उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग

५ – ६

रेनबो ट्राउट

साल्मो गार्डनेरी

उत्तर अमेरिका व यूरोप.

०.५ – १

स्टीलहेड ट्राउट

साल्मो गार्डनेरी

कॅलिफोर्निया ते अलास्का, उत्तर अमेरिकेतील महासरोवरे.

५ – ६

सी ट्राउट

साल्मो ट्रुटा

यूरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड.

२.४

टायगर फिश

हायड्रोसियान लिनिएटस

मध्य आफ्रिका

५ -७

मरळ

चाना मरूलियस

भारत, पाकिस्तान.

२ – १०

वाली

वॉलॅगो अट्‍टू

भारत, पाकिस्तान.

४ – १५

इंडियन ट्राउट 

(गालर)

बॅरिलियस बोला

उत्तर  भारत, पाकिस्तान.

१ – २


सागरी मासे 

अल्बकोर ट्यूना

थन्नस आलालुंगा

पॅसिफिक व अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र.

१० – १४

अंबरजॅक

सिरिओला

पॅसिफिक व अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र.

२३ – २७

बॅराकुडा

स्फिरीना

पॅसिफिक व अटलांटिक महासागर.

१४ – १६

जायंट सी बास

स्टेरिओलेपीस गिगॅस

कॅलिफोर्निया

१४०

पट्टेरी बास

रॉक्सस सॅक्सॅटिलीस

कॅलिफोर्निया

२० – २३

कॉड

गॅडस मोऱ्हुआ

उत्तर अटलांटिक महासागर

२० – २३

डॉल्फिन फिश

कॉरिफीना हिप्पुरस

कॅलिफोर्निया,कॅरिबियन,भूमध्य समुद्र, ऑस्ट्रेलिया (पाण्याचे तापमान २१ से. पर्यंत पोहचणाऱ्या भागात).

१६ – १८

हॅलिबट 

हिप्पोग्‍लॉसस हिप्पोग्‍लॉसस 

उत्तर अटलांटिक महासागर 

२० – ४५ 

फ्लाउंडर 

प्‍लॅटिक्थीस फ्‍लेसस 

उत्तर अटलांटिक महासागर 

०.५ – १ 

ज्यू फिश 

एथिनिफेलस इटाजारा 

विषुववृत्ताच्या आसपासचे पॅसिफिक व अटलांटिक महासागर. 

८० – १४० 

लिंग 

मोल्व्हा मोल्व्हा 

उत्तर अटलांटिक महासागर 

८ – १४ 

किंग मॅकेरेल 

स्काँबरमोरस कॅव्हेला 

कॅरिबियन समुद्र 

१६ – १८ 

अटलांटिक ब्ल्यू 

मार्लिन 

मॅकैरा निग्रिकॅन्स 

मध्य-पश्चिम अटलांटिक व कॅरिबियन समुद्र. 

९० – ११० 

ब्‍लॅक मार्लिन 

मॅकैरा इंडिका 

उष्ण कटिबंधातील पॅसिफिक व हिंदी महासागर 

१०० – २३० 

व्हाइट मार्लिन 

मॅकैरा अल्बिडा 

हम्बोल्ट प्रवाहामधून

३५ – ४०

अटलांटिक सेल

फिश

इस्टिओफोरस

अल्‍बिकान्स

उष्ण कटिबंधातील अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर

२५ – ३०

पॅसिफिक सेल फिश

इस्टिओफोरस अल्बिकान्स

हिंदी व पॅसिफिक महासागर

४० – ५५

स्वोर्ड फिश

झिफिअस ग्‍लेडियस

सर्व उष्ण कटिबंध

१०० – १६०

टार्‍पन

मेगॅलॉप्स

कॅरिबियनला मिळणाऱ्या नद्यांची मुखे व पश्चिम आफ्रिका.

४० – ५५

यलोफिन ट्यूना

थन्नस अल्बाकॅरिस

सर्व उष्ण कटिबंध

२० – ३५

बिग-आइड ट्यूना

थन्नस ओबेसस

सर्व उष्ण कटिबंध

३० – ७९

ब्ल्यूफिन ट्यूना

थन्नस टायनस

सर्व उष्ण कटिबंध

२५ – ३५

ब्ल्यूफिन ट्यूना

(जायंट)

थन्नस टायनस

सर्व उष्ण कटिबंध

२७० – ३२०

वाहू

ॲकँथोसिबियम सोलँडेरी

सर्व उष्ण कटिबंध

१५ – २३

यलोटेल

सिरिओला डॉर्सेलिस

हिंदी व पॅसिफिक महासागर

१० – १६

इंडियन सामन

(रावस)

पॉलिनीमस टेट्राडॅक्टिलस

भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश.

८ – १०

भेक्ती किंवा खजुरा

लॅटेस कॅल्कॅरिफेर

भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश.

४० – ११०

हेकरू (ग्राउपर)

एपिनिफेलस लँसिओलेटस

भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश.

४० – २००

गरविलेल्या माशांपैकी मोठ्या माशांची मापे, वजने व इतर माहितीही नोंदली जाते. या प्रकारची काही ठळक माहिती कोष्टकात दिली आहे.


गरविण्याच्या वेळा : सूर्योदय व सूर्यास्त या वेळचा संधिकाळ मासे गरविण्यास चांगला असतो. या वेळी सूर्याचे किरण तिरके असतात व प्रकाशही फार तीव्र नसतो. तिरक्या किरणांमुळे गळावरचे आमिषही स्पष्ट दिसते. या काळात पाण्यावरील कीटकांची हालचालही जास्त प्रमाणात असते. यामुळे या वेळी मासेही अन्न शोधण्यासाठी इतस्ततः पाण्यात संचार करीत असतात. इतर वेळी जरी मासे गळास लागत असले, तरी या वेळी ते गळास लागण्याचा संभव कितीतरी पटींनी जास्त असतो. विशेषतः नदीकाठी, तलावाच्या काठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर मत्स्यपारध करताना हे प्रकर्षाने जाणवते. समुद्रात भारतीच्या वेळी गळाने मत्स्यपारध केल्यास जास्त मासे मिळण्याचा संभव असतो. संधिकाली नदीकिनारी वा समुद्रकिनारी फिरणे ही आल्हाददायक असल्यामुळे गळकरी ही वेळ पसंत करतात.

मत्स्यपारध छंदाचा शास्त्रीय उपयोग :हा छंद असणाऱ्यांना मोकळ्या हवेत व निसर्गाच्या सान्निध्यात बराच काळ रहावे लागते. यामुळे त्यांना नुसता मासे पकडल्याचाच आनंद मिळतो असे नाही, तर त्यांची शरीरप्रकृती व आरोग्य उत्तम राहते. काही सुज्ञ गळकरी या छंदात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवतात. आपल्या रोजनिशीत ते माशांच्या स्वभावाचे निरीक्षण, त्यांचा जीवनवृत्तांत, त्यांचे प्रजनन, माशांची लांबी, वजन, त्या वेळचे हवामान वगैरेंची नोंद ठेवतात. एच्. एस्. टॉमस, एस्. जे. मॅक्डॉनल्ड यांसारख्या गळकऱ्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर पुस्तके लिहिले आहेत व ती मत्स्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आधारभूत ठरली आहेत. समुद्रावर कोणते मासे कोणत्या काळात व कोठे मिळतात, त्याचे त्या वेळी आकारमान केवढे होते, मादीच्या उदरात अंडी कोणत्या ऋतूत असतील वगैरे माहितीवर माशांचे स्थलांतर,प्रजननाचा हंगाम वगैरेंसंबंधी अनुमान काढता येते. गळकरी पुष्कळ असल्यामुळे त्यांनी संकलित केलेल्या माहितीचा शास्त्रज्ञांना उपयोग होतो.

मत्स्यपारधीचे इतर प्रकार : गळाने मासे पकडण्याच्या छंदाखेरीज बंदुकीने वा तिरकमठ्याने व भाल्याने मासे मारणे हाही एक छंद आहे. मरळसारखे मासे हवा घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात त्या वेळी त्यांच्यावर नेम धरून बंदुकीने किंवा तिरकमठ्याने त्यांना मारणे शक्य होते. तसेच पावसाळी मासे उथळ पाण्यातून पृष्ठभागाजवळून जात असताना भाल्याने त्यांची शिकार करता येते. काही पक्ष्यांच्या (उदा., पाणकावळा) साहाय्यानेही मासे पकडले जातात. पाण्यात बुडी मारून मासे पकडण्यात हे पक्षी पटाईत असतात. अशा पक्ष्याला जर माणसाळविले, तर शिकारी कुत्र्याप्रमाणे तो पाण्यात डुबी मारून मासा पकडतो व आपल्या धन्याकडे घेऊन येतो.पकडलेला मासा पक्ष्याने गिळू नये म्हणून त्याच्या गळ्याला दोरी बांधली जाते. पक्ष्याने मासा पकडला की, दोरीने मालक त्याला आपल्याकडे ओढतो व त्याच्या तोंडातील मासा काढून पुन्हा त्याला सोडण्यात येते. अशा तऱ्हेची मत्स्यपारध पंधराव्या शतकापासून चीनमध्ये अस्तित्वात आहे. हा छंद असणारे पुष्कळ लोक चीन व जपानमध्ये आहेत.

खोल पाण्यात बुडी मारून, मौजेखातर किंवा शास्त्रीय निरीक्षणासाठी भाल्याने मासे मारणे हा एक मत्स्यपारधीचा आधुनिक प्रकार आहे. या प्रकारात पाणबुड्याच्या पाठीवर एक लहान हवेची पिशवी बांधलेली असते. या पिशवीतून नाकात हवा घेतली जाते. पाणबुड्याच्या डोळ्यावर एक घट्ट चष्मा असतो व पायात रबरी पंखासारखे बूट असतात. हे पाणबुडे जेथे स्वच्छ पाणी असते तेथे बुडी मारतात आणि खोल भागात खडकात जेथे हेकरू वगैरेंसारखे मासे असतात त्यांना भाल्याने जखमी करून वर आणतात. या पारधीस शौर्य आणि धाडस लागते पण यातही या शूर लोकांना खूप आनंद वाटतो.

पहा : छंद मत्स्य वर्ग मत्स्योद्योग शिकार.

संदर्भ : 1.Cretin,E. Lacy, G. H. The Angler’s Handbook for India,1915.

            2.Gabri Ison, I. N., Ed.,The Fisherman’s Encyclopaedia, New York, 1958.

            3. Greenaway, W. C. The Way to Better Angling,New York, 1954.

            4. McClane, A. J., Ed., McClane’s Standard Fishing Encyclopaedia and International Angling Guide, New York, 1965.

            5. Venables, B. Angler’s Companion, New York, 1958.

कुलकर्णी,चं. वि.