मणिपुरी (मेईथेई) भाषा : मणिपुरी ही मणिपूर राज्याची प्रमुख भाषा. मणिपूरमध्ये जरी इतर अनेक बोली प्रचारात असल्या तरी मणिपुरी भाषा राज्यात सर्वत्र बोलली जाते आणि सर्वांना समजते. मणिपुरी भाषेचा इतिहास तीन – चार शतके मागे जातो.
प्राथमिक शिक्षणापासून निम्नबमाध्यमिक शिक्षणापर्यंत (म्हणजे आठवीपर्यंत) शिक्षणाचे माध्यम म्हणून मणिपुरीचा उपयोग केला जातो. एक स्वतंत्र विषय या रूपात पदव्युत्तर स्तरापर्यंत तिच्या अध्ययन व अध्यापनाला काही विद्यापीठांतून प्रारंभ झाला आहे. शासकीय कारभारासाठीही मणिपुरीचाच राज्यभर उपयोग केला जातो. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे मणिपुरी भाषकांची संख्या ६,७८,३८५ इतकी आहे.
मणिपुरी भाषक आसामचा काही भाग व बांगला देश येथेही आहेत. मणिपुरच्या खोऱ्यात राहणारे लोक स्वतःला ‘मेईथेई’ म्हणवतात. बंगाली लोक त्यांना ‘मोगलई’, आसामी ‘मेकले’ किंवा ‘मेरवली’ व थादौ ‘मेइलेई’ नावाने ओळखतात.
तिबेटो – ब्रह्मी भाषासमूहापैकी कुकि – चीन भाषासमूहात मणिपुरीचा एक उपगट मानावा लागतो. मणिपुरीचे महत्त्व सबंध समूहात सर्वांत जास्त आहे. कारण याचे वर्णन शान वंशीय राजांच्या बखरीत (इ. स. ७७७) मिळते. मणिपुरीचे प्राचीन साहित्य इंफाळच्या बोलीत विकसित झाले आहे. मणिपुरीच्या इंफाळ बोलीचा प्रमाण भाषेच्या रूपात वापर केला जातो परंतु मणिपुरीच्या इतर बोली मणिपूरच्या पूर्व, पश्चिम तसेच दूरवरच्या उत्तर व दक्षिण भागांत आढळतात. भाषेच्या दृष्टीने मणिपुरीचे एकीकडे ⇨ ब्रह्मी भाषेशी तर दुसरीकडे ⇨ तिबेटी भाषेशी साम्य आढळते.
मणिपुरीची स्वतःची मेईथेई म्हणून लिपी होती परंतु अठराव्या शतकाच्या शेवटी बांगला वा ⇨ बंगाली लिपीचा वापर लिखाणासाठी होऊ लागला. आधुनिक मणिपुरी साहित्य बांगला लिपीतच लिहिले जाते. जुनी लिपी जाणणारे काही विद्वान आहेत. मूळच्या साहित्याव्यतिरिक्त संस्कृत बंगालीमधील अनेक प्रमाणग्रंथांचा मणिपुरी अनुवाद उपलब्ध झाला आहे. जुन्या लेखनातून ग, द, ब आणि ज हे ध्वनी अनुक्रमे क, त, प आणि छ असे लिहिले आहेत. आधुनिक बंगाली लिपीतही काही अनियमितपणा आढळतो. शब्दांच्या अंती ब, द, ग, र हे ध्वनी आले तर त्यांचा उच्चार होत नाही. काही वेळा ल आणि न यांची अदलाबदल होते. उदा., सा – गोल किंवा सा – गोन = घोडा. भ, ध, झ, घ, व, श इत्यादी व्यंजने आर्य भाषांतून घेतलेल्या शब्दांत आढळतात. कोणत्याही वस्तूचा भाग किंवा अंश याकरिता शब्दाबरोबर संबंधसूचक सर्वनाम पूर्वप्रत्यय म्हणून जोडतात. उदा., इ – पा = ‘माझे वडील’ मा – खुत = ‘त्याचा हात’ इत्यादी.
मणिपुरीत लिंग ही व्याकरणाची कोटी नाही. पशूंच्या बाबतीत लिंगभेदासाठी काही प्रत्यय लावले जातात. उदा., ला – बा = ‘नर’ अ – मोम = ‘मादी’. उदा., सा – गोल – ला – बा (नर घोडा) सा – गोल – अ – मोम (घोडी). माणसांच्याकरिता वचन निदर्शक प्रत्यय सिंग किंवा सींग उदा., मा – माइ – सिंग = ‘त्याचे नोकर’. पुष्कळ, सर्व, प्रत्येक इ. अर्थ व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रत्ययांचा वापर केलेला दिसतो. उदा., पुम – ना – मक = ‘सर्व’ मा – याम = ‘पुष्कळ’ खी – पिक = ‘प्रत्येक’.
संबंध दर्शविणारा प्रत्यय ‘गी’ नामानंतर जोडला जातो. उदा., न – पा – गी – पुम = ‘आपला वडिलांचे घर’ म – दु – गी – म – मन = ‘त्याची किंमत’. इतर सर्व कारक संबंध शब्दयोगी अव्ययाद्वारा स्पष्ट केले जातात.‘दा’, मे, हे (– च्या कडे), गा – (– च्या बरोबर), माङ् – दा (– च्या समोर), तुङ् – दा (– च्या मागे), नुङ् – दा (– च्या आत). दा – गी (– ला, – प्रति) इ. अव्यये वापरली जातात.
वचन व पुरूष यांबाबतीत क्रियापदात बदल होत नाही. वर्तमान व भूतकाळातील बदल काही प्रत्ययानुसार दाखवला जातो. काही वेळा तर भेद संदर्भानेच कळतो. भूतकाळासाठी इ, ए, नी, ली इत्यादी प्रत्ययांचा वापर आढळतो.‘निङ् – ए’ म्हणजे ‘त्याने इच्छिले’ इत्यादी.
भविष्यकाळासाठी ‘ग’ प्रत्ययाचा उपयोग केलेला दिसतो. उदा., अई ओई – ग – नि = ‘मी असेन’. आज्ञार्थासाठी ‘उ’ किंवा ‘लू’ प्रत्यायाचा उपयोग केलेला दिसतो. उदा., पी – पूल – उ म्हणजे ’बांधा’. नकारात्मक आज्ञार्थासाठी ‘ग – नु’ हे प्रत्यय वापरतात. उदा., छत – क – नु = ‘जाऊ नको’ कक – थप – पी – ग – नु = ‘कापू नको’. क्रियावाचक नाम वा किंवा पा या प्रत्ययामुळे समजते.
मणिपुरीत संयुक्त क्रियापदे पुष्कळ आहेत. सामान्यतः वाक्यातील शब्दांचा क्रम असा – कर्ता, कर्म व क्रियापद. उदा., ‘मी अ – म– गि म – छा – नि – पा अ – नी लई – रम्मी’ (शब्दशः माणूस एकाचे त्याचे – संतान – नर दोन होते अर्थ : एका माणसाला दोन मुलगे होते).
पूर्वीच सांगितले आहे की भ, ध, घ इत्यादी ध्वनी आर्यभाषांतून घेतलेल्या शब्दांत आढळतात. उदा., अभ्यास – सतत क्रिया, संध्या – संध्याकाळ, भ्रम – संशय, ध्रुव – एक तारा, धन – दौलत, धनु – धनुष्य, धर्म – कर्तव्य, भूमि – जमीन, भारी – वजनदार इ. शब्द आर्यभाषांतून घेतलेले आहेत किंवा हे सरळ संस्कृतमधून घेतले असतील किंवा पुन्हा असमिया – बंगालीच्या संपर्काने घेतले असतील परंतु हे खरे आहे की संस्कृत व बंगालीचा प्रभाव मणिपुरीवर दिसतो.
पहा : तिबेटी – ब्रह्मी भाषासमूह.
संदर्भ : 1. Damant, G. H. “Note on the Old Manipuri Character,” Journal of the Asiatic Society of Bengal, Vol. X/vi, Part i, (PP36 ff with two Plates), Calcutta, 1877.
2. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol III, Part III, Calcutta, 1909.
3. Singh, N. Khelchand, Manipuri to Manipuri and English Dictionary, Imphal, 1964.
4. Primrose, A. J. A Manipuri Grammar Vocabulary and Phrase Book to Which are Added Some Manipuri Proverbs and Specimens of Manipuri Correspondence, Shillong, 1888.
शर्मा, सुहनूराम (हिं.) रानडे, उषा (म.)