मटकी : (मठ हिं. मोट गु. मठ, मट क. मडिके सं. मुकुष्टक, वनमुग्द इं. ॲ्कोनाइट बीन, मट अथवा मॉथ बीन लॅ. विग्ना ॲकॉनिटिफोलिया कुल – लेग्युमिनोजी उपकुल – पॅपिलिऑनेटी). हे एक वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) व लागवडीतील कडधान्य आहे. याचा वेल किंवा झुडूप मूळचा भारतातील असून भारतात सर्वत्र (हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत वायव्य भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत) आढळतो रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. विग्नार या वंशात हल्ली ⇨ मूग, ⇨ उडीद, ⇨ तूर,
⇨ चवळी यांचा समावेश केलेला असून त्यांच्याशी साम्य आढळल्याने आता त्या वंशात मटकीचाही समावेश करतात. ह्या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर बारीक केस तुरळकपणे असून पाने सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), संयुक्त व त्रिदली असतात प्रत्येक दलाचे तीन ते पाच विभाग (दलके) असतात. उपपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात शिंबा (शेंगा) लहान, गोलसर व २.५ – ६ सेंमी. लांब असून त्यांत ६ – १२, किंचित लांबट (४ X २ मिमी.) व पिंगट बिया असतात प्रत्येक बीजात दोन जाड व लांबट दलिका असतात व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. फुलाची संरचना साधारणपणे ⇨ अगस्ता किंवा वाटाणा यांच्या फुलांप्रमाणे पतंगरूप असते स्वपरागणाने (एकाच फुलातील पराग व स्त्री – केसराचा– किंजल्काचा – संपर्क होऊन) बीजोत्पादन होते. वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. बियांचा (विशेषतः बियांना मोड आणून त्यांचा) जेवणात वापर करतात ते महत्त्वाचे अन्न आहे. मटकीत जलांश १०.८%, प्रथिने २३.६%, वसा (स्निग्ध पदार्थ) १.१%, तंतू ४.५% व इतर कार्बोहायड्रेटे ५३.५% आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. तिच्यात कॅरोटीन, थायामीन, रिबोफ्लाविन, निॲकसीन आणि क ही जीवनसत्त्वे असतात. मोड आलेल्या बियांत क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. मूग, उडीद व मटकी यांच्या बिया तेलावर भाजून (तिखट – मिठासह) केलेल्या पदार्थास ’दाल मोठ’ म्हणतात.
मटकीची मुळे मादक असतात ज्वरात मटकी पथ्यकर आहे. मटकी वाजीकर (कामोत्तेजक), पित्तविकाररोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहे. सुश्रुतसंहितेत मटकीचा उल्लेख ‘वनमुग्द’ या नावाने आला आहे.
परांडेकर, शं, आ.
हे पीक मुख्यत्वेकरून भारतातच कोरडवाहू पीक म्हणून लागवडीत आहे. भारतातील लागवडीखालील एकूण क्षेत्र निरनिराळ्या वर्षांत १७ ते २० हेक्टर असते. सर्वांत जास्त म्हणजे सु. १५ लक्ष हेक्टर क्षेत्र राजस्थानात आहे. त्या खालोखाल ते मध्य प्रदेश (मुगाखालील क्षेत्र धरून सु. २ लक्ष हेक्टर) आणि महाराष्ट्र (सु. १.३१ लक्ष हेक्टर) या राज्यांत आहे. गुजरात, जम्मू व काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटक या राज्यांतही मटकीची थोड्याबहुत प्रमाणात लागवड होते.
इतर कडधान्यांपेक्षा हे पीक जास्त चिवट व दुष्काळी परिस्थितीला प्रतिकार करणारे आहे. याचे वेल जमिनीसरपट दाट वाढून जमीन झाकून टाकतात म्हणून या पिकाचा उपयोग जमिनीची धूप थांबविण्यासाठीही करतात. कधीकधी हिरवळीच्या खतासाठीही हे पीक पेरतात.
साधारणातः ५० ते ७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानात हे पीक चांगले येते. फार पावसामुळे याचे नुकसान होते. हलकी व वाळुसरा जमीन ह्या पिकाला जास्त मानवते परंतु हे खोल काळ्या अथवा मळीच्या जमिनीतही येऊ शकते.
हे पावसाळी हंगामातील पीक असून त्याची पेरणी जून – जुलै महिन्यात आधी तयार केलेल्या जमिनीत करतात. हे स्वतंत्र पीक म्हणून अथवा ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांत मिश्र पीक म्हणून घेतात. स्वतंत्र पिकासाठी हेक्टरी १० – १५ किग्रॅ. बी लागते व ते हाताने फोकून अथवा ओळीत पेरतात. मिश्र पिकासाठी २ ते १० किग्रॅ. बी लागते व ते मुख्य पिकाच्या बियांत मिसळून पेरतात किंवा मोघणीमधून मुख्य पिकात स्वतंत्र ओळीत पेरतात. व्यापारात याचे (१) काळी मटकी (काळी मुंगी) व पांढरट हिरवी मटकी (गोरा) असे दोन प्रकार मानले जातात. दुसरा प्रकार अधिक प्रमाणात प्रचलित असून काळा प्रकार कमी प्रमाणात (बहुशः हरियाणात व गुजरातमध्ये) लागवडीत आहे. या पिकाचे सुधारित प्रकार अद्याप फारसे उपलब्ध नाहीत.
पेरणीपासून साधारणतः तीन आठवड्यांनी पहिली व पुढे दोन आठवड्यांनी दुसरी कोळपणी करतात. रासायनिक खते सहसा दिली जात नाहीत परंतु फॉस्फरसयुक्त खत दिल्याने इतर कडधान्यांप्रमाणे मुळांवरील गाठींची वाढ होऊन जमीन सुधारते व पीकही चांगले येते.
ऑक्टोबरअखेर अथवा नोव्हेंबर महिन्यात हे पीक कापणीस तयार होते. शेंगा वाळल्यावर वेल कापून अगर उपटून इतर कडधान्यांप्रमाणे मळणी करतात. हेक्टरी सु. ५०० किग्रॅ. दाणे आणि सु. १,००० किग्रॅ. भुसा मिळतो.
या पिकाचे रोग व किडींपासून विशेष नुकसान होत नाही. केव्हा केव्हा पानावरील अळ्या कोवळी पाने व शेंगा खातात. उपद्रव सुरू होताच १०% बीएचसी भुकटी हेक्टरी २५ – ३० किग्रॅ. या प्रमाणात पिकावर पिस्कारतात.
ओल्या शेंगातील अथवा वाळलेले दाणे तळून अथवा उसळ करून खातात. पिठाचा उपयोग खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी करतात. कामाच्या जनावरांना भुसकट खाऊ घालतात परंतु दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने दूध कमी येते, असे मानले जाते.
आरगीकर,गो. प्र. गोखले, वा. पु.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol.X, New Delhi, 1976.
2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.
“