मझर – इ – शरीफ : अफगाणिस्तानातील बाल्ख प्रांताची राजधानी लोकसंख्या १,०३,३७२ (१९७९). उत्तर अफगाणिस्तानात सोव्हिएट रशियाच्या सरहद्दीपासून ५६ किमी. वर व बाल्ख या ऐतिहासिक नगराजवळच हे शहर वसले आहे. १८५२ मध्ये अफगाण अंमलाखाली होते. १८६९ मध्ये राजकीय दृष्ट्या याला विशेष महत्त्व होते. येथील उन्हाळे उबदार व हिवाळे सौम्य असतात. स्टेप प्रदेशावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मात्र काही वेळा शेळ्यामेंढ्यांच्या व गुरांच्या कळपांची खूप हानी होते. वसंत ऋतूतील हवामान आल्हाददायक असून आसमंत लाल व हिरव्या फुलांनी बहरलेला असतो. आसमंतात काराकुल मेंढ्यांची व उत्तम प्रतीच्या घोड्यांची पैदास केली जाते तसेच कापूस, धान्य व काही फळांचे उत्पादन घेतले जाते. काराकुल लोकरीच्या व्यापाराचे तसेच रेशीम, सुती कापड, गालिचे, कांबळी इत्यादींच्या निर्मितीचे हे प्रमुख केंद्र आहे. येथून रशियातील उझबेकिस्तान प्रजासत्ताकाशी मोठ्या प्रमाणावर आयात – निर्यात व्यापार चालतो.

‘मझर – इ – शरीफ’ म्हणजे ‘तीर्थस्थान’.येथील निळी मशीद प्रसिद्ध असून जवळच मुहंमद पैगंबर यांचे जावई चौथे ‘अली’ यांची कबर आहे.‘बुध काशी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका लोकप्रिय खेळासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. या खेळात प्रतिस्पर्धी घोडेस्वार संघांनी एका खड्ड्यातील बकऱ्याचे धड विशिष्ट ठिकाणी न्यावयाचे असते. येथील ‘लाल फुलांचा’ वासंतिक उत्सव एक पारंपरिक लोकोत्सव म्हणून उल्लेखनीय आहे. शहरात एक इस्लामी धर्मशास्त्रविषयक संस्था आहे. येथून जवळच देदादी हे लष्करी केंद्र आहे.

चौधरी, वसंत