मंते, आक्सेल मार्टिन फ्रेड्रिक : (३१ ऑक्टोबर १८५७-११ फेब्रुवारी १९४९). स्वीडिश साहित्यिक, डॉक्टर आणि मानसोपचारतज्ञ. ऑस्करशामन येथे जन्मला. शिक्षण अप्साला, माँटपील्यर आणि पॅरिस येथे. वैद्यकशास्त्रातली एम्.डी. ही पदवी पॅरिस येथून घेतल्यानंतर फ्रान्स व इटली ह्या देशांत त्यांने वैद्यकीय व्यवसाय केला स्वीडनमध्ये राजवैद्य म्हणूनही त्याने काम केले (१९०८-१९३०). आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे स्वीडनचा राजा गस्टाव्ह पाचवा, ह्याचा शाही पाहुणा म्हणून त्याने घालविली. स्टॉकहोम येथे त्याचे निधन झाले.
मंतेची वाङ्मयीन कीर्ती द स्टोरी ऑफ सान मिकेले (१९२९,स्वीडिश अनुवाद, १९३०) ह्या त्याच्या आत्मचरित्रात्मक इंग्रजी ग्रंथावर मुख्यतः अधिष्ठित आहे. काप्री बेटावरील सान मिकेले ह्या त्याच्या निवासस्थानाच्या नावावरून हे शीर्षक त्याने ह्या ग्रंथाला दिले आहे. फ्रान्समध्ये आणि इटलीतील पॅरिस, रोम, काप्री ह्यांसारख्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना त्याला आलेले विविध अनुभव ह्या ग्रंथात त्याने निवेदिले आहेत. त्यांतून त्याचे जोमदार व्यक्तिमत्त्व आणि रोगपीडितांबद्दल त्याला वाटणारी सहानुभूती ह्यांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. जागतिक मान्यता पावलेल्या ह्या आत्मकथनाचे अनुवाद अनेक विश्वभाषांतून झालेले आहेत. लेटर्स फ्रॉम ए मोर्निग सिटी (१८८७) आणि मेमरीज अँड व्हॅगरीज (१८९८) ही त्याची अन्य पुस्तके. त्यांत त्याच्या अनेक आठवणी आहेत. तथापि द स्टोरी ऑफ सान मिकेलेप्रमाणे ती यशस्वी झाली नाहीत. लेखनातून मंते ह्यास जो आर्थिक लाभ झाला, त्यातील बराचसा भाग गोरगरीबांस साहाय्य करण्यासाठी तसेच स्वीडन व काप्री येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये निर्मिण्यासाठी खर्च केला गेला.
देसाई, म. ग.