मका : (हिं. मकई, मक्का, भुट्टा गु. मक्काई क. मेक्केजोळा सं. महायावनाल इं. मेझ, इंडियन कॉर्न लॅ. झिया मेझ कुल-ग्रॅमिनी). एक महत्त्वाचे तृणधान्य. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलित वर्गातील ⇨ग्रॅमिनी कुलातील (तृण कुलातील) एक लागवडीतील जाती. मक्याचे मूलस्थान अमेरिका (मेक्सिको किंवा मध्य अमेरिका) हे असावे याबद्दल मतभेद असले, तरी सध्याच्या मक्याचा विकास त्याच्याशी संबंधित असलेल्या टेओसिंटे (यूक्लीना मेक्सिकांना हिंदी व पंजाबी नाव मक्चारी) या वन्य जातीपासून आदिमानवाने उपयुक्त उत्परिवर्तनांनी (आनुवंशिक लक्षणांत बदल घडवून आणण्याच्या क्रियांनी) व सतत निवड पद्धतीनेकेलेल्या अभिवृद्धीतून झालेला असावा, हे मत बरेचसे मान्यता पावलेले आहे. पेरू देशातील इंका लोकांच्या थडग्यांत आढळलेल्या मक्याच्या विविध प्रकारच्या दाण्यांवरून इंका संस्कृतीच्या कालापूर्वी अनेक शतके मका लागवडीत असावा असा निष्कर्ष निघतो (तथापि या प्रकारांचे स्वरूप सध्याच्या मक्यापेक्षा पुष्कळच निराळे होते असे आढळून आले आहे). त्यानंतर त्याचा प्रसार उत्तरेकडील प्रदेशात होऊन माया व ॲझटेक या संस्कृतींत मक्याने महत्त्वाचे स्थान मिळविल्याचे आढळते. यूरोपीय जलप्रवासी प्रथम अमेरिकेत गेले त्यावेळी उत्तरेकडील महासरोवरांपासून दक्षिणेकडे चिली आणि अर्जेंटिना पर्यंत सर्व प्रदेशांत मका लागवडीत होता. यूरोपियनांनी अमेरिकेत मक्याची लागवड सोळाव्या व सतराव्या शतकांत सुरू केली. यूरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी अमेरिकेतून १४९४ त्या सुमारास नेला. त्यानंतर काही वर्षांत त्याचा दक्षिण फ्रान्स, इटली आणि बाल्कन प्रदेशांत प्रसार झाला. आशियात या पिकाची सोळाव्या शतकाच्या आरंभी आयात झाली. भारतात त्याची आयात केव्हा झाली हे एक न सुटलेले काडे आहे. पोर्तुगीज लोकांनी सोळाव्या शतकाच्या आरंभी भारतात मक्याची आयात केली असे मानले जाते परंतु त्याहीपूर्वी अरब-आफ्रिकनांच्या मार्फत त्याचा भारतात प्रवेश झाला असावा, असेही मानण्यात येते. निरनिराळ्या पुराव्यांवरून कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी भारत व अमेरिका (विशेषतः मेक्सिको) यांच्यामध्ये दळणवळण होते असे मानण्यात जागा आहे.
अमेरिकेत प्रथम गेलेल्या यूरोपियन लोकांनी मक्याला ‘इंडियन कॉर्न’ हे नाव दिले ते आजही ‘कॉर्न’ या संक्षिप्त रूपात प्रचलित आहे.
मक्याचे खोड भरीव, बलकट, भेंडयुक्त व सांधेदार आणि सु. १.२-३ मी. उंच असून तळाशी काही पेऱ्यांपासून जाड व आगंतुक आधारमुळे निघून जमिनीत जातात जमिनीतही तशाच काही मुळांचा मोठा झुपका असतो. काही प्रकारांत खोडाची उंची ६ मी. पेक्षाही जास्त असते. पाने साधी, बिनदेठाची, लांब (गवतात नेहमी आढळणारी), तळाशी खोडास वेढून राहणारी व जिव्हिकावंत (पायाच्या तळाशी बगलेतील पातळ पापुद्यासारखे उपांग असलेली) असतात. पानांची लांबी ३०-१२५ सेंमी. आणि रुंदी २.२ ते १२ सेंमी. असून ती वरच्या बाजूला लवदार असतात. फुले एकलिंगी, भिन्न फुलोऱ्यावर पण एकाच झाडावर जुलै-सप्टेंबरात येतात. पुं-पुष्पबंध (फुलोरा) शेंड्यावर ‘परिमंजरी’ [शाखायुक्त मंजरी प्रकारचा → पुष्पबंध] आणि स्त्री-पुष्पबंध पानांच्या बगलेत व मोठ्या छदांनी (आवरणांनी) वेढलेल्या ’स्थूल कणिश’ प्रकारचा असतो. फुले सच्छद, लहान, परिदलहीन (पुष्पकोश, पुष्पमुकुट नसलेली), बिनदेठाच्या किंवा देठ असलेल्या लहान फुलोऱ्यात (कणिशकात) जोडीने येतात. पुं-पुष्पबंधातील-कणिशकांच्या जोड्यांतील-प्रत्येक कणिशकात दोन लहान फुले (पुष्पके), दोन बाह्यतुषे (तुष म्हणजे पातळ परंतु कठीण उपांगासारखे आवरण), दोन परितुषे, दोन अंतस्तुषे व तळात दोन दोन लघुतुषे आणि प्रत्येक पुष्पकात तीन केसरदले असतात. स्त्री-पुष्पबंधातील सर्वत्र कणिशके बिनदेठाची आणि प्रत्येक कणिशकातील दोन्हीपैकी एक पुष्पक वंध्य असून त्यात लघुतुषे नसतात ही सर्व कणिशके एका रांगेने असून स्थूल कणिशाच्या जाड दांड्यावर त्यांच्या अनेक रांगा (८ ते १६ आणि क्वचित प्रसंगी ३० पर्यंत) असतात व त्या सर्वांवर मोठ्या चिवट, काहीशा त्रोकोणी छंदाचे आवरण असते. प्रत्येक स्त्री-पुष्पकात फक्त एक किंजपुट, त्यावर ४० ते ५० सेमी. लांब व मऊ केसासारखा किंजल व टोकास लांब पण दुभंगलेला किंजल्क असतो. सर्व फुलातील किंजलांचा क झुबका (शेंडी) छदांच्या वरणातून बाहेर लोंबत असतो. पुं-पुष्पकांतून परागकोशांच्या छिंद्रांतून बाहेर पडलेले परागकण वाऱ्यामुळे पसरत जाऊन अन्य ठिकाणी (किंजल्कावर पडतात णि परपरागण घडून येते [⟶परागकण] मक्याची शुष्क फळे (दाणे सस्यफले) स्थूल कणिशावर तयार होतात प्रत्येक एक एकदलिकित बीज असते दलिकेला ‘पुष्कादनी’ म्हणतात कारणतिच्याद्वारेपुष्कातील (गर्भाबाहेरच्या अन्नांशातील) अन्न गर्भाच्या वाढीत शोषून घेतले जाते. बीजाचे व फळाचे आवरण एक रूप होऊन त्याच्या आतील बाजूस प्रथिनयुक्त कणांचा थर (आपांडूर स्तर) असतो. बीजातील बराचसा भाग स्टार्चयुक्त पुष्क असतो, प्रत्यक्ष गर्भ तैलयुक्त असतो या तिन्ही अन्नघटकांमुळे मका हे उत्तम अन्नधान्य आहे. मका (दाणे) स्तंभक (आकुंचन करणारे) पण पौष्टिक असून सूज उतरण्यास उपयुक्त असतो.
क्षेत्र व उत्पादन : जगातील चार महत्त्वाच्या तृणधान्यांत मक्याचा समावेश होतो. गव्हाच्या खालोखाल कधी भाताचे तर कधी मक्याचे उत्पादन होते. तृणधान्यांच्या जगातील एकूण उत्पादनापैकी सु. २०% उत्पादन मक्याचे असते. १९७८ साली मक्याखाली एकूण क्षेत्र सु. ११ कोटी ७७ लक्ष हे. होते. त्यांपैकी २ कोटी ८३ लक्ष हे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत होते. त्या देशात इतर कोणत्याही तृणधान्यापेक्षा मक्याखालील क्षेत्र जास्त असते त्या देशातील मक्याच्या उत्पादनाचे मूल्य गहू, ओट, सातू, भात, राय आणि जोंधळा यांच्या एकत्र मूल्याइतके असते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, चीन व मेक्सिको या चार देशांत भारतापेक्षा जास्त क्षेत्र होते. उत्पादनाच्या बाबतीत अमेरिकेचा पहिला क्रमांक असून भारताचा बारावा होता. या बारा देशांत १९७८ मध्ये पुढीलप्रमाणे उत्पादन झाले. (आकडे लक्ष टनांचे आहेत) : अमेरिकेची संयुक्त संस्थाने १,७९८, चीन ३१६, ब्राझील १३५, रुमानिया १०२, दक्षिण आफ्रिका ९९, अर्जेंटिना ९७ मेक्सिको ९६, फ्रान्स ९४, रशिया ९०, यूगोस्लाव्हिया ७५, हंगेरी ६७, इटली ६० व भारत ५५. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील उत्पादन जगातील एकूण उत्पादनाच्या सु. ५०% होते, याचे कारण त्या देशात मक्याचे प्रति हेक्टरी उत्पादन जगात सर्वांत जास्त म्हणजे ६,३५३ किग्रॅ. होते (भारतात ते फक्त ९१७ किग्रॅ, होते). जगाशी तुलना करता त्या वर्षी भारतातील मक्याखालील क्षेत्र फक्त ५.१% व उत्पादन १.५% होते.
भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत मका हे भात, गहू, जोंधळा आणि बाजरी यानंतर पाचव्या क्रमांकाचे पीक आहे परंतु उत्पादनाच्या बाबतीत ते चौथ्या क्रमाकांचे पीक आहे. याचे कारण बाजरीचे एकूण क्षेत्र मक्यापेक्षा जास्त असले, तरी त्या पिकाचे हेक्टरी उत्पादन मक्यापेक्षा कमी असते. १९५०-५१ साली भारतात मक्याचे क्षेत्र ३९.५१ लक्ष हे. व उत्पादन २३.५७ लक्ष टन होते. १९७९.८० मध्ये क्षेत्र ५७.५० लक्ष हे. आणि उत्पादन ५५.८० लक्ष टन होते. याचा अर्थ २९ वर्षांच्या काळात मक्याच्या क्षेत्रात १.८ पट आणि उत्पादनात २.५ पट वाढ झाली.
भारतातील मका पिकविणाऱ्या महत्त्वाच्या राज्यांतील मक्याचे क्षेत्र व उत्पादन (१९७८ – ७९) |
|||||
राज्य |
क्षेत्र (लक्ष हेक्टर) |
प्रतिशत |
उत्पादन (लक्ष टन) |
प्रतिशत (उत्पादन) |
हेक्टरी (किग्रॅ.) |
आंध्र प्रदेश |
३.१३ |
५.४० |
३.४५ |
५.५० |
१,०७६ |
ओरिसा |
१.३० |
२.२० |
१.१२ |
१.९० |
८६१ |
उ. प्रदेश |
११.८७ |
२०.०५ |
७.७० |
१२.५० |
६४९ |
कर्नाटक |
१.८४ |
३.२० |
५.४२ |
८.६० |
२,९४५ |
गुजरात |
२.९४ |
५.० |
२.४४ |
४.०० |
८२९ |
जम्मू व काश्मीर |
२.७३ |
४.९० |
३.९८ |
५.५० |
१,४५७ |
पंजाब |
४.३३ |
७.५० |
६.९८ |
११.१० |
१,३८१ |
बिहार |
८.७५ |
१५.१० |
९.८६ |
१४.३० |
१,१२७ |
मध्य प्रदेश |
६.९२ |
१०.२० |
५.५४ |
९.०० |
८०० |
महाराष्ट्र |
०.६९ |
१.०२ |
१.२१ |
१.९३ |
१,७५३ |
राजस्थान |
८.०८ |
१३.६१ |
७.९४ |
१३.०० |
९८२ |
हरियाणा |
०.८९ |
१.३० |
०.७० |
१.२० |
७८३ |
हिमाचल प्रदेश |
२.७१ |
४.७० |
४.२८ |
६.७० |
१,५७८ |
एकूण भारत (इतर राज्यांसहित) |
५७.७९ |
६२.१९ |
१,०७६ |
भारतात १९७८-७९ च्या तपशीलवार आकडेवारी प्रमाणे त्या वर्षी मक्याखाली ५७.७९ हेक्टर क्षेत्र व ६२.१९ लक्ष टन उत्पादन होते. मक्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने प्रमुख राज्यांतील क्षेत्र आणि उत्पादन कोष्टकामध्ये दिले आहे.
कोष्टकावरून दिसून येईल की, १९७८-७९ मध्ये बिहारमध्ये सर्वांत जास्त उत्पादन झाले व त्या खालोखाल राजस्थान, उ. प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राला मक्याच्या पिकाच्या बाबतीत महत्त्वाचे स्थान नाही (सु. १% क्षेत्र व १.९३% उत्पादन होते). उत्तर भारताच्या डोंगराळ व त्याला लागून असलेल्या सपाट प्रदेशातील रहिवाशांच्या आहारात मका हे प्रमुख तृणधान्य आहे.
महाराष्ट्रात मक्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने पुढील जिल्हे (उतरत्या क्रमाने) महत्त्वाचे आहेत. सोलापूर, धुळे, औरंगाबाद आणि उस्मानाबाद त्या खालोखाल कोल्हापूर, सांगली, पुणे, नासिक, सातारा, अहमदनगर व चंद्रपूर या जिल्ह्यांत उत्पादन होते. इतर जिल्ह्यांत फार थोडे क्षेत्र असते.
प्रकार : जगातील मक्याच्या लागवडीतील असंख्य प्रकारांत पुष्कळ भिन्नता आढळून येते. ६० ते ७० दिवसांपासून ११ महिन्यांपर्यंतच्या कालावधीत तयार होणारे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांत पानांची संख्या ८ पासून ४८ पर्यंत असते. काही प्रकारांत फुटवे नसतात, तर काही प्रकारांत त्यांची संख्या १२ पर्यंत असते. झाडाची उंची ६० सेंमी. पासून सु. ६.५ मी. पर्यंत, कणसातील दाण्यांच्या ओळींची संख्या ४ पासून ३६ पर्यंत व कणसाचे आकारमान हाताच्या आंगठ्याच्या आकारमानापासून ६० सेमी. लांब एवढे असते. दाण्यांच्या रंगाबाबतही बरीच भिन्नता आढळून येते. पिवळा, पांढरा, निळसर व तपकिरी या रंगाखेरीच लाल रंगाच्या निरनिराळ्या छटा असलेले दाणे आढळून येतात. तसेच निरनिराळ्या रंगाच्या छटा एकाच दाण्यात दिसून येतात. दाण्यातील पुष्काच्या गुणधर्मावर आधारित असे मक्याच्या लागवडीतील निरनिराळ्या प्रकारांचे व्यापारी वर्गीकरण अमेरिकेत फार वर्षांपासून प्रचलित आहे. त्यांत पुढील पाच प्रमुख व्यापारी प्रकार ओळखले जातात : (१) डेंट, (२) फ्लिंट, (३) फ्लोअर, (४) स्वीट आणि (५) पॉप. डेंट प्रकारात दाण्याच्या वरच्या भागावर लहान खड्डा वा खाच असते. दाण्याच्या पुष्कामध्ये मृदू स्टार्च व दोन्ही बाजूंना कठीण स्टार्च असतो. हे दोन प्रकारचे स्टार्च सारख्या प्रमाणात वाळत नसल्यामुळे दाणा वाळल्यावर मृदू स्टार्चामध्ये खड्डा पडतो. व्यापारी दृष्ट्या हा महत्त्वाचा प्रकार आहे. फ्लिंट प्रकारात दाण्याचे बाहेरील आवरण संपूर्णपणे कठीण स्टार्चाचे बनलेले असते. मध्यभागी थोड्या प्रमाणात मृदू स्टार्च असतो. कठीण स्टार्चाच्या आवरणामुळे दाण्याला चकाकी प्राप्त होते. फ्लोअर प्रकारच्या दाण्यात बहुतांशाने मृदू असतो. त्यामुळे याप्रकाराचे दाणे दळण्यास अगर चावण्यास सोपे असतात. स्वीट प्रकारच्या दाण्यांत शर्करेचे स्टार्चाशी प्रमाण जास्त असल्यामुळे दाणे वाळल्यावर ते सुरकुतलेले व अर्ध पारदर्शक असतात. हा प्रकार गोड असल्यामुळे तो ताजा भाजून अथवा हवाबंद डब्यात भरून खाण्यासाठी वापरतात. पॉप प्रकारात दाणे आकारमानाने लहान व कठीण असतात आणि त्यात मृदू स्टार्च फारच कमी असतो. दाण्याला ठराविक प्रमाणात उष्णता दिल्यास त्यातील जलांशाची वाफ होऊन दाणा फुटतो व त्याची लाही बनते. लाह्यासाठी हा प्रकार विशेष पसंत करतात. वॅक्सी कॉर्न हा सहावा प्रकारही ओळखला जातो. या प्रकारात पुष्कातील सर्व स्टार्च ॲमिलो पेक्टिन या स्वरूपात असतो व त्यामुळे तो पचनाला सुलभ असतो.
पॉप व स्वीट या प्रकारांचे उत्पादन फ्लिंट व डेंट या प्रकारांपेक्षा कमी असते परंतु त्यांचा वापर विशिष्ट उपयोगांसाठी हात असल्यामुळे त्यांना जास्त किंमत मिळते.
यूरोपात व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत निरनिराळ्या उपयोगांसाठी मक्याच्या निरनिराळ्या प्रकारांची लागवड करतात. भारतात मुख्यत्वेकरून फ्लिंट आणि फ्लिंट व डेंट या प्रकारांच्या संकरापासून निर्माण केलेल्या प्रकारांची लागवड करण्यात येते.
मक्याच्या सध्या लागवडीत असलेल्या प्रकारांत झाड, कणीस व दाणा यांच्या गुणधर्मांच्या बाबतीत पुष्कळच फरक आढळून येतो. पंजाबचा साठी, उत्तर प्रदेशचा तीन पंखिया आणि पंचमहालाचा काथडी हे प्रकार पेरणीपासून ७०-७५ दिवसांत तयार होतात व त्यांची कणसे फक्त ८-१० सेंमी. लांब असतात. उत्तर प्रदेशातील जौनपूर प्रकार ८०-८५ दिवसांत तयार होतो व कणसे २५-३० सेंमी. लांबीची असतात. झाडाची उंची, दाण्याचा रंग आणि संरचना या बाबतींतही स्थानिक प्रकारांत पुष्कळ भिन्नता आढळून येते. लाल अथवा पिवळ्या दाण्यांचे प्रकार विशेषेकरून सपाट प्रदेशात व पांढऱ्या दाण्यांचे प्रकार विशेषेकरून डोंगरी भागात लागवडीत आहेत.
संकरित व संमिश्र प्रकार : स्थानिक उत्पादन फार कमी असते. यासाठी अखिल भारतीय समन्वयित मका सुधार योजनेखाली संकरित व संमिश्र (अथवा स्थिर संकरित) प्रकार १९६१ नंतर लागवडीसाठी देण्यात आले. संकरित प्रकारांचे उत्पादन स्थानिक प्रकारांपेक्षा सु. ५०% जास्त येते परंतु त्यांचे बी दरवर्षी खास देखरेखीखाली तयार करावे लागते. याउलट संमिश्र प्रकारचे बी दरवर्षी बदलावे लागत नाही व शेतकरी आपल्याच शेतातील बी पुढील ३-४ वर्षांच्या पेरणीसाठी वापरू शकतो. १९६१ नंतर १२ संकरित प्रकार लागवडीसाठी देण्यात आले. त्यांपैकी व्ही. एल. ५४. हाय स्टार्च, गंगा सफेद २, एच. आय. एम. १२३, गंगा ४, गंगा ५ व डेक्कन १०१ हे विशेष समाधानकारक असल्याचे दिसून आले. गंगा ४ वगळता बाकीचे सहा प्रकार ९५-१०५ दिवसांत तयार होतात. व्ही. एल. ५४ हा प्रकार हिमालयातील प्रदेशासाठी योग्य आहे. हाय स्टार्च हा प्रकार उ. प्रदेशात व बिहारमध्ये लोकप्रिय झाला आहे. स्टार्च उद्योगधंद्यात हा विशेष पसंत केला जातो कारण त्यात स्टार्चाचे प्रमाण जास्त असते. गंगा सफेद २ हा देशाच्या सर्व भागांत लागवडीसाठी योग्य असून उ.प्रदेश, बिहार व इतर मक्याच्या लागवडीच्या प्रदेशांत तो लोकप्रिय आहे. एच. आय. एम. १२३ हा प्रकार हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर आणि प. बंगाल व उ. प्रदेशाच्या उंच भागासाठी योग्य आहे. गंगा ५ हा गंगेच्या काठच्या सपाट प्रदेशात आणि भारताच्या द्विपकल्पाच्या प्रदेशात फार लोकप्रिय झाला आहे. गंगा ४ हा प्रकार बिहारमध्ये रबी हंगामातील लागवडीसाठी चांगला असल्याचे आढळून आले आहे. डेक्कन १०१ हा प्रकार द्वीपकल्पातील प्रदेशात, विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक व मध्य प्रदेशात विशेष लोकप्रिय झाला आहे. याचा दाणा पिवळा व टपोरा असतो. यापासून स्थानिक प्रकारांपेक्षा ३५ ते ४५% जास्त दाणे व ६० ते १००% जास्त वैरण मिळते.
विजय, किसान, अंबर, जवाहर, सोना व विक्रम हे सहा संमिश्र प्रकार १९६७ नंतर लागवडीसाठी देण्यात आले. विक्रमखेरीज बाकीचे पाच प्रकार ९५-१०५ दिवसांत तयार होतात. विक्रम ९०-९५ दिवसांत तयार होतो. विजय हा देशात सर्वत्र लागवडीसाठी आणि किसान व विक्रम हे प्रकार उत्तर भारतातील सपाट प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहेत. अंबर हा उंच वाढणारा, गर्द हिरव्या पानांचा व वैरणीसाठी देखील चांगला असा प्रकार हिमालयातील १,७०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशासाठी व द्वीपकल्पातील भागासाठी आणि जवाहर व सोना हे प्रकार उत्तर भारतातील सपाट प्रदेश व द्वीपकल्पातील भागासाठी योग्य आहेत. वरील प्रकारांखेरीज पोषण दृष्ट्या सरस असे तीन निमगरवे प्रकार (शक्ती, रतन, प्रोटिना) १९७१ मध्ये लागवडीसाठी देण्यात आले. या प्रकारांत लायसीन हे पोषण दृष्ट्या महत्त्वाचे ॲमिनो अम्ल जास्त प्रमाणात असते.
हाय स्टार्च व गंगा ४ हे प्रकार बिहारमध्ये आणि गंगा ५, डेक्कन आणि डेक्कन १ हे प्रकार तमिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत रबी हंगामातील लागवडीसाठी चांगले असल्याचे आढळून आले आहे व शेतकऱ्यांत ते लोकप्रिय झाले आहे. तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला को. एच. आय. हा संकरित मक्याचा प्रकार ८५ ते ९० दिवसांत तयार होतो व ओलिताखाली प्रती हेक्टरी ५५.२६ क्विटल उत्पादन मिळते.
पंजाब कृषी विद्यापीठाने प्रताप-१ हा हिवाळी हंगामात लागवडीसाठी योग्य प्रकार विकसित केला आहे. हिवाळी हंगामात मक्याची लागवड होऊ शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे परंतु गव्हापेक्षा जास्त उत्पन्न देणारा व रोगप्रतिकारक असा प्रताप-१ हा प्रकार आहे.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत मक्याच्या लागवडीखालील सर्व क्षेत्रांत संकरित प्रकारांचीच लागवड केली जाते. भारतात संकरित प्रकारांखालील क्षेत्र मक्याच्या एकूण क्षेत्राच्या ५ ते ७% पर्यंतच असावे, असा अंदाज आहे. याचे कारण शेतकरी कमी उत्पन्न देणाऱ्या परंतु सुधारित प्रकारांपेक्षा २०-३० दिवस लवकर तयार होणाऱ्या प्रकारांचीच लागवड करणे पसंत करतात. अवर्षणाच्या परिस्थितीत अथवा फार पावसामुळे पूर येतात अशा वेळी लवकर तयार होणारे स्थानिक प्रकार लावल्यामुळे संभाव्य नुकसान कमी मर्यादेत राहते. शिवाय वर्षातून एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात घ्यावयाची असतात त्या वेळीही मक्याचा लवकर तयार होणारा प्रकार लावणे इष्ट असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतनगर कृषी विद्यापीठाने तरूण, नवीन आणि श्वेता हे सुधारित हळवे (८०-९० दिवसात तयार होणारे) मक्याचे प्रकार लागवडीसाठी दिले आहेत. यांचे हेक्टरी उत्पादन ३५ क्विंटलपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथील मका संशोधन केंद्राने ‘मांजरी’ व ‘ह्युनिस’ या मक्याच्या दोन प्रकारंची लागवडीसाठी शिफारस केली आहे. मांजरी हा संमिश्र प्रकार आहे. हेक्टरी उत्पादन ४०-५० क्विंटल मिळते. ह्युनिस हा प्रकार उसाच्या पिकात मिश्र पीक म्हणून घेण्यायोग्य आहे. हेक्टरी उत्पादन ४०-४५ क्विंटल मिळते. तसेच आफ्रिकन टॉल हा लुसलुशीत धाटाचा वैरणीचा प्रकार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधून काढला आहे. ६० ते ७० दिवसांत वैरणीसाठी पीक तयार होते. हेक्टरी ६० ते ७० क्विंटल हिरव्या वैरणीचे उत्पादन मिळते.
हवामान : मका हे मूलतः ऊबदार हवामानातील वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) पीक आहे. भिन्न गुणधर्म असलेले पुष्कळ प्रकार उपलब्ध असल्यामुळे त्याची लागवड निरनिराळ्या हवामानात करणे शक्य झाले आहे. इतर कोणत्याही तृणधान्यापेक्षा हे पीक जगाच्या जास्त विस्तृत भागात लागवडीत आहे (उत्तरेस कॅनडात व रशियात ५८° अक्षवृत्तापासून दक्षिण गोलार्धात ४०° अक्षवृत्तापर्यंत आणि समुद्रसपाटीपेक्षा कमी उंचीच्या प्रदेशापासून ३,६०० मी. उंचीच्या अँडीज पर्वताच्या प्रदेशात याची लागवड होते). या पिकाच्या वाढीसाठी दिवसा व रात्रीचे तापमान वरच्या स्तरावर असणे जरूर आहे. रात्रीचे तापमान १५°.६ से. च्या खाली जात नाही अशा हवामानात मक्याचे पीक चांगले येते. भारतात राजस्थान व गुजरातच्या उष्ण व कोरड्या प्रदेशापासून आसाम व बंगालच्या ४०० सेंमी.पेक्षा जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशापर्यंत हे पिक घेतले जाते. १०° से. तापमानाखाली बहुतेक प्रकारांचे बी उगवत नाही. विशेषतः जमिनीत ओल कमी असेल त्या वेळी फार उष्ण हवामान पिकाला हानिकारक असते. २५ सेंमी. पासून ५०० सेंमी. पर्यंतच्या निरनिराळ्या वार्षिक पर्जन्यमानात मक्याची लागवड केली जाते परंतु वाढीच्या हंगामात ५० ते ७५ सेंमी. पाऊस पिकाला पोषक असतो. हे मुख्यतः खरीप हंगामातील पीक आहे परंतु कडाक्याची थंडी नसलेल्या प्रदेशात या पिकाची लागवड वर्षभर करता येते. दाणा पक्व होण्यापूर्वी हिमतुषार पडल्यास पाने वाळतात. भारतात खरीप हंगामात बियांच्या उगवणीसाठी २१° से. व पिकाच्या वाढीसाठी ३२° से. तापमान इष्टतम असते.
जमीन : फार हलक्या नाही व फार भारी नाही अशा प्रकारच्या चांगल्या निचऱ्याच्या खोल व सुपीक जमिनीत मक्याचे पीक चांगले येते. परंतु चांगल्या निचऱ्याच्या खोल, भारीपासून हलक्या वाळूमिश्रितपर्यंत कोणत्याही जमिनीत त्याची लागवड करता येते. शेतात थोडा वेळ पाणी साचून राहिले, तरी ते नुकसानकारक असते. जमिनीचे pH मूल्य ५.५ ते ८.० असावे [⟶ पीएच मूल्य]. ५.५ पेक्षा कमी pH मूल्यअसलेल्या जमिनीत तसेच क्षारधर्मी आणि लवणमय जमिनीत मक्याचे पीक चांगले येत नाही.
हंगाम : सामान्यतः मक्याचे ८५% पीक खरीप हंगामात व काही ठिकाणी ते उन्हाळी हंगामात घेतात. काही ठिकाणी ते कोणत्याही हंगामात घेतले जाते. भारतात या पिकाच्या रबी हंगामातील लागवडीचा विशेष अभ्यास करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, प. बंगाल, बिहार, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांच्या काही भागांत रबी पीक जास्त फायदेशीर होऊ शकेल असे आढळून आले आहे व पहिल्या तीन राज्यांत रबी हंगामातील लागवड विस्तृत प्रमाणावर होत आहे. भारताच्या बहुतेक भागात मक्याच्या खरीप पिकाची पेरणी पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर करतात. ईशान्येकडील टेकड्यांत मार्चच्या पहिल्या आठवड्यात, वायव्येकडील टेकड्यांत एप्रिल-मेमध्ये, द्वीपकल्पातील प्रदेशात मे-जूनमध्ये व सिंधु-गंगेच्या खोऱ्यातील सपाट प्रदेशात जूनच्या अखेरीपासून जुलैच्या मध्यापर्यंत पेरणी करतात. पंजाबमधील कालव्याच्या भागात ऑगस्टच्या अखेरीपर्यंत पेरणी चालू राहते. बिहार व उ.प्रदेशाच्या तराई भागात उन्हाळी मक्याची पेरणी जानेवारी अखेरपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत आणि बिहार, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटकात रबी पिकाची पेरणी ऑक्टोबर अखेरपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत करतात. उन्हाळी व रबी पिकांची लागवड बहुतांशी पाणी देऊन करतात. महाराष्ट्रात वैरणीसाठी उन्हाळी मका मार्च-एप्रिलमध्ये पेरतात.
फेरपालट व मिश्र पीक : उत्तर भारतात, विशेषतः उ. प्रदेश, पंजाब व बिहार या राज्यांत गहू, सातू, बटाटे, कापूस आणि ऊस या पिकांच्या फेरपालटात मक्याचे पीक घेण्याचा प्रघात आहे. देशाच्या काही भागांत हरभरा, मसूर, मोहरी अथवा करडई यांपैकी एखादे पीक मका काढल्यावर त्याच वर्षी घेतात. डोंगराळ भागात मक्यानंतर बटाट्याचे पीक घेतात. सर्वसाधारणपणे मक्याचे पीक स्वतंत्र पीक असते परंतु काही ठिकाणी मूग, उडीद, तूर, कापूस, घेवडा व लवकर निघणाऱ्या वेलभाज्या मक्याच्या पिकात लावतात. महाराष्ट्रात सांगली व सातारा भागात हळदीच्या पिकात आणि कोल्हापूर जिल्ह्यात उसामध्ये मक्याचे मिश्र पीक घेतात.
पूर्व मशागत व पेरणी : जमीन नांगरून (लाकडी नांगराने २-३ वेळा व ट्रॅक्टाने एकदा) भुसभुशीत करून दाबून घेतात. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी पेरणीपूर्वी शेतात ४०-५० मी. अंतरावर उथळ चर खणतात. मक्याचे भरपूर उत्पादन मिळण्यासाठी पिकाला भरपूर खताची जरूरी असते. हेक्टरी २५-३० गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळतात. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ६०-७५ सेंमी. व ओळीत दोन झाडांतील अंतर २०-२५ सेंमी. ठेवतात. कापणीच्या वेळी एका हेक्टामध्ये ६० ते ७५ हजार झाडे असल्यास चांगले उत्पादन मिळते. पेरणी पाभरीने अगर नांगरमागे तासात बी टाकून करतात. फोकून बी पेरण्याची पद्धत भारतात पुष्कळ ठिकाणी (विशेषतः वैरणीच्या पिकासाठी) प्रचलित आहे. दाण्याच्या पिकासाठी हेक्टरी १७-२० किग्रॅ.आणि वैरणीच्या पिकासाठी ३५-४० किग्रॅ.बी लागते.
पाणी देणे : मक्याच्या रबी व उन्हाळी पिकाला पाणी द्यावेच लागते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५-१० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. खरीप पिकाला ताण दिल्यास पाणी देणे आवश्यक असते. पीक फुलावर येण्याच्या सुमारास आणि दाणे भरण्याच्या सुमारास जमिनीत ओल कमी झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो.
तण काढणे : ओळींमधील तण बैलाने ओढल्या जाणाऱ्या औताच्या साहाय्याने व ओळीतील तण हाताने काढतात. साधारणपणे २ ते ३ वेळा तण काढावे लागते. त्यानंतर झाडांना मातीची भर देतात. पीक फुलावर आल्यावर आंतर मशागत करीत नाहीत. वैरणीचे पीक दाट असल्यामुळे त्यात तणाची वाढ फारशी होत नाही.
खते : अखिल भारतीय पातळीवरील प्रयोगांत मक्याच्या कोरडवाहू पिकाचे नायट्रोजनाच्या दर किग्रॅ. मागे १४.९ किग्रॅ. व फॉस्फरसाच्या (फॉस्फोरिक अम्लाच्या स्वरूपात) दर किग्रॅ. मागे १२.२ किग्रॅ. उत्पादन वाढते असे दिसून आले. शेतकऱ्याच्या शेतावर केवळ नायट्रोजनयुक्त खताच्या वापरामुळे उत्पादनात हेक्टरी ५-९ क्विंटल वाढ झाली, नायट्रोजन व फॉस्फरस संयुक्तपणे दिल्याने हेक्टरी ८.९ क्विंटल आणि नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश एकाच वेळी दिल्याने हेक्टरी ९.८ क्विंटल वाढ झाली.
भारतातील मक्याच्या कोरडवाहू पिकाला ६० किग्रॅ. नायट्रोजन व ३० किग्रॅ. फॉस्फरस दिल्याने गाळाच्या जमिनीत (लुधियाना, सांबा, डेहराडून व वाराणसी येथे) हेक्टरी ३५ ते ५० क्विंटल, तांबुस जमिनीत (ग्रॅनाइट) बंगलोर व रांची येथे) ४०-४५ क्विंटल आणि काळ्या जमिनीत (इंदूर व रेवा येथे) ३५-४० क्विंटल उत्पादन संशोधन केंद्रावर मिळाले. शेतकऱ्याच्या शेतावर सर्वसाधारणपणे हेक्टरी १०-२० क्विंटल उत्पादन मिळाले.सर्वांत जास्त उत्पादन (३४ क्विंटल) बंगलोर येथे व सर्वांत कमी १ क्विंटल वाराणसी येथे मिळाले.
मक्याच्या संकरित व संमिश्र प्रकारांना हेक्टरी १०० ते १२५ किग्रॅ. नायट्रोजन, ६० ते ७५ किगॅ. फॉस्फरस व ४० ते ७५ किग्रॅ. पोटॅश देतात (फॉस्फरस व पोटॅश यांची मात्रा मातीच्या पृथक्करणावर अवलंबून असते.) यांपैकी १/३ नायट्रोजन व संपूर्ण फॉस्फरस व पोटॅश पेरणीपूर्वी व उरलेला नायट्रोजन दोन हप्त्यांत देतात (पहिला पीक गुडघाभर उंचीचे असताना दुसरा पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास).
सूक्ष्म पोषकांचा अभाव : काही जमिनींत (विशेषतः वाळूसरा अथवा कॅल्शियमयुक्त अथवा नव्याने सपाट केलेल्या जमिनात) जस्ताच्या अभावामुळे मक्याची कोवळी व न उलगडलेली पाने पिवळी पडतात. काही दिवसांनी ती जांभळ्या रंगाची होतात खालच्या बाजूची पाने वाळतात व झाडे खुरटी राहतात. पीक लहान असताना ५ किग्रॅ. झिंक सल्फेट व २.५ किग्रॅ. चुना ७५० ते १,००० लिटर पाण्यात मिसळून एक अगर दोन वेळा पिकावर फवारतात. पेरणीपूर्वी १०-२० किग्रॅ. झिंक सल्फेट इतर खतांबरोबर मातीत मिसळले असता ते ३ ते ५ वर्षे झाडांना उपलब्ध होते.
मॅग्नेशियम, गंधक, ताम्र, लोह, मँगॅनीज, बोरॉन व मॉलिब्डेनम या सूक्ष्म पोषकांच्या अभावामुळे निरनिराळी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे फक्त डोळ्यांनी पाहून ओळखणे सोपे नसते. अशा वेळी मातीची व झाडाची योग्य परीक्षा करूनच उपाययोजना करावी लागते.
रोग व किडी : मक्याच्या पिकावर अनेक रोग व किडी पडतात.
रोग : कवके (बुसशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणारे रोग खोड, पाने व कणसे यांवर आढळून येतात परंतु त्यामुळे सर्वसाधारणपणे विस्तृत प्रमाणावर पिकाचे नुकसान होत नाही. सुमारे १०-१२% पीक रोगांमुळे वाया जात असावे असा अंदाज आहे. रोगांमध्ये पानावरील, खोडावरील व कणसावरील रोग आहेत.
कवकजन्य रोग : (अ) पानांवरील रोग : (१) करपा : ड्रेक्स्लेरा टर्सीका (हेल्मिथोस्पोरियम टर्सीकम) कवकामुळे पिवळट तपकिरीरंगाचे लंबाकार ठिपके पडतात. रोगाचे प्रमाण फार असल्यास पाने वाळतात. पीक लहान असताना रोग पडल्यास रोपे मरतात. उपाय म्हणून पेरणीपूर्वी बी पारायुक्त कवकनाशकात (१ : ४०० या प्रमाणात) चोळून पेरतात. पिकावर बोर्डो मिश्रण अथवा ताम्रयुक्त कवकनाशके फवारतात. (२) केवडा : हा रोग कवकाच्या स्क्लेरोस्पोरा वंशातील अनेक जातींमुळे होतो. लक्षणे ज्वारीवरील केवड्याप्रमाणे. मेटालॅक्झिल हे कवकनाशक बियांना ७ मिलि./किग्रॅ. या प्रमाणात लावल्याने रोगाचे प्रमाण पुष्कळ कमी होते. (३) तांबेरा : पक्सिनिया सोरधाय कवकामुळे पानाच्या दोन्ही बाजूंवर फोड येतात व ते फुटून त्यांतून कवकाची असंख्य बीजे येतात [⟶ तांबेरा]. गंगा ४, डेक्कन व गंगा हे प्रकार रोगप्रतिकारक आहेत.
(आ) खोडावरील (धाटांवरील) रोग : (१) खोडकूज : पिथियम ॲफानिडरमेटम कवकामुळेखोडाच्या तळाकडील ३ ते ४ पेरे प्रथम कुजतात व त्यामुळे खोड (घाटा) मोडून पडते. उपाय म्हणून पीक ६-८ आठवड्यांचे असताना जमिनीवर भरपूर प्रमाणात कवकनाशक फवारतात. गंगा सफेद २, उदेपूर शुभ्र, अनंतनाग स्थानिक, सोलन स्थानिक व विक्रम हे प्रकार रोगप्रतिकारक आहेत. (२) काळी खोडकूज : बॉट्रिडिप्लोडिया फॅसिओलाय (मॅक्रोफोमिना फॅसिओलाय) कवकामुळे हा रोग होतो. पीक तयार होण्याच्या सुमारास रोगाची लक्षणे दिसून येतात. घाटे कमजोर झाल्यामुळे पुष्कळ वेळा जमिनीपाशी मोडतात. भेंडाचा रंग बदलतो आणि त्याच्या चिरफळ्या होतात. पेऱ्याच्या बाहेरील भागावर आणि वाहक वृंदावर (अन्नरस वाहून नेणाऱ्या पेशीसमूहावर) टाचणीच्या टोकाएवढ्या लहान काळ्या रंगाच्या कवकजालाच्या गुठळ्या आढळून येतात. गंगा ५, गंगा १०१, जवाहर आणि किसान हे प्रकार रोगप्रतिकारक आहेत. (३) गुलाबी खोडकूज : फ्यूजेरियम मोनिलिफॉर्मी कवकामुळे होणाऱ्या खोडकुजेची लक्षणे परागणानंतर दिसू लागतात व पीक तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत वाढत जातात. निकाष्ठाचा रंग पांढरट गुलाबी होतो, कांडी मोडतात आणि कणसे लवकर तयार होतात. करीमनगर स्थानिक, गंगा ५, नवीन व श्वेता हे प्रकार रोगप्रतिकारक आहेत.
(इ) कणसांचे रोग : (१) कूज : पुष्कळ निरनिराळ्या कवकांमुळे कणसे कुजतात. यावर खात्रीशीर इलाज नाही. (२) काणी : हा रोग मक्याच्या संपूर्ण झाडावर आढळून येतो. उस्टिलागो मायडिस कवकामुळे कणसासह झाडाच्या कोणत्याही भागावर आवाळूसारख्या लहानमोठ्या गाठी तयार होतात. कालांतराने त्यांवरील पांढरे चकचकीत आवरण फाटून आतील काळी भुकटी म्हणजेच कवकबीजे बाहेर पडतात. रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच या रोगावर उपाय आहे. लागवडीतील बहुतेक दुहेरी संकरित मक्याचे प्रकार पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारक आहेत.
व्हायरसजन्य व सूक्ष्मजंतुजन्य रोग : या पिकावर अनेक व्हायरजन्य व सुक्ष्मजंतुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यावर रोगप्रतिकारक प्रकारांची निर्मिती हा एकच उपाय आहे. सूक्ष्मजंतुजन्य रोगांपैकी खोडकूज हा महत्त्वाचा रोग आहे. एर्विनिया क्रिसॅन्थेमी या सूक्ष्मजंतुमुळे उद्भवणाऱ्या खोडकूज रोगात झाडांची सर्व पाने वाळतात व तळाकडील कांडी कुजतात. रोगाच्या पुढील अवस्थेत झाडे वाळतात व कणसे कुजतात. गंगा २, कुलू स्थानिक, रूद्रपूर स्थानिक, नवीन व श्वेता हे रोगप्रतिकारक प्रकार आहेत. ए. कॅरोटोव्होरा प्रकार झिईमुळे होणारा खोडकूज रोग पाणी साठलेल्या व दाटीने पेरलेल्या शेतात विशेष नुकसानकारक असतो. झाडाच्या तळाकडील भागात रोगाचा प्रथम प्रादुर्भाव होतो आणि झाड कोमेजते आणि कणसे धरत नाहीत. पाण्याचा योग्य निचरा करणे व रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हे उपाय आहेत. सीएम ६००, गंगा सफेद २, सीएम १०३ आणि सीएम १०४ हे प्रकार रोगप्रतिकारक आहेत.
किडी : मक्याच्या खोडकिडा (कायलो पार्टेल्लस), गुलाबी खोडकिडा (सेसॅमिया इन्फेरन्स) व केसाळ अळी (ॲमसॅक्टा भूरेई) या विशेष नुकसानकारक किडी आहेत. दोन्ही प्रकारच्या खोडकिड्यांमुळे धाटे वाळतात. उपायकरिता कापणीनंतर झाडांची धसकटे मुळांसकट उपटून जाळतात. पीक लहान असताना कीड लागलेली झाडे वाळण्यापूर्वीच उपटून जाळतात. पिकावर एंडोसल्फानाचा फवारा मारतात. गुलाबी खोडकिडा विशेषेकरून दक्षिण भारतात रबी पिकांवर विशेष नुकसानकारक असून नुकसान ३० ते ३६% पर्यंत असते. केसाळ अळीमुळे कधीकधी खरीप पिकाचे संपूर्ण नुकसान होते. उपाय म्हणून सेव्हिन आणि बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात. लष्करी अळीमुळे मक्याच्या पिकाचे फार निकसान होते. [⟶ ज्वारी].
काढणी : मक्याची काढणी दाणे, वैरण आणि मुरघास या तीन हेतूंसाठी करतात. सर्वसाधारणपणे मक्याचे पीक पेरणीपासून ८० ते १०० दिवसांत तयार होते परंतु गरवे प्रकार व रबी हंगामातील पीक तयार होण्यास ४ महिन्यांपेक्षा जास्त व केव्हा केव्हा ६ महिने देखील लागतात. भाजण्यासाठी किंवा उकडून खाण्यासाठी कणसांची काढणी ती कोवळी अथवा काहीशी घट्ट झाल्यावर (पेरणीपासून सु. २ महिन्यांनी) करतात. दाण्यांसाठी कणसांची काढणी दाणे जवळ जवळ वाळलेले असताना व त्यांत २०% पेक्षा जास्त पाण्याचा अंश नसताना केली जाते. सर्वसाधारणपणे कणसांवरील पाने अशा वेळी तपकिरी रंगावर असतात परंतु झाडांची बाह्य अवस्था ही कणसांच्या काढणीसाठी विश्वसनीय खूण असतेच असे नाही. विशेषतः संकरित व संमिश्र प्रकारांमध्ये धाटे व पाने हिरवी असताना कणसातील दाणे वाळलेले असतात. वैरणीसाठी पिकाची कापणी पीक फुलांवर येण्याच्या अवस्थेत केली जाते. मुरघासासाठी कणसांतील दाणे त्यांत नख जाण्याइतपत घट्ट होऊ लागल्यावर पीक कापले जाते. दाण्यांसाठी कणसे काढून घेतल्यावर ताबडतोब झाडे कापून जनावरांना खाऊ घालतात अथवा त्यांची विक्री केली जाते. बाजरी अगर ज्वारीप्रमाणे मक्याच्या झाडांत विषारी अन्नघटक नसतात. त्यामुळे मक्याची वैरण कोणत्याही अवस्थेत कापून जनावरांना खाऊ घालता येते.
काढणीनंतर वरील आवरणे काढून कणसे उन्हात वाळू देतात आणि काठीने अथवा यांत्रिक साधनांनी दाणे काढतात. कणसांतील दाणे काढण्यासाठी मनुष्याच्या अथवा यांत्रिक शक्तीच्या साहाय्यावर चालणारी यंत्रे भारतात उपलब्ध आहेत.
उत्पादन : १९७८ मध्ये मक्याचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पादन ९१७ किग्रॅ. होते. १९६९-७० ते १९७३-७४ या पाच वर्षांच्या कालात ते सरासरीने १,०३० किग्रॅ. होते. पाणी देण्याची सोय असलेल्या भागात व शिफारशींप्रमाणे मक्याची लागवड केल्यास हेक्टरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते. हिवाळी व उन्हाळी पिकांचे उत्पादन पावसाळी पिकापेक्षा जास्त असते कारण पावसाळी पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. कर्नाकटातील सरासरी हेक्टरी उत्पादन ३.५ टन असते व ते सर्व तृणधान्यांत जास्त आहे.
रासायनिक संघटन : भारतातील मक्याच्या दाण्यात सर्व साधारणपणे पुढील घटक असतात : जलांश १४.९%, प्रथिने ११.१%, वसा (स्निग्ध पदार्थ) ३.६%, कार्बोहायड्रेटे ६६.२%, तंतू २.७% आणि खनिज पदार्थ १.४%. कार्बोहायड्रेटांमध्ये ६१% स्टार्च असतो. दाण्यामध्ये पुष्क, गर्भ व कोंडा यांचे सर्वसाधारण प्रतिशत प्रमाण अनुक्रमे ८१.९. ११.९ आणि ५.३ असते. पुष्कामध्ये ९.४% प्रथिने, ०.८% वसा व ८६.४% स्टार्च, ०.६४% शर्करा व ०.३१% खनिजेअसतात. गर्भामध्ये १८.८% प्रथिने, ३४.५% वसा, ८.२% स्टार्च, १०.११% शर्करा व १०.१०% खनिजे असतात. मक्यात फॉरफरस व लोह हे पुरेशा प्रमाणात असतात परंतु कॅल्शियमाचे प्रमाण फार थोडे असते. मक्याच्या प्रथिनांचे पोषणमूल्य कमी प्रतीचे आहे कारण त्यात लायसीन, ट्रिप्टोफेन व मिथिओनीन या जीवनावश्यक ॲमिनो अम्लांचे प्रमाण कमी असते.
उपयोग : मक्याचा उपयोग मनुष्य आणि जनावरांचे खाद्य व जनावरांचा चारा या स्वरूपात मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय अनेक औद्यौगिक उत्पादनांत कच्चा माल म्हणून त्याचा वापर केला जातो. भारतात ८० ते ९०% मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी वापरले जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत आणि यूरोपातील अनेक देशांत मक्याचा पुष्कळसा भाग मांसोत्पादक जनावरे, दुभती जनावरे, घोडे, खेचरे व कोंबड्या यांना खाऊ घालतात (अमेरिकेत सु ९०% मक्याचे उत्पादन पशुखाद्यासाठी आणि सु. १०% उत्पादन स्टार्च, तेल व इतर औद्योगिक उत्पादनांसाठी वापरले जाते). जगाच्या अनेक भागांत स्टार्चच्या उत्पादनासाठी मका हेच प्रमुख कच्चा माल आहे. भारताखेरीज लॅटिन अमेरिका (मेक्सिको व त्याच्या दक्षिणेकडील देश), यूरोपचा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा काही भाग आणि दक्षिण, पूर्व व पश्चिम आफ्रिका या प्रदेशांतही मनुष्याचे अन्न म्हणून मक्याचा वापर केला जातो. खातेमालामधील माया इंडियन लोकांच्या आहारात ७५ ते ८५% मका असतो.
जात्यात अथवा दळणाच्या गिरणीत दळून, चाळून घेतलेल्या मक्याच्या पिठाची भाकरी उत्तर व पश्चिम भारातील अनेक भागांत खाण्यात आहेत. गव्हाच्या पिठात मक्याचे पीठ मिसळून चांगल्या चपात्या बनविता येतात. चुना अथवा राख यांच्या साहाय्याने दाण्यावरील आवरण काढून नंतर दळलेल्या पिठाला चांगला चिकटपणा येतो. मक्याचा रवा गव्हाच्या रव्याऐवजी वापरला जातो. लाह्या, पिठाची लापशी, भाजलेली उकडलेली कणसे या स्वरूपातही मक्याचा वापर केला जातो.
औद्यौगिक उपयोग : यासाठी मक्यावर तीन प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. प्रत्येक प्रक्रियेमागे वेगवेगळा हेतू असतो : (१) शुष्क दळण, (२) आर्द्र दळण, (३) किण्वन (आंबविणे). शुष्क दळण पद्धतीचा उद्देश दाण्याचे टरफल व अंकुर वेगळे काढून पुष्क भरडून त्यापासून निरनिराळ्या आकारमानांच्या कणांची उत्पादने (जाडे व बारीक रवा, पीठ आणि सपीट अथवा मैदा) काढणे हा असतो. आर्द्र दळण पद्धतीत अंकुर, कोंडा, ग्लुटेन व स्टार्च हे क्रमाने वेगळे काढले जातात. स्टार्च हे या पद्धतीत मुख्य उत्पादन असते.
(१) शुष्क दळण : या पद्धतीत मक्याचे दाणे प्रथम कचरा वगैरे काढून स्वच्छ केले जातात. नंतर त्यांच्या टोकाकडील काळा भाग खरडून काढला जातो. दाण्यांत १२% पेक्षा जास्त जलांश असल्यास तो १२% पर्यंत खाली येईपर्यंत खाली येईपर्यंत ते वाळवितात. नंतर दाण्यांवर टप्प्याटप्प्याने पाणी मारून त्यांतील जलांश सु. २०% पर्यंत वाढवितात व कित्येक तासापर्यंत ठेवतात. या क्रियेमुळे पुष्कापासून टरफल पूर्णपणे मोकळे होण्यास मदत होते. नंतर दाणे विशेष प्रकारच्या यंत्रात घालून पुष्क भरडला न जाता अंकुर व टरफल मोकळे केले जातात व चोषणाने ते वेगळे काढून घेण्यात येतात. नंतर विशिष्ट यांत्रिक पद्धतीने पुष्कापासून जाड रवा, बारीक रवा, पीठ आणि सपीट अथवा मैदा वेगवेगळे काढले जातात. जाड रवा माल्टबरोबर शिजवून त्याच्या कपच्या तयार करतात. या कपच्या भाजून ‘कॉर्नफ्लेक’ या नावाने बाजारात विकला जाणारा पदार्थ तयार करतात. मैदा अथवा सपीट बाजारात ‘कॉर्नफ्लोअर’ या नावाने विकले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोनेरी रंगाचे पिवळे तेल काढले जाते आणि भारतात ते जवळजवळ सर्वच्या सर्व साबणासारख्या उद्योगधंद्यात वापरले जाते. अमेरिकेत ते शुद्ध करून खाद्यतेल म्हणून वापरतात. केक व बिस्कटे करण्यासाठी आणि ⇨मार्गारीन तयार करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. कोंडा व तेल काढून राहिलेली पेंड जनावरांना खाऊ घालतात. आर्द्र दळणाच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सोपी आहे.
(२) आर्द्र दळण : या पद्धतीत स्टार्च व तेल ही प्रमुख उत्पादने असून त्यांचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत. ग्लुटेन खाद्य आणि पेंड ही महत्त्वाची दुय्यम उत्पादने आहेत. सल्फ्यूरस अम्लाच्या गरम व विरल द्रावणात स्वच्छ केलेले मक्याचे दाणे ३६ ते ४८ तास बुडवून ठेवतात. या क्रियेमुळे दाण्यावरील टरफल सुटून येते व ग्लुटेन मऊ होते व स्टार्चाचे विरंजन (रंग नाहीसा होणे) होते. यंत्राच्या साह्याय्याने अंकुर व टरफले वेगळी काढली जातात. पुष्क दळून स्टार्च व ग्लुटेन केंद्रात्सारी यंत्राच्या [⟶ केंद्रोत्सारण] साहाय्याने वेगळी केली जातात. स्टार्चावर संस्करण करून डेक्स्ट्रोज, कॉर्न सिरप आणि कॉर्न स्टार्च तयार केले जातात. कॉर्न सिरप हे द्रव ग्लुकोज, स्टार्च सिरप या नावांनीही ओळखले जाते. ते डेक्स्ट्रोज, माल्टोज, डेक्सिट्रने व सु. २०% पाणी यांचे दाट पाकासारखे रंगहीन ते पिवळट रंगाचे मिश्रण असते. मेवामिठाई, जेली, औषधनिर्मिती, तंबाखूवरील प्रक्रिया इत्यादींसाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. अंकुरापासून तेल काढले जाते व ग्लुटेनाचा पशुखाद्यासाठी वापर केला जातो. अथवा त्यावर संस्करण करून ‘झाईन’ नावाचे प्रथिन व ॲमिनो अम्ले तयार केली जातात. झाईनपासून लोकरीसारख्या कृत्रिम धागा तयार केला जातो.
टरफल, अंकुर, ग्लुटेन व स्टार्च काढून घेतल्यावर राहिलेल्या पाण्यात विद्राव्य स्थितीत कार्बोहायड्रेट, प्रथिने व लवणे असतात. बाष्पीभवनाने हे पदार्थ कोरडे करून ग्लुटेन व कोंड्यात मिसळून पशुखाद्यासाठी वापरतात अथवा या पाण्याचा उपयोग पेनिसिलिनासारख्या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थाच्या उत्पादनासाठी करतात.
आर्द्र पद्धतीच्या दळणात मक्यातील स्टार्चाचा सु. ६९% भाग वेगळा काढला जातो. स्टार्चाचे अनेक खाद्य व अखाद्य उपयोग आहेत [⟶ स्टार्च]. भारतात दरवर्षी ७० ते ८० हजार टन स्टार्चाचे उत्पादन होते.
(३) किण्वन : किण्वन उद्योगात स्टार्च व शर्करा यांचा कच्चामाल म्हणून उपयोग केला जातो. किण्वनासाठी यीस्ट अथवा सूक्ष्मजंतू यांचा वापर करतात. एथिल अल्कोहॉल हे या प्रक्रियेतील प्रमुख उत्पादन असून ॲसिटोन, ब्युटिल अल्कोहॉल वगैरे इतर उत्पादने आहेत. [⟶ औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किण्वन].
‘त्वरित’ अन्न : अलीकडे अमेरिकेत ‘सी एस एम’ या नावाखाली जागतिक पातळीवर मुलांना वाटण्यासाठी ‘त्वरित’ अन्न तयार करण्यात येते. मक्याचे पीठ ५४%,सोयीबीन पीठ २४%, दुधाची पूड (मलईविरहीत) ४% साखर १५% जीवनसत्तवे-लवणे ३% मिसळून तयार केलेल्या या अन्न पदार्थात १६.३% प्रथिने, ५.३% वसा, १५% शर्करा व सु. ४९% स्टार्च असतो.
अखाद्य भागांचा उपयोग : परदेशात मक्याच्या वनस्पतीच्या अखाद्य भागांचा निरनिराळ्या उद्योगधंद्यात वापर केला जातो. काही महत्त्वाचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत : (१) खोड : इमारतीचे बांधकाम, कागद व स्फोटक वस्तूंचे उत्पादन, सूत उद्योग, भरण साहित्य. (२) बुरखुंडे : कॉर्कऐवजी (बुचासारखा) वापर, स्वस्त घरे बांधण्यासाठी वाळू व सिमेंट यांमध्ये मिसळून वापर, जळण, नळ तयार करण्यासाठी वापर इत्यादी. बुरखुंडापासून फुरफुराल नावाचा रंगहीन व तेलासारखा द्रव पदार्थ तयार करतात. त्याचा प्लॅस्टिक, त्याची अमेरिकेतून भारतात आयात झाली. अंकुरापासून नायलॉन व इतर उत्पादनांत कच्चा माल म्हणून वापर केला जातो. (३) कणसांवरील आवरणे : सिगारेटच्या कागदनिर्मितीसाठी व भरण साहित्य म्हणून ही वापरली जातात.
भारतात मक्याचा औद्यौगिक उपयोग त्यातील स्टार्चाच्या वापराशी संबंधित असलेल्या धंद्यांपुरताच मर्यादित आहे.
संदर्भ :
1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials. Vol. XI. New Delhi, 1976.
2. I.C.A.R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.
3. Martin, J. H. Cereal Crops, New York, 1963.
4. Sprangne, G. F., Ed., Corn and Corn Improvement, New York, 1955.
5. Wallace, H. A. Bressman, E. N. Corn and Corn Growing, New York, 1949.
परांडेकर, शं. आ. आरगीकर, गो. प्र. गोखले, वा. पु.रूईकर, स. के. मिठारी, भू. चिं.
“