मकर : (कॅप्रिकॉर्न). भारतीय राशिचक्रातील दहावी रास. या राशीत उत्तराषाढा नक्षत्राचे ३ चरण (चतुर्थांश), श्रवण नक्षत्राचे चारी चरण व धनिष्ठा नक्षत्राचे २ चरण मिळून सव्वादोन नक्षत्रांचा समावेश आहे. ही रास दक्षिण खगोलार्धात होरा २० तास ते २२ तास, क्रांती-१०° ते -२०° या [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] मर्यादेत क्रांतिवृत्तावर आहे. ही सप्टेंबरच्या उत्तरार्धात रात्री ९ च्या सुमारास मध्यमंडलावर येते. हिच्यात सहा प्रतिपर्यंतचे [⟶ प्रत] २८ तारे आहेत. त्यांपैकी बीटा (देबी) व डेल्टा (देनेब अलजीदी) हे दोनच तारे तिसऱ्या प्रतीच्या तेजस्वितेचे असून इतर याहून अंधुक आहेत. हे सर्व तारे मिळून एक मोठा वाकडातिकडा त्रिकोण दिसतो. या त्रिकोणाच्या सर्वांत उत्तरेकडे असलेला तारकायुग्म साध्या डोळ्यांनी दिसू शकतो. एम-३० हा एक गोलाकार तारकागुच्छ या राशीत आहे. वरूण या ग्रहाचा शोध याच तारकासमूहात लागला. पॅन देवतेचे माशाचे शेपूट असलेल्या बोकडात रूपांतर होऊन या राशीची आकृती बनली आहे, अशी समजूत आहे.
सूर्य या तारकासमूहात १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारीच्या सुमारास असतो. सुमारे २००० वर्षापूर्वी सूर्याची अधिकतम दक्षिण क्रांती (२३° २७’) सूर्य या राशीत असताना होत असे. आता तशी स्थिती सूर्य धनू राशीत असताना होते.
साधारणमानाने सूर्याची अधिकतम दक्षिण क्रांती २२ डिसेंबर रोजी होऊन सूर्य अंशात्मक सायन (संपातचलन लक्षात घेऊन आलेली) धनू राशीतून सायन मकर राशीत प्रवेश करतो व सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीचे मकरवृत्त याच अनुरोधाने मानलेले असून या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी या वृत्तावर सूर्याचे किरण लंब असतात. मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील अक्षांशावर सूर्याचे किरण कधीच लंब असत नाहीत.
फलज्योतिषाप्रमाणे ही रास दुर्बल असून ही शनीचे स्वगृह मंगळाचे उच्च व गुरूचे नीच स्थान असते. ही रास पृथ्वी तत्त्वाची स्त्रीलिंगी, चर व जलचर असून हिचा अंमल शरीरातील हाडे, गुडघे व सांधे त्याचप्रमाणे नद्या, अरण्ये, सरोवरे व गुहा यांवर असतो. कुंडलीत रविचंद्र मकर राशीत असणारी किंवा मकर लाग्नची कुंडली असलेली व्यक्ती आत्मविश्वास असलेली, महत्त्वाकांक्षी, दीर्घोद्योगी, काटकसरी व आपमतलबी असते.
पहा : राशिचक्र संपात.
ठाकूर, अ. ना.