प्रसिद्धि-पत्रक : (प्रेसनोट किंवा प्रेसरिलीझ्). शासकीय संस्था, औद्योगिक, व्यापारी किंवा सामाजिक सेवा-संस्था, परकीय देशांच्या वकिलाती अथवा सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्ती आपापले कार्यक्रम, कार्य वा मते ह्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ. बहुजन-माध्यमांसाठी जो मजकूर तयार करतात, त्याला प्रसिद्धि-पत्रक किंवा प्रसिद्धिका (हँड-आउट) म्हणतात. विषयाचे महत्त्व आणि उपलब्ध असलेली जागा किंवा वेळ लक्षात घेऊन प्रसिद्धिमाध्यमे प्रसिद्धि-पत्रकातील मजकुराला, आवश्यकता असल्यास त्यांचा संक्षेप करून, प्रसिद्धी देतात.

प्रसिद्धि-पत्रक व प्रसिद्धिका यांमध्ये काही लोक फरक करतात. त्यांच्या मते, प्रसिद्धि-पत्रकांतील मजकूर बातमीवजा व कालसापेक्ष असतो, तर प्रसिद्धिकांतील मजकूर पार्श्वभूमी म्हणून उपयुक्त व आवश्यक माहिती देणारा तसेच तुलनात्मकदृष्ट्या कालनिरपेक्ष असतो. शासकीय व्यवहारातही प्रसिद्धि-पत्रक व प्रसिद्धिका यांमध्ये भेद केला जातो. शासनाची विविध खाती प्रसिद्धि-पत्रके काढतात आणि त्यांच्यातील मजकूराला ‘वृत्तविशेष’ म्हणून प्रसिद्धी देण्याचे काम विभागीय व जिल्हा प्रसिद्धी कार्यालये करतात. शासनाच्या दुय्यम किंवा संलग्न कार्यालयांना प्रसिद्धि-पत्रके काढण्याचा अधिकार नसतो. ती कार्यालये प्रसिद्धिका काढू शकतात. शासकीय प्रसिद्धि-पत्रकांचा न्यायालयात पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो व न्यायालयात त्याला आव्हानही देता येते.

प्रसिद्धि-पत्रक हे मुद्रित, चक्रमुद्रित, टंकलिखित किंवा हस्तलिखितही असते. ते प्रसिद्धीस देणाऱ्या संस्थेचे वा व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ते पत्रक केव्हा प्रसिद्ध करावे, यासंबंधीची सूचना हे तपशील पत्रकाच्या शीर्षस्थानी दिलेले असतात. मजकुराला स्पष्टीकरणात्मक शीर्षकही असते. प्रसिद्धि-पत्रकाचा हेतू किंवा मजकुराचा सारांश प्रारंभी दिलेला असतो. लहान परिच्छेद, आटोपशीरपणा, तर्कशुद्ध व स्पष्ट मांडणी ह्यांना प्रसिद्धि-पत्रकात महत्त्व असते. अनावश्यक विशेषणे, आलंकारिक भाषा, पुनरुक्ती, वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अशा गोष्टींमुळे प्रसिद्धि-पत्रकांची विश्वसनीयता व परिणामकारकता कमी होते. संपादक, वृत्तसंपादक किंवा एखाद्या विशेष विभागाचा संपादक ह्यांना उद्देशून प्रसिद्धि-पत्रक तयार केलेले असते आणि असा संपादक व प्रसिद्धि-पत्रक तयार करणारा जनसंपर्काधिकारी वा प्रसिद्धि-अधिकारी यांमध्ये संपर्क निर्माण करणे, असलेला संपर्क टिकविणे व वाढविणे इष्ट असते. कारण या कामी मिळणाऱ्या यशामुळेच प्रसिद्धि-पत्रकांचे चीज होऊ शकते. काही वेळा प्रसिद्धि-पत्रकांमध्ये छायाचित्रे, नकाशे वा तांत्रिक तपशील इत्यादींचाही समावेश असतो.

परांजपे, प्र. ना.