मंड्या : कर्नाटक राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,००,२६४ (१९८१). हे म्हैसूरच्या ईशान्येस सु. ४२ किमी. बंगलोर-म्हैसूर या लोहमार्गावर व रस्त्यावर वसलेले आहे. कृष्णराजसागर धरणाच्या बांधकामानंतर याची विशेषत्वाने भरभराट झाली. प्रारंभी हे म्हैसूर जिल्ह्यातील एक लहानसे गाव होते परंतु १९२८ मध्ये विश्वेश्वरय्या कालव्याच्या भूसंपादनासाठी येथे महसूल उपविभागीय केंद्र बनविण्यात आले, तर १९३९ मध्ये म्हैसूर जिल्ह्याच्या विभाजनानंतर मंड्या जिल्ह्याचे मुख्यालय येथे करण्यात आले, त्यामुळे शहराच्या विकासास चालना मिळाली.
वाहतुकीच्या सोयीमुळे शहरात उद्योगधंद्यांची भरभराट झालेली आहे. येथे मायसोर शुगर कंपनीने उभारलेला साखर कारखाना (१९३३) असून मद्यनिर्मितीही केली जाते. यांशिवाय येथे रसायने, भात सडण्याच्या गिरण्या इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. व्यापारी केंद्र म्हणूनही मंड्या प्रसिद्ध आहे. येथे कला, वाणिज्य व विज्ञान तसेच तंत्रविद्या यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे. शहरात आकर्षक उद्याने असून जनार्दनस्वामींचे मंदिर उल्लेखनीय आहे. दरवर्षी एप्रिल-मेमध्ये येथे जनार्दनस्वामींची रथयात्रा भरते.
गाडे, ना. स.