मंडलिक, विश्वनाथ नारायण : (८ मार्च १८३३-९ मे १८८९). प्रसिद्ध कायदेपंडित, पत्रकार, लेखक व समाजसुधारक. रावसाहेब मंडलिक म्हणूनच ते ओळखले जात. शिक्षण मुरूड, रत्नागिरी व नंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये. पहिली नोकरी प्रमुख हिशोब तपासनीस म्हणून केली (१८५२). नंतर शाळाखात्यात निरीक्षक (व्हिजिटर) म्हणून १८५५ मध्ये प्रवेश केला व खेड्यापाड्यांत शाळा स्थापन करण्यात पुढाकार घेतला. १८५८ मध्ये वसईला न्यायखात्यात मुन्सफ त्यानंतर पुन्हा शिक्षणखात्यात व पुढे आयकर खात्यात नोकरी केली. सरकारी नोकऱ्यांच्या निमित्ताने त्यांना भूज, कराची इ. दूरदूरच्या ठिकाणी जावे लागले. बारा वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले (१८६३). मध्यंतरी त्यांनी व्यापारात लक्ष घातले पण त्यात ते अयशस्वी ठरले. जून १८६३ पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला. १८६४ साली त्यांनी नेटिव्ह ओपिनियन हे इंग्रजी वर्तमानपत्र एतद्देशीय लोकांचे मत इंग्रज राज्यकर्त्यांच्या कानावर जावे, या उद्देशाने सुरू केले. पुढे त्यात मराठी लेखही प्रसिद्ध होत. समाजात व सरकारदरबारी या पत्राला प्रतिष्ठा लाभली होती. हे पत्र १९०६ पर्यंत चालू होते.

मंडलिकांनी मुंबई विद्यापीठात फेलो, डीन व सिंडिकेट सदस्य म्हणून काम केले. मुंबई नगरपालिकेचे ते अध्यक्षही होते (१८७९). नंतर ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ चे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. मुंबई कायदे कौन्सिलचे ते तीन वेळा, तर गव्हर्नर कलकत्ता येथील कौन्सिलचे एक वेळा सभासद होते. १८७६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली. मुंबई वकील परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम पाहिले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत नोंदविलेली मते आजही उपयुक्त मानली जातात. मुंबईच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ चे ते उपाध्यक्ष व सक्रिय सभासद होते. ‘बंगाल एशियाटिक सोसायटी’ चेही ते सदस्य होते (१८८०). ‘स्टॅटिस्टिकल सोसायटी ऑफ लंडन’ चे फेलो व रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे सदस्य हे सन्मानही त्यांना लाभले. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कार्यातही त्यांनी भाग घेतला. मंडलिकांना रावसाहेब (१८५५) व दिल्ली दरबारातील सी. एस्. आय्. ‘कंपॅनियन ऑफ द स्टार इंडिया’ (१८७८) या सरकारी बहुमानाच्या पदव्या मिळाल्या होत्या रावबहाद्दूर ही पदवी मात्र त्यांनी नाकारली. 

मंडलिकांनी सार्वजनिक जीवनात फार मोठे कार्य केले. त्यांनी समाजसुधारणेचा पुरस्कार केला पण कायद्याने समाजसुधारणा लादू नये, असे त्यांचे मत होते. १८६२ साली मुंबई विद्यापीठातून देशी भाषांना अर्धचंद्र देण्यात आला त्यावेळी त्या ठरावाला त्यांनी जोरदार विरोध केला होता. शिक्षणप्रसाराबरोबर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले. तसेच हुंडाबंदी, जातिभेद यांबरोबरच अंधश्रद्धेपोटी निर्माण झालेले हिंदूंतील कर्मठ आचारविचार यांच्याविरूद्ध त्यांनी कडाडून हल्ला केला. या कामी त्यांना त्यांच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राचा फार उपयोग झाला.

मराठी वाङ्मयात मंडलिकांनी आपल्या लेखनाने महत्त्वाची भर घातली. इंग्रजी, लॅटिन, फार्सी, संस्कृत, मराठी, गुजराती, सिंधी इ. भाषांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचे बहुतेक लेखन प्रामुख्याने भाषांतरवजा, संकलनात्मक व उद्बोधक स्वरूपाचे आहे. यांशिवाय त्यांच्या रोजनिश्या, पत्रव्यवहार इत्यादींतूनही त्यांच्या विचारांचा मूल्यवान ठेवा विखुरलेला आहे. इतिहास, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा, साहित्य इ. विषयांत व्यासंगपूर्वक लहानमोठी ग्रंथरचना केली. हिंदुधर्मशास्त्रावर त्यांनी संशोधनपूर्ण लेखन केले. १८८० मध्ये त्यांनी व्यवहारमयूखयाज्ञवल्क्यस्मृति या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले. ते आजही मौलिक मानले जाते. त्यांचे काही महत्त्वाचे खालील ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत : (१) सवयी व अभ्यास (१८५७), (२) हिंदु लोकांच्या मध्यंतरीय अवस्थेविषयी विचार (१८६२), (३) हिंदुस्थानचा इतिहास (३ भाग, १८६१-६२), (४) दिवाणी कायद्याची चूर्णिका, (५) कोकणातील वतनदार खोतांचा इतिहास, (६) मुंबई इलाख्याचा इतिहासभूगोल. तसेच त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या निबंधांपैकी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, जातिनिर्मूलन, शिमगा, मुरूडचा इतिहास, पश्चिम हिंदुस्थानातील नागपूजा, महाबळेश्वर येथील कृष्णा नदीचा उगम, संगमेश्वर महात्म्य इ. निबंध उल्लेखनीय आहेत. कायदा व राज्यशास्त्र या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे हे लेखन राइटिंग्ज अँड स्पिचेस ऑफ द लेट ऑनरेबल रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक या नावाने संगृहीत करण्यात आले आहे (१८९६). रावसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व ग्रंथसंपदा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला देण्यात आली (१९०७).

रावसाहेबांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी अंजर्ले येथील काणे ऊर्फ हवालदार यांच्या घराण्यातील सात वर्षांच्या सखुताईशी झाला. सखुताईना अन्नपूर्णाबाई या नावानेही ओळखीत असत. ऐन तारूण्यात त्या व्याधिग्रस्त झाल्याने रावसाहेब निराश असत. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. मुंबई येथे रावसाहेबांचे निधन झाले. 

संदर्भ : 1. Mandlik, R.V. Padhye, D. K. Ed. Writings and Speeches of the Late Honourable Rao  Saheb Vishvanath Narayan Mandlik, Bombay, 1896.

           २. हवालदार, गणेश रामकृष्ण, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र, २ भाग, मुंबई,  १९२७.

टोपे, त्र्यं. कृ. संकपाळ, ज. बा.