प्रतिकूल कबजा : (ॲड्व्हर्स पझेशन). दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकतीवर आपला मालकी हक्क संपादन करणे म्हणजे प्रतिकूल वा गैरहक्काचा कबजा होय. कबजा हे मिळकतीच्या स्वामित्वाचे निदर्शक समजले जाते. एखाद्या मिळकतीवरील तिच्या कायदेशीर मालकाचे स्वामित्व झुगारून देऊन त्या मिळकतीचा निर्वेधपणे, सातत्याने, उघडपणे, जाहीर रीतीने, बनावट मालकी हक्काने पण प्रत्यक्षात कबजा घेणे व तो चालू ठेवणे याला प्रतिकूल कबजा असे म्हणतात. ठराविक मुदतीपर्यंत असा कबजा अविरोध चालू राहिल्यास, अशा कबजेदारास सदर मिळकतीचे स्वामित्व प्राप्त होते. हे तत्त्व प्राचीन काळापासून समाजात मान्यता पावलेले आहे. गौतमाच्या मते पौगंडावस्थेतील किंवा विकलेंद्रिय अशा व्यक्ती वगळता, इतरांची स्थावर किंवा जंगम मिळकत वरीलप्रमाणे उपभोगणाऱ्यास,दहा वर्षांनतर त्या मिळकतीचे स्वामित्व प्राप्त होते. मात्र हा नियम त्याने जमिनीबद्दल मान्य केलेला नाही. कौटिल्याने ही कालमर्यादा २० वर्षांची मानली. मनूने ही मर्यादा भूमीसह सर्व मिळकतीच्या बाबतीत मान्य केली. याज्ञवल्क्याने २० वर्षे ही भूमीबद्दल मर्यादा मानून, इतर मिळकतीच्या बाबतीत ही १० वर्षांची मानली. इतर देशांतही हे तत्त्व विधिज्ञांनी मान्य केलेले दिसते. जी व्यक्ती स्वतःच्या कायदेशीर हक्काबद्दल दीर्घकाळ उदासीन राहते तिला त्या हक्काची गरज नसते, हे सर्वसामान्य तत्त्व प्रतिकूल कबजाच्या मुळाशी आहे. १९६३ चा भारतीय मुदत अधिनियम, कलम ६५ अन्वये प्रतिकूल कबजाचे मालकी हक्कात रूपांतर होण्यास खाजगी व्यक्तीच्या मिळकतीबाबत १२ वर्षे व कलम ११२ अन्वये सरकारी मिळकतीबाबत ३० वर्षे मुदत आहे. प्रतिकूल कबजा अशा कबजाच्या सुरुवातीपासूनच सुरू होतो अगर विहित कायदेशीर कबजाची मुदत संपल्यावर तो पुढे बेकायदेशीरपणे चालू ठेवल्यास, तेव्हापासून प्रतिकूल वा गैरहक्काचा ठरतो. प्रतिकूल कबजेदाराच्या बाबतीत खऱ्या मालकाची मालकी स्पष्टपणे धुडकावून लावण्याचा हेतू असला पाहिजे. निव्वळ परवानाधारक हा परवानामुदतीत प्रतिकूल कबजेदार होऊ शकत नाही. तसेच जो कबजेदार मूळ मालकाची मालकी नाकारीत नाही, तोही प्रतिकूल कबजेदार होत नाही. पडीक, ओसाड व बंदिस्त नसलेल्या मिळकतीबद्दल मात्र प्रतिकूल कबजाचा हक्क न्यायालयांनी मान्य केला नाही. त्याचप्रमाणे मूळ मालक व्यक्ती अज्ञान, विकल मनाची किंवा विधवा असेल, तरीही प्रतिकूल कबजाचा हक्क तत्त्वान्वये मागता येत नाही.

कुलकर्णी, स. वि. नाईक, सु. व.