भैरव थाटातील राग: हिंदुस्थानी संगीतपद्धतीतील एक प्राचीन व महत्त्वपूर्ण थाट. सातही स्वर घेणारा भैरव हा थाट असून त्यातील ‘रे’ आणि ‘ध’ हे केवळ दोन स्वर कोमल आहेत. या रागाचे प्राचीन नाव ‘मालवगौड’ आहे. दाक्षिणात्य संगीतपद्धतीत पहिल्याने जो भैरव राग शिकवितात तोही याच नावाने ओळखला जातो. या थाटात भैरव, कालिंगडा, रामकली, बंगाल-भैरव, आनंद-भैरव, सौराष्ट्र-भैरव, सौराष्ट्रटंक, अहीर-भैरव, शिवमत-भैरव, प्रभात, ललित-पंचम, मेघरंजनी, गुणक्री, जोगिया, सावेरी, देवरंजनी, विभास, झीलफ, जंगूला हे राग मुख्यतः अंतर्भूत आहेत. रागांच्या नावांमध्ये अनेक प्रदेशनामांचा आढळ व शिवमतसारख्या प्राचीन संगीत-संप्रदायदर्शक संज्ञेचा रागनामांत समावेश याही खुणा भैरव थाटाच्या प्राचीनत्वाच्या मानता येतील. हा संधिप्रकाश थाट मानला जातो. सूर्योदयाच्या वा सूर्यास्ताच्या पूर्वी काही वेळ संधिप्रकाशाचा प्रारंभ होतो व नंतर काही काळ तो टिकून राहतो. या संधिप्रकाशात गायला जाणारा हा राग आहे.

मराठी लोकसंगीतात अनेक वेळा भैरव थाटाच्या सुरावटींचा भास होत असतो.

संदर्भ : भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीतपद्धति), भाग १, २, हाथरस, १९५६, १९५७.

रानडे, अशोक