भूद्रोणी : (जिओसिंक्लिन). ज्याच्यात प्रादेशिक प्रमाणावर (मोठ्या क्षेत्रावर) दीर्घ काळात प्रचंड जाडीचा गाळ साचला आहे, असे भूपृष्ठावरील लांबट व निरूंद क्षेत्र. भूकवचाचा असा लांब व सापेक्षतःअरूंद भाग खालील दिशेत वाकविला जाऊन पन्हळासारखी संरचना निर्माण होते. नंतर या पन्हळात गाळ साचत जातो. पन्हळाचा तळ खचत जाणे व गाळ साचणे या क्रिया दीर्घकाळ चालू राहातात. त्यामुळे अशा जागी हजारो मीटर जाडीचा गाळ साचतो व भूद्रोणी तयार होते. भूद्रोणीच्या व्याख्येविषयी मतभेद आहेत मात्र परंपरागत अर्थाने भूद्रोणी शेकडो किलोमीटर लांब व काही दशक किलोमीटर रूंद असते आणि तिच्यात कोट्यवधी वर्षे हजारो मीटर जाडीचे खडक साचतात. उदा., अँपालॅचिअन भूद्रोणीत (न्यूयॉर्क राज्य) सु. ३० कोटी वर्षात सु. १३,००० मी. जाडीचे गाळाचे खडक साचले आहेत. सामान्यपणे असे गाळ उथळ पाण्यात साचलेले असतात. जसजसा गाळ साचतो तसतसा भूद्रोणीचा तळ खचतो व परिणामी उथळ पाण्यातील प्रचंड जाडीचे गाळ साचू शकतात. भूद्रोणीतील गाळाची जाडी मध्यभागी सर्वात जास्त असते, तर कडांना ती कमी होत जाते. उदा., कॅलेडोनियन भूद्रोणी (वायव्य यूरोप) मध्यभागी सु. १३,००० मी. तर कडांशी सु. ४,००० मी. जाड आहे. अशा तऱ्हेने भूद्रोणीचा मधला भाग सर्वाधिक खोल गेलेला असल्याने ती पन्हळासारखी असते. मात्र तिचा पृष्ठभाग सामान्यपणे सपाट असतो.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास डब्ल्यू. बी. रॉजर्स आणि एच्. डी. रॉजर्स यांनी अँपालॅचिअन पर्वतातील घड्या पडलेले खडक हे एका मोठ्या खोलगट प्रदेशात साचले असल्याचे दाखवून दिले. यांपैकी बहुतेक गाळाचे खडक हे उथळ पाण्यात साचल्याचेही त्यांना आढळले. याचा अर्थ गाळ साचत असताना हा खोलगट भाग हळूहळू खचत होता, हे स्पष्ट झाले. याच काळात (१८५९ मध्ये) जेम्स हॉल यांनी भूद्रोणीची कल्पना मांडली होती. मात्र ‘जिओसिंक्लिन’ ही इंग्रजी संज्ञा जे. डी. डेना यांनी १८७३ साली अँपालॅचिअन पर्वताच्या निर्मितीच्या संदर्भात प्रथम वापरली. डेना यांच्या मते भूकवच आडव्या दिशेत दाबले जाऊन असा खोलगट भाग बनत असावा. एल्. डी. कॉलेट यांच्या मतानुसार दोन खंडीय ठोकळ्यांत वा भूमींत भूद्रोणी असते व तिच्यात साचलेला काही गाळ हा गौण उंचवट्याची झीज होऊन आलेला असतो. आर्. एम्. फील्ड यांच्या मते भूद्रोणी हा दोन खंडीय ठोकळ्यांतील पन्हळासारखा प्रदेश असून तो जमिनीवरील व सागरी गाळ साचण्याचे केंद्र बनलेला असतो आणि हे गाळ भूद्रोणीतील आणि तिच्या कडांजवळील व तिच्याशी निगडित अशा उंचवट्याची झीज होऊन आलेले असतात. एच्. शिटले हे बराच काळपर्यत खचत जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांना भूद्रोणी ही संज्ञा वापरीत असत.
एकोणिसाव्या शतकाअखेरीस अँपालॅचिअन भूद्रोणी ही भूद्रोणीचे नमुनेदार उदाहरण मानले जाई. एकेकाळी लांबट व निरूंद असलेला हा पन्हळासारखा भाग कुठल्या तरी उंचवट्याने महासागरापासून अलग झालेला होता व त्याच्या सीमावर्ती प्रदेशात तयार होणारे गाळ त्यात साचत होते, असे मानीत असत. खंडाच्या दोन स्थिर टोळक्यांतील अस्थिर पट्टा म्हणजे भूद्रोणी होय. असे जी. ई. हॉग यांचे मत होते. त्यांनी ईस्ट इंडियन गर्त (खोलगट भाग) वा जपानी गर्त यांसारख्या महासागरी खळग्यांचाही भूद्रोणीत समावेश केला होता मात्र अशा खळग्यांसाठी त्यांनी ‘फोरडीप’ (अग्रखात) ही संज्ञा वापरली. अर्थात अशा खळग्यांतील गाळ हा खोल पाण्यात साचल्याचे दिसून येते. भूद्रोणीत गाळ साचताना खचण्याची क्रिया सतत एकाच गतीने होत नसते, असे जे. बॅरेल यांनी १९१७ साली दाखवून दिले. १९२३ साली सी. शुकर्ट यांनी भूद्रोणीतील गाळ साचण्याच्या क्रिया अनेक घटकांवर अवलंबून असल्याचे दाखविले. १९४७ साली एम्. एफ्. ग्लीसनर व सी. टाइशर्ट यांनी गाळ साचणे, पर्वतनिर्मिती व भूसांरचनिक (भूकवचाच्या मोठ्या संरचनांविषयीचे) आविष्कार या दृष्टींनी भूद्रोणीचा अभ्यास केला पाहिजे असे सुचविले. एच्. शिटले यांनी भूद्रोणींचे वर्गीकरण केले असून त्यात एम्. के यांनी थोडी सुधारणा केली तर जे. ओबूअँ यांनी केलेले वर्गीकरण सर्वांत अलीकडचे आहे.
भूद्रोणी या भूकवचातील सापेक्षतः दुर्बल, अस्थिर व लवचिक अशी क्षेत्रे असतात. भूद्रोणीचा तळ तिच्यावरील गाळाच्या वजनाने खालील
दिशेत वाकविला जातो, असे पूर्वी मानीत असत परंतु केवळ गाळाच्या वजनाने भूकवचाला एवढा बाक येणार नाही, हे नंतर लक्षात आले. भूद्रोणी निर्माण होताना भूकवचाला खालील दिशेत येणारा बाक हा अज्ञात भूवैज्ञानिक प्रेरणांमुळे येतो, असे हल्लीचे मत आहे. यामुळे भूकवचातील ⇨समस्थायित्वाचा समतोल ढळतो व भूकवचात तीव्र असे ताण निर्माण होतात. शेवटी या ताणामुळे भूद्रोणीतील गाळावर दोन्ही बाजूंस असलेल्या स्थिर ठोकळ्यांकडून वा भूमीकडून दाब पडतो आणि सांडशीत पकडलेल्या वस्तूप्रमाणे गाळाचे खडक चुरडले जाऊन त्यांना घड्या पडतात व त्यामुळे गाळ वर उचलले जात असतात. घड्यांशिवाय या खडकांत विभंग (तडे) पडतात व प्रणोद विभंगामुळे [ज्यातील उपरिभिती आधार भित्तीच्या सापेक्ष वर सरकवलेली आहे अशा ४५° पेक्षा कमी कोन असलेल्या विभंगामुळे ⟶ विभंग, खडकांतील] हे खडक दूरवर सरकले जातात. भूकवचातील अशा हालचालींच्या जोडीने बहुधा ज्वालामुखी क्रियाही घडून येते (उदा., कॅलेडोनियन भूद्रोणीच्या जोडीनेच इंग्लंडमधील मिडलँड भागात लाव्हा प्रवाहही आढळतात) व सामान्यपणे भूद्रोणीच्या अक्षाच्या दिशेत स्फटिकमय अग्निज खडकांची अंतर्वेशने (घुसण्याची क्रिया) होतात. अशा तऱ्हेने या एकूण प्रक्रियेद्वारे भूद्रोणीपासून घडीचा पर्वत निर्माण होतो व या प्रक्रियेला ⇨ गिरिजनन असे म्हणतात.
पहा : गिरिजनन घड्या, खडकांतील पर्वत.
संदर्भ : Aubouin, J. Geosynclines, New York, 1965.
“