भूक : अन्न न मिळाल्यामुळे, अंशतः जठर रिकामे असल्यामुळे आणि अंशतः अधोथॅलॅमसातील [तिसऱ्या मस्तिष्क-मेंदू-विवराच्या भित्ती व तळभाग यांच्याशी संबंधित असलेल्या केंद्रक गटातील ⟶ तंत्रिका तंत्र ] विशिष्ट क्षेत्राच्या क्रियाशीलतेमुळे उत्पन्न होणाऱ्या एका अनिश्चित स्वरूपाच्या संवेदनेला ‘भूक’ म्हणतात. या संवेदनेबरोबरच अस्थानीय स्वरूपाचा अशक्तपणा किंवा ग्लानीही जाणवते. जठर रिकामे असताना अन्नसेवनाकरिता जी वखवख उत्पन्न होते, तिला भूक म्हणता येईल. कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या अन्नाची इच्छा उत्पन्न होण्याला ‘अन्नाकांक्षा’ म्हणतात किंबहूना कोणते अन्न व अन्नप्रकार पाहिजे हे ज्यामुळे ठरते ती अन्नाकांक्षा होय. भोजनाच्या वेळी भूक व अन्नाकांक्षा प्रत्येक निरोगी व्यक्तीत जागृत झालेल्या असतात. पुष्कळ वेळा दोन भोजनांच्या दरम्यान अन्नाकांक्षा भुकेस प्रदीप्त करते. काही बाह्य गोष्टी उदा., अन्न दृष्टीस पडणे, अन्नपदार्थाचा सुगंध, अन्न सेवनातील गोड अनुभव इत्यादींचा अन्नाकांक्षेवर परिणाम होतो. जेवणाच्या पानाभोवतालची सुंदर रांगोळी किंवा टेबलावरील सुंदर फुले अन्नाकांक्षेला पूरक असतात. अवलंबी प्रतिसादामुळे [⟶प्रतिक्षेपी क्रिया] प्रामुख्याने अन्नाकांक्षा निर्माण होते म्हणूनच नवजात अर्भकाला भुकेची जाणीव असते परंतु अन्नाकांक्षा नसते. अन्नाकांक्षेवर जठराच्या सर्वसाधारण स्थितीचा परिणाम होतो. याचमुळे जेवणापूर्वी सेवन केलेले अल्कोहॉलयुक्त पेय अन्नाकांक्षा वाढवते. अन्नाकांक्षा अन्नाची रुची व स्वाद यांच्या सुखोत्पादक आठवणीशी निगडीत असते. अन्नाकांक्षा मानसशास्त्रीय स्वरूपाची असते, तर भूक शरीरक्रियाविज्ञानाशी निगडीत असते.
स्वाभाविक भूक पूर्णपणे आवर्ती (ठराविक कालखंडानंतर पुनःपुन्हा उद्भवणारी) नसते परंतु प्रशिक्षणानंतर ती नियमितपणे पुनरावर्तित होऊ शकते. भुकेच्या सुरुवातीस फारशी अस्वस्थता जाणवत नाही पण काही वेळानंतर अधिजठर भागात वेदना जाणवू लागतात. या वेदनांना ‘भूक-कळा’ म्हणतात. या वेदनांबरोबरच भुकेजलेला प्राणी अधिक ताण पडलेल्या अवस्थेत जाऊन अस्वस्थ बनतो. अन्न मिळण्यास पुष्कळ विलंब झाल्यास कमालीचा अशक्तपणा येऊन शेवटी उपासमारजन्य मुग्धभ्रांती भ्रम, शारीरिक अस्वस्थता व असंगतता इ. लक्षणे असलेला मानसिक विक्षोभ) उत्पन्न होते.
मानव आणि इतर प्राण्यांच्या शरीरातील अन्नाचे व पाण्याचे प्रमाण घटले म्हणजे त्यांना भूक व तहान लागते. ही शरीरक्रियात्मक न्यूनता या संवेदनांचा प्रारंभ करणे, त्या चालू ठेवणे आणि थांबवणे या गोष्टी कशा कार्यान्वित करते हा अजूनही शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. तहानेविषयी असे निश्चितपणे म्हणता येते की, शरीरातील एकूण पाण्याच्या न्यूनतेपेक्षा शरीरकोशिकांतील (शरीरामधील पेशीतील) पाण्याची न्यूनता अधिक कारणीभूत असते [⟶तहान]. शरीरक्रियावैज्ञानिकांना अजून याविषयी, विशेषेकरून भूक या संवेदनेविषयी, पूर्ण उलगडा झालेला नाही. यामुळे भुकेसंबंधी काही सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत : (१) परिसरीय सिद्धांत, (२) मध्यवर्ती सिद्धांत आणि (३) इतर काही सिद्धांत.
भुकेसंबंधीचे विविध सिद्धांत : परिसरीय सिद्धांत : यामध्ये शरीराच्या परिसरीय भागातून (उदा., जठराची आकुंचने) भुकेशी निगडीत असल्याचे मानण्यात येते. डब्ल्यू. बी. कॅनन या शरीरक्रियावैज्ञानिकांचे नाव या सिद्धांताच्या संदर्भात प्रामुख्याने घेतले जात असले व कधीकधी या सिद्धांताला ‘कॅनन सिद्धांत’ असे नावही दिले जात असले, तरी ए. एल्. वॉशबर्न आणि ए. जे. कार्लसन या शास्त्रज्ञांची नावेही या सिद्धांताशी निगडीत आहेत. या शास्त्रज्ञांनी १९१२ च्या सुमारास भूक-कळांविषयी काही प्रयोग केले.
या प्रयोगांत एक हवारहित रबरी फुगा नळीला जोडून जठरात ठेवण्यात आला आणि भूक लागली असताना व वेदना जाणवू लागताच त्यामध्ये हवा भरून तो फुगविण्यात आला. त्यामुळे जठरभित्तीच्या आतील भागाशी फुग्यांचा संपर्क येऊन भित्तीची आकुंचने फुग्यातील हवेमार्फत बाहेर जोडलेल्या नोंद उपकरणापर्यंत पोहोचून त्यांची नोंद करण्यात आली. भूक नसतानाही अशीच नोंद केली असताना असे आढळून आले की, भूक-कळा सुरू होताच जोरदार आकुंचनांची जशी नोंद होते तशी भूक नसताना होत नाही.
या प्रयोगानंतर भूक व तहान या संवेदना परिसरीय भागात (जठराच्या आकुंचनामुळे भूक आणि घशाला कोरड पडण्यामुळे तहान) उत्पन्न होतात, असा सिद्धांत मांडण्यात आला. कॅनन यांच्या नावाशिवाय त्याला ‘स्थानीय’ (उदा., जठरजन्य) असेही म्हणत. तहानेविषयी असे लक्षात आले की, लाला ग्रंथीचा जन्मजात अभाव असणाऱ्या व्यक्तीस या सिद्धांताप्रमाणे सतत तहान लागावयास हवी परंतु तसे आढळत नाही. जठराच्या संवेदी तंत्रिका (मेंदूकडे संवेदना आवेग वाहून नेणारे मज्जातंतू) कापल्यानंतर किंवा सबंध जठरच शस्त्रक्रियेने काढून टाकले (जठरोच्छेदन) तरीही भूक संवेदना कायम असते. यावरून जठर आकुंचने किंवा घशाची कोरड यांचा भूक व तहान यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नसून या गोष्टी केवळ आनुषंगिक असाव्यात, असा निष्कर्ष निघतो. भूक-कळा सर्वसाधारणपणे २ ते ३ मिनिटे टिकतात व १० ते १५ मिनिटांनी पुनरावर्तित होतात. तीन-चार दिवस अन्न न मिळाल्यास त्यांची तीव्रता हळूहळू कमी होते. भूक-कळा तारुण्यावस्थेत विशेष जाणवतात कारण त्या वयात जठर स्नायूंचा तान (जोम व ताण) उत्तम असतो.
मध्यवर्ती सिद्धांत : प्रमस्तिष्काच्या (मोठ्या मेंदूच्या) तळभागात असणाऱ्या व अधोथॅलॅमस हे नाव असलेल्या विशिष्ट क्षेत्राशी भूक व तहान या संवेदनांचा संबंध आहे, असे मानणाऱ्या सिद्धांताला ‘मध्यवर्ती सिद्धांत’ म्हणतात. हे क्षेत्र हॉर्मोन-उत्पादन (काही नलिका-विरहीत ग्रंथीपासून उत्पन्न होणाऱ्या व सरळ रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावांचे उत्पादन) आणि इतर काही अनैच्छिक शरीरक्रियांशी संबंधित असते [⟶⟶ तंत्रिका तंत्र]. या क्षेत्रात मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस एक एक अन्नसेवन केंद्र आणि एक एक तृप्ती केद्र असते. अन्नसेवन केंद्राच्या अभिमध्य बाजूस तृप्ती केंद्रे असतात.
विशिष्ट तंत्र वापरून एखाद्या प्राण्याच्या तृप्ती केंद्रातील कोशिकांचा नाश केल्यास तो प्राणी भरमसाट खात सुटतो व गलेलठ्ठ बनतो. अन्नसेवन केंद्रांतील कोशिकांचा नाश केल्यास प्राणी अन्नसेवन थांबवतो आणि शेवटी पुष्कळसे अन्न उपलब्ध असूनही उपासमारीने मरतो. मांजर व माकड या प्राण्यांवरील असे प्रयोग अधोथॅलॅमसाच्या अन्नसेवन नियंत्रण कार्याला दुजोराच देतात. याशिवाय मानवातील या क्षेत्राचे रोग अती भूक किंवा भूकेचा पूर्ण अभाव अशा लक्षणांशी निगडित असल्याचेही आढळले आहे.
अलीकडील संशोधनानुसार अधोथॅलॅमसातील या स्वतंत्र केंद्राबद्दलचा सिद्धांत त्याज्य ठरविला गेला आहे. अन्नसेवन क्रिया आणि तिच्याशी संबंधित असणारी तंत्रिका यंत्रणा या दोन्ही अतिशय जटिल (गुंतागुंतीच्या) असल्याचे आता मान्य झाले आहे. प्रयोग केलेल्या प्राण्यांच्या अधिक अभ्यासानंतर असे आढळून आले की, अन्नसेवन क्रियेतील बिघाडाशिवाय अशा प्राण्यांमध्ये काही वर्तनसंबंधित बदलही होतात. संवेदी उद्दीपकांना (चेतकांना) प्रतिसाद न देणे, प्रेरक क्रियांत गंभीर बिघाड होणे आणि जागृतावस्थेत आणण्यास विलंब लागणे यांसारखे बिघाड दिसून येतात. थोडक्यात म्हणजे अधोथॅलॅमसातील केवळ विशिष्ट क्षेत्राशीच संबंधित अशी अन्नसेवन क्रियेची सोपी यंत्रणा नाही. मेंदूतील इतर भाग किंबहुना संपूर्ण मेंदूच या क्रियेशी संबंधित असण्याचा संभव आहे.
इतर काही सिद्धांत : (अ) रक्तातील ग्लुकोजाची नेहमीची पातळी (उपाशी पोटी ७० ते १०० मिग्रॅ. प्रत्येक १०० मिली. मध्ये) अन्नसेवनानंतर ठराविक पातळीपर्यंत वाढते (१३० ते १८० मिग्रॅ.). रक्तातील ग्लुकोजाची नेहमीची पातळी कमी झाली म्हणजे भूक लागते असा एका सिद्धांताचा दावा आहे व या सिद्धांताला ‘स्थिर ग्लुकोज सिद्धांत’ म्हणतात परंतु मधुमेही व्यक्तीत ही पातळी नेहमीच वाढलेली असूनही मधुमेही व्यक्तीला कधीकधी अतिशय भूक लागते, हा अनुभव या सिद्धांताशी जुळत नाही. कदाचित रक्तातील ग्लुकोज पातळीपेक्षा ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) ते वापरण्याची मंदावस्था कारणीभूत होत असावी. मधुमेही व्यक्तीत ऊतकातील ग्लुकोज वापर मंद झाल्याचे आढळते. मेंदूतील कोशिकांवरही तसाच परिणाम होतो व जेव्हा अशी मंदावस्था येते तेव्हा या कोशिका अधिक अन्नसेवनास उद्युक्त करतात. या कोशिकांना ‘ग्लुकोज ग्राही’ कोशिका म्हणतात. रक्तातील ग्लुकोज पातळीचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले आहे की, त्यावर भूकनियंत्रण प्रत्यक्ष आणि एकमेव कारक म्हणून अवलंबून नसून ती भुकेशी संबंधित मात्र आहे. हार्व्हर्ड विद्यापीठातील जे. मायर या शास्त्रज्ञांनी १९५३ मध्ये असे दाखवून दिले की, ज्या वेळी ऊतक कोशिकांतील ग्लुकोजाचा राखीव साठा पुष्कळ असतो तेव्हा भूक न लागता तृप्तीची भावना असते. याउलट जेव्हा हा साठा कमी होतो तेव्हा भूक लागते.
ग्लुकोजाशिवाय प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ) इ. अन्नघटकांचा भूकनियंत्रणाशी संबंध आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्टपणे समजलेले नाही. मीठ, कॅल्शियम आणि काही जीवनसत्वांसंबंधी प्रयोग करण्यात आले आहेत तथापी त्यांचे निष्कर्ष अनिश्चित स्वरूपाचे आहेत. एवढे मात्र निश्चित की, विशिष्ट घटकाची तूट भरून काढण्याकरिता तो घटक असलेल्या पदार्थासंबंधी अन्नाकांक्षा वाढते.
वरील सिद्धांताशिवाय अधोथॅलॅमसातील या केंद्रावरील औष्णिक उद्दीपकाविषयी अभ्यास करण्यात आला आहे. थंडीच्या दिवसात अधिक भूक लागते आणि याउलट उन्हाळ्यात विशेषेकरून तापमान अतिशय वाढलेल्या दिवशी भूक मंदावते हा नित्यानुभव आहे. फिलाडेल्फिया येथील शास्त्रज्ञ जे. आर्. ब्रोबेक यांनी अधोथॅलॅमसातील ही केंद्रे रक्ताच्या तापमानास अतिशय संवेदनाशील असल्याचे सुचविले आहे. रक्ताचे वाढते तापमान तृप्ती केंद्राना चेतवते, तर नेहमीपेक्षा कमी तापमान अन्नसेवन केंद्रास चेतवते.
वर वर्णन केलेल्या तंत्रिकाजन्य, रासायनिक आणि औष्णिक उद्दीपकांचे कार्य, जंगली जनावरांच्या अन्नसेवनविषयक वर्तनावर महत्त्वाचा परिणाम करीत असावे. प्रत्येक प्रकारच्या उद्दीपकात अन्नसेवनास प्रारंभ करण्याची क्षमता आहे. मात्र सर्वच मानवजातीविषयी असे म्हणता येणार नाही. दैनंदिन जीवनातील साधेपणा नाहीसा झालेला आजचा मानव भूक लागली म्हणूनच अन्न सेवन करतो असे नाही. पुष्कळ वेळा, बहुधा नेहमीच, कुणीतरी माता, पत्नी किंवा खानावळवाल्याने अगोदर ठरविलेल्या ठराविक वेळीच अन्नसेवन केले जाते. शरीरक्रियात्मक गरजेपेक्षा रूढी व सामाजिक सवयी अन्नसेवनाच्या वेळा ठरवितात.
(आ) तंत्रिका-रासायनिक नियंत्रण: संदेशवाहक तंत्रिकांमार्फत येणाऱ्या संदेशांचे कृतीत रूपांतर होण्याकरिता ज्या विशिष्ट रासायनिक पदार्थांची गरज असते त्यांना तंत्रिका-रासायनिक प्रेषक म्हणतात. नॉरएपिनेफ्रीन नावाचा असा प्रेषक पदार्थ अग्रमेंदूतील कोशिका जेव्हा ग्रहण करतात तेव्हा अन्नसेवन वाढल्याचे आढळते. याउलट सिरोटोनीन नावाचा पदार्थ अन्नसेवन कमी करतो. या सिद्धांताचा सर्वस्वी स्वीकार करणे अशक्य आहे कारण केंद्रीय तंत्रिका तंत्राशी संबंधित असलेल्या अनेक प्रेषकांपैकी अत्यल्प प्रेषकांचाच शोध लागलेला आहे.
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की, भूक कशी उत्पन्न होते हे अजून निश्चित समजलेले नाही. या विषयीच्या संशोधनात भुकेशी संबंधित संवेदी तंत्रिका तंत्र, जिच्यामुळे केव्हा व किती अन्नसेवन करावे हे ठरते ती शरीरक्रियात्मक यंत्रणा आणि कोणता अन्नप्रकार सेवन करावा याबद्दलची यंत्रणा, हे विषय प्रमुख आहेत.
काही विकृती : क्षुधानाश : क्षुधानाश अथवा भूक न लागण्यास कधीकधी भावना क्षोभ कारणीभूत असतो. आंत्रमार्गासंबंधीच्या (आतड्यासंबंधीच्या) अनेक विकृतीत क्षुधानाश हे एक लक्षण असते. तीव्र गिरी विकार (३,०५० मी. उंचीपर्यंत जलद पर्वतारोहण केल्यामुळे उत्पन्न होणारी विकृती), सूक्ष्मजंतुजन्य निरनिराळे रोग, प्रारण उद्भासनजन्य रोग [⟶प्रारण जीवविज्ञान], क्षयरोग, ⇨ ॲडिसन रोग इ. रोगांत क्षुधानाश हे एक लक्षण असते. रोगामध्ये क्षुधानाश नेमका कशामुळे उद्भवतो हे अजून समजले नाही. प्रामुख्याने पाश्चात्य देशांतून, विशेषेकरून तरुण मुलींत आढळणाऱ्या उन्मादयुक्त क्षुधानाशाला ‘मनोमज्जाविकृतियुक्त क्षुधानाश’ म्हणतात. क्षुधानाशाबरोबरच निरनिराळे भयगंड, विषण्णता, आशंका यांसारखी मनोनिर्मित लक्षणेही या रोगात आढळतात.
भस्मक रोग अथवा अती खा खा करणे : या विकृतीत भूक संवेदना वारंवार जागृत झाल्यामुळे अन्नसेवन पुष्कळ वेळा करावे लागते. कधी कधी आंत्रमार्गातील व्रण वारंवार खाण्यास कारणीभूत असतो. पुष्कळ वेळा खाऊनही एकूण अन्नसेवना प्रमाचेण नेहमी एवढेच असते. यामुळे वजनवाढ, लठ्ठपणा वगैरे सहसा आढळत नाही.
बहुभक्षता अथवा अती भूक : वाढत्या वयात आणि कुमारावस्थेत विशेषेकरून शारीरिक वाढ होत असताना अती भूक लागते. या ठिकाणी ती शरीरक्रियात्मक गरज असते. काही रोगांत (उदा., मधुमेह) आणि काही मानसिक विकृतीत बहुभक्षता आढळते. या विकृतीत पुष्कळ वजनवाढ व लठ्ठपणा आढळतात.
पहा : उपासमार तहान.
संदर्भ : 1. Davidson, S. and others, Ed., Human Nutrition and Dietetics, Edinburgh, 1973.
2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.
3. Houssay, B. A. and others, Ed., Human Physiology, Tokyo, 1955.
4. Isselbacher, K. J. and others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine, Tokyo, 1980.
5. Scott, R. B., Ed., Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.
कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.
“