भुंगा : भ्रमर (भ्रमर कार्पेंटर बी). या कीटकाचा समावेश हायमेनॉप्टेरा गणाच्या झायलोकोपिडी कुलात होतो. याचे शास्त्रीय नाव झायलोकोपा एस्ट्युआन्स असे आहे. याच्या अठरा जाती भारतात आढळतात व वरील जातीखेरीज झा. फेनिस्ट्रेटा, झा. ॲमेथिस्टिना झा. झरिडिपेनिस या जाती सामान्यत: सर्वत्र आढळतात. त्या दिनचर व रात्रिंचर आहेत. भुंग्यांचा रंग चमकदार काळा असतो व लांबी सु. २० मिमी. असते. डोके, छाती व पोट यांवर अगदी बारीक बिंदुवत खळगे असतात आणि हे अवयव लवीने आच्छादिलेले असतात. मादीमध्ये छातीवरील लव पिवळी असते व इतर अवयवांवरील लव काळी असते. नरांचे शरीर पिवळ्या लवीने आच्छादिलेले असते.

आ. १. झायलोकोपा एस्ट्युआन्स (मादी).

आ. २. भुंग्याने भोके पाडलेल्या लाकडाचा उभा छेद : (१) प्रौढ भुंगा, (२) मध व पराग कण यांचे मिश्रण, (३) अंडे, (४) अळ्या.

भुंग्याचे पंख पारदर्शक असतात. नराच्या शृंगिका (सांधेयुक्त, बारीक, सडपातळ स्पर्शेंद्रिये) १३ खंडांच्या (भागांच्या) असतात, पायाच्या चवथ्या खंडावर टोकाला एक काटा असतो व जबड्याच्या टोकावर दोन दात असतात. मादीच्या शृंगिका १२ खंडांच्या असतात व पायाच्या चवथ्या खंडावर टोकाला दोन काटे असतात. मादीच्या जबड्याच्या टोकावर दोन दात आणि वरच्या कडेवरही दोन दात असतात. हे नर व मादी यांतील फरक आहेत.

भुंगा आपले घरटे वाळलेल्या लाकडाला गोल भोके पाडून व क्वचित पोकळ खोडात (उदा., कळक, बांबू) करतो. काही जाती एका विशिष्ट प्रकारचे लाकूड निवडतात. त्यांनी पाडलेली भोके ३० सेंमी. किंवा त्यापेक्षाही जास्त लांब असतात. भोकांमध्ये कप्पे असून त्या कप्प्यांत मध व पराग यांचा साठा केलेला असतो. प्रत्येक कप्प्यात एक अंडे असते. दोन अंड्यांमध्ये पडदा असून ती एकमेकांवर ठेवलेली असतात.

भुंगा आपल्या लांब जिभेने पराग कण गोळा करीत असल्याने फुलांच्या परपरागणास (एका फुलातील पराग दुसऱ्या फुलावर टाकण्यास) मदत होते. त्यामुळे त्यांना बरेच महत्त्व आहे. तो उडताना मागे-पुढे जात असतो व दिवसभर गुंजाराव करीत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर हिंडत असतो. पांढरे शुभ्र चांदणे असतानाही त्याचे हे कार्य चालू असते. एका मिनिटात तो ३०-४० फुलांना भेटी देतो.

प्रौढ भुंगे भोकांतील कोशांत (कप्प्यात) शीतनिष्क्रियेत (हिवाळ्यातील गुंगीच्या अवस्थेत) जातात. ते जसे विविध प्रकारांच्या फिलांना भेटी देऊन परपरागण साधतात, तसेच विविध प्रकारांच्या लाकडांना भोके पाडून बरेच नुकसान करतात. विशेषतः इमारतींच्या तुळया, खांब, वासे तसेच बांबू यांना भोके पाडलेली आढळतात. त्यांच्या दशांमुळे आग होते व गांधीही येतात. [⟶ कीटकदंश].

जमदाडे, ज. वि.