भिखारीदास : (सु. १७०३ – सु. १७५१). हिंदीतील रीतिकालीन एक श्रेष्ठ आचार्य-कवी. ‘दास’ हे त्याचे उपनाम व ‘भिकारीदास’ हे संपूर्ण नाव. त्याच्या चरित्राबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याच्या काव्यनिर्णय ह्या ग्रंथाच्या आधारे त्याची काही चरित्रपर माहिती उपलब्ध होते तथापि तीही विवाद्य आहे. तो जातीने कायस्थ होता व त्याचा जन्म प्रतापगढजवळील टोंग्या वा टेउंगा नावाच्या गावी झाला, असे काही अभ्यासक मानतात. वडिलांचे नाव कृपालदास. भिखारीदास हा प्रतापगढचा राजा पृथ्वीपतिसिंह याचा भाऊ हिंदूपतिसिंह याचा आश्रित होता. त्याच्या काव्यरचनेचा काल १७२९ ते १७५१ हा मानला जातो. त्याच्या मृत्यूचाही निश्चित तिथी, वर्ष व स्थान उपलब्ध नाही तथापि काही अभ्यासकांच्या मते तो भभुआ, जिल्हा आरा (बिहार) येथे निधन पावला. आरा येथे आजही त्याच्या नावाचे एक मंदिर असून तेथे दरवर्षी वैशाख शुद्ध त्रयोदशीस (त्याच्या जन्मतिथीस) एक यात्रा भरते व तीत त्याच्या काव्याचे वाचन केले जाते. त्याच्या निधनकालाविषयी सांगावयाचे म्हणजे केवळ अनुमानाने त्याचे निधन त्याचा शेवटचा ग्रंथ शृंगारनिर्णय रचल्यानंतर म्हणजे १७५० नंतर काही वर्षांनी झाले असावे, असे मानले जाते. कारण शृंगारनिर्णयनंतरची त्याची एकही रचना नाही. त्याच्या काही रचनांबाबतही अभ्यासकांत एकमत नाही तथापि रससारांश (१७३४), शब्द-नाम-प्रकाश (१७३८), छंदोर्णव पिंगल (१७४२), काव्यनिर्णय (१७४६), शृंगारनिर्णय (१७५०), विष्णुपुराण भाषाशतरंजशतिका ह्या त्याच्या रचनांबाबत अभ्यासकांचे एकमत आहे. काही अभ्यासक छंदप्रकाश, बागबहार, रागनिर्णय, ब्रज माहात्म्य चंद्रिका, पंथ पारख्या, वर्णनिर्णयरघुनाथ नाटक हे ग्रंथही त्याच्याच नावावर असल्याचे सांगतात तथापि या ग्रंथांचे भिखारीदासाचे कर्तृत्व निश्चित नाही.

रससारांशमध्ये त्याने रसाचे विस्तृत विवेचन केले असून काव्यनिर्णयात काव्याच्या विविधांगांचे सांगोपांग विवरण आहे. शृंगारनिर्णयात शृंगाररसाच्या विवेचनात नायक-नायिका भेदांचे विवेचन आहे. छंदोर्णव पिंगलमध्ये छंदशास्त्राचे उत्कृष्ट विवेचन आहे. अमर कोशाचा पद्यानुवाद त्याने ३ खंडांत शब्द-नाम-प्रकाशमध्ये केला आहे. विष्णुपुराण भाषामध्ये विष्णुपुराणातील कथांचा अनुवाद असून शतरंजशतिकात बुद्धीबळाच्या खेळाचे वर्णन आहे.

त्याच्या ठिकाणी आचार्यत्व व कवित्व या दोन्ही प्रकारची प्रतिभा होती. क्लिष्ट विषय सुबोध व सुगम रीतीने मांडण्यात तर आचार्य केशवदासाहूनही तो सरस आहे. आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी त्याला आचार्यापेक्षा कवी म्हणूनच गौरविले आहे.

संदर्भ : खन्ना, नारायणदास, आचार्य भिखारीदास, लखनौ, १९५५.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि