भाषांचे वर्गीकरण : भाषाशास्त्राचा प्रारंभ तुलनात्मक व ऐतिहासिक अभ्यासाने झाला. त्याचा रोख साम्य असणाऱ्या एकमूलदर्शक भाषांची तुलना करून मूळ भाषेचे स्वरूप नक्की करणे. किंवा निदान हे साम्य ज्या समाकरणांनी वा नियमांनी व्यक्त करता येईल ती समीकरणे वा नियम लक्षात आणून देणे, भाषा-भाषांतली संगती स्पष्ट करणे, ह्याकडे होता. त्यामुळे भाषिक कुटुंबे, त्यांच्या शाखा व उपशाखा नक्की करणे शक्य झाले.

पण विविध मार्गानी होणाऱ्या परिवर्तनाने ज्या नव्या भाषा अस्तित्वात आल्या, त्यांचे बाह्य अभिव्यक्तीचे प्रकार कित्येकदा इतके भिन्न होते, परस्परविरोधी होते, की मूळ जन्मस्थानापेक्षा, जन्मसिद्ध संबंधापेक्षा या भिन्नतेकडे लक्ष जाणे अपरिहार्य होते. त्यांमुळेच कौटुंबिक संबंधाप्रमाणेच अभिव्यक्तीप्रकाराबद्दलही कुतुहल जागृत झाले.

भाषाकुटुंबांचा विचार करताना भाषांचे जे वर्गीकरण होते, ते ऐतिहासिक किंवा जन्मनिष्ठ वर्गीकरण, तर अभिव्यक्तीच्या प्रकारानुसार होणारे वर्गीकरण हे प्रकारनिष्ठ वर्गीकरण होय. ऐतिहासिक वर्गीकरणात भाषांचा त्यांच्या प्रचलित रूपापासून मागे जात जात मिळणारा जुन्यात जुन्यापर्यंतचा सर्व पुरावा, ध्वनिसाम्य किंवा व्याकरणसाम्य यातून काढता येणारे निष्कर्ष असतात. तर प्रकारनिष्ठ वर्गीकरणात आज भाषेचे रूप काय आहे, तिची अभिव्यक्ती कशा प्रकारे होते, ही अभिव्यक्ती किती प्रकारे होते आणि आज अस्तित्वात असलेली एखादी विशिष्ट भाषा यातल्या कोणत्या प्रकारात मोडते, हे पाहिले जाते.

या वर्गीकरणात एकाच कुटुंबातल्या भाषा वेगवेगळ्या प्रकारांत जातील किंवा वेगवेगळ्या कुटुंबांतल्या भाषा एकाच प्रकारात येतील.

वर्गीकरणाचे प्रकार : भाषांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण प्रथम ⇨ आउगुस्ट व्हिल्‍हेल्म फोन श्लेगेल (१७६७-१८४५) याने मांडले. भाषेतील मूलभूत अर्थघटक किंवा धातू अभिव्यक्तीच्या संदर्भात ज्या प्रकारे वागतात त्यानुसार ते केलेले आहे.

या वर्गीकरणात तीन मुख्य प्रकार आहेतः (१) विश्लेषणात्मक, (२) विकारक्षम आणि (३) संश्लेषणात्मक.

विश्लेषमात्मक : विष्लेषमात्मक भाषांचे वैशिष्ट्य हे, की त्या एकार्थवाचक धातूंनी बनलेल्या असतात. या धातूंना अभिव्यक्तीच्या पातळीवरही कोणताच विकार होत नाही. ते जसेच्या तसे वापरले जातात. वाक्यातला त्यांचा क्रमच काय तो अर्थनिर्णायक असतो. शब्दांचे कार्यदृष्ट्या वर्गीकरण करता येत नाही. ज्याला आपण आपल्या व्याकरणात शब्दांचे वर्ग म्हणतो, तो या भाषांत नसतात. पूर्णपणे विकारशून्य परस्परभिन्न धातूंनी त्या बनलेल्या असतात. म्हणून त्यांना धातुभाषा किंवा विकारहीन भाषा असेही नाव देता येईल. या भाषांचे उत्तम उदाहरण ⇨चिनी भाषा हे आहे.

विकारक्षम : विकारक्षम भाषांत शब्द भिन्नभिन्न वर्गांत विभागलेले असतात. नाम, क्रियापद, विशेषण इ. त्यांच्या अर्थघटकांना त्यांच्या कार्यानुरूप विकार होतात. त्यामुळे अर्थघटकांचे मूळ रूपही कित्येकदा विकारक्षम बनते. मूळ रूपाला प्रत्यय किंवा उपसर्ग लागतात आणि कधीकधी ते धातूंशी एकजीव होतात. भाषातज्ञ त्याचा खुलासाही देतील, पण बाह्य रूपांचे हे विविध आविष्कार सामान्य माणसाला नियमाच्या पलीकडचे वाटतात. ⇨ संस्कृत भाषा, ⇨ लॅटिन भाषा, ⇨ ग्रीक भाषा इ. भाषा या प्रकारात येतात.

संश्लेषणात्मक : संश्लेषणात्मक भाषांत अर्थघटक, त्यांना प्रत्ययरूपाने जोडलेले कार्यघटक आणि इतर शब्द यांची, अजिबात गुंतागुंत नसलेली, प्रत्येक घटक मूळ स्वरूपात ठराविक स्थानी दिसेल अशी साखळी बनलेली असते. ⇨ तुर्की भाषा हे याचे उदाहरण आहे.

या वर्गीकरणात एका टोकाला पूर्णपणे विश्लेषण असणारी चिनी, तर दुसऱ्या टोकाला पूर्णपणे संश्लेषण असणारी तुर्की आणि त्या दोघींमधले जणू संक्रमणच अशी अंशतः विश्लेषण व अंशतः संश्लेषण यांचा उपयोग करणारी संस्कृत, असे चित्रे दिसते. म्हणजे खरे तर अभिव्यक्तीच्या प्रकारचे हे विशिष्ट प्रमाणदर्शक टप्पे आहेत.


अशा प्रकारचे वर्गीकरण हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे कोणाचेच फारसे समाधान होणार नाही. शिवाय मुळात एका प्रकारात समाविष्ट होऊ शकेल अशी भाषा कालांतराने इतकी बदलते, की तिची रचना पुष्कळच वेगळ्या प्रकारची वाटू लागते. अत्यंत विकारक्षम इंडो-यूरोपियनची परिणती ⇨ इंग्रजी भाषेसारख्या काही अंशी विकारक्षम, काही अंशी विकारशून्य आणि काही अंशी क्रमप्रधान अशा भाषेत होऊ शकते आणि मग ही भाषा पूर्णपणे विकारक्षम या प्रकारात दाखवता येत नाही. ती विश्लेषणात्मक व विकारक्षम या प्रकारांच्या दरम्यान येईल.

म्हणजे असे म्हणता येईल, की विकार व विश्लेषण ही दोन मापे असून भाषेत त्यांचे मिश्रण एखाद्या भाषेत किती प्रमाणात आहे, यावर तिचे स्थान अवलंबून राहील.

सर्वांगीण वर्गीकरणात भाषेच्या ध्वनिघटकांचा, व्याकरणपद्धतीचा आणि अर्थघटकांचा विचार करावा लागेल. तरच तिचे रूप कसे बनले आहे, हे ठरवता येईल.

व्याकरण-अर्थघटक या दृष्टीने फ्रांट्‍स निकोलस फिंक (१८६७-१९१०) यांनी अतिशय मूलगामी प्रयत्‍न केला आहे. माणसाने केलेल्या भाषेच्या उपयोगात त्यांच्या मते दोन टप्पे संभवतात : (१) प्रथम व्यक्तीच्या मनोव्यापारात होणारे एखाद्या वास्तव प्रसंगाचे त्याच्या घटकांत विश्लेषण (२) नंतर हा प्रसंग भाषिक संकेतांच्या आधारे श्रवणगोचर होईल असे त्याचे पुनर्घटन. चिनी भाषा वापरणारी व्यक्ती विश्लेषणातील प्रत्येक घटकाला एक संकेत देऊन हे संकेत जवळजवळ मांडून बोलेल. तुर्कीसारखी भाषा सर्व संकेत एकत्र करून त्याने बनलेला एकच शब्द विधानरूपाने या ठिकाणी वापरेल. तर ⇨ मराठी भाषेसारखी भाषा घटकांच्या संख्येइतकेच किंवा अधिक शब्द वापरेल.

भाषा ज्या प्रकारे एखाद्या प्रसंगाचे आर्थिक पृथक्करण करून तो शब्दात व्यक्त करते अर्थघटकांचा जो क्रम, जी बाह्य रूपे उपयोगात आणते, त्यानुसार फिंक यांनी भाषांचे आठ प्रकार ठरवले. अर्थात प्रत्यक्षात अशा आठ भाषा त्यांच्या नजरेसमोर होत्या आणि ही व्यवस्था पृथक्करणनिष्ठ म्हणजे मनोव्यापारदर्शक होती. या भाषा क्रमाने अशा: (१) एस्किमो-ज्यात एका शब्दात अनेक अर्थघटक व्यक्त होतात. [⟶ एस्किमो-ॲल्यूट भाषासमूह] (२) तुर्की (३) ⇨ जॉर्जियन भाषा (४) ⇨ अरबी भाषा (५) चिनी (ज्यात एक शब्द एकाच अर्थघटकासाठी असतो) (६) ग्रीक (७) सॅमोअन (८) सुबिया (ज्यात एक शब्द एका अर्थघटकाहून कमी आशय व्यक्त करतो.)

बाह्य भाषिक रूपात शब्द एकत्र कसे आणले जातात, विधान कसे होते यावर भर असतो. सर्व घटक पूर्णपणे विकारशून्य व वेगळे, घटक किंवा घटकसमूह विकारयुक्त व परस्परावलंबी आणि घटक परस्परसंलग्‍न परंतु रूपदृष्ट्या विकाररहित व त्यामुळे स्पष्टपणे वेगळे करता येतील असे, ही स्थूलमानाने या ठिकाणी व्यवस्था असते.

नंतरच्या काळात रूपार्थनिष्ठ वर्गीकरण बाजूला ठेवून केवळ बाह्यरूपावर आधारलेल्या वर्गीकरणावर ⇨ एडवर्ड सपीर (१८८४ – १९३९) यांनी लक्ष केंद्रित केले.

भाषिक रचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाचे दोन मार्ग स्वीकारले: एक व्याकरणानुसारी आणि दुसरा ध्वनिव्यवस्थानुसारी. एखाद्या भाषेचे व्याकरण कशा स्वरूपाचे आहे रूपविकार, शब्दवर्ग, शब्दक्रम, वाक्यनिर्मिती यांच्या बाबतीत तिच्यात काय केले जाते, यावर तिचे वर्गीकरण अवलंबून राहील. एखाद्या भाषेत तीन, एखादीत दोन लिंगे, तर आणखी एखादीत या प्रकारच्या लिंग या कल्पनेचाच अभाव असेल. एखाद्या भाषेत क्रियापदाचे सर्व भेद प्रत्ययाने व्यक्त होतील, तर दुसऱ्या एखाद्या भाषेत काही भेदांसाठी सहायक शब्द घ्यावे लागतील इ. भाषिक रचनेची वैशिष्ट्ये निश्चित करून त्यानुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्‍न जे. ग्रीनबर्ग यांनी केला.

भाषेच्या ध्वनिसामग्रीचा वापर हाही तिचे वैशिष्ट्य ठरण्याचे एक गमक आहे. प्रत्येक भाषेतील स्वरांची संख्या, त्यांची मांडणी, त्यांचा वापर, यात एक शिस्त किंवा व्यवस्था असते. उदा., स्वरांचे उच्च ते निम्‍न आणि अग्र ते पश्च या विभागणीनुसार कोष्टक बनवले, तर प्रत्येक भाषेच्या संदर्भात त्यांचे जे चित्र तयार होईल ते या दृष्टीने भाषांचे एक विशिष्ट वर्गीकरण आपल्याला देईल. तसेच या स्वरांकडून होणारा ऱ्हस्व-दीर्घत्व, अनुनासिकत्व, आघात, घोष इ. बाह्यगुणांचा वापर यांनी हे चित्र स्पष्ट होईल. ⇨गुजराती भाषेसारख्या भाषेची स्वरव्यवस्था मराठीला अतिशय जवळची वाटेल, तर इंग्रजी मूलभूतपणे स्वरदृष्ट्या फारशी भिन्न नसताही प्रत्यक्ष वापराच्या दृष्टीने अगदी वेगळी वाटेल. याउलट मराठीची व्यंजनव्यवस्था दंत्य अर्धस्फोटकांचा वर्ग सोडल्यास गुजरातीशी जवळजवळ एकरूप आहे, तर इंग्रजीपेक्षा बरीच वेगळी आहे.

स्वरांची आणि व्यंजनांची संख्या यांतही फार मोठे अंतर भाषाभाषांत आढळते. विद्युत् यंत्रांच्या द्वारे ध्वनिदर्शन होऊ लागल्यापासून ते घन किंवा विरल या तत्त्वानुसारही एकत्र किंवा वेगळे करण्यात येऊ लागले आहेत. अशा तऱ्हेचे वर्गीकरण रोमान याकॉपसन यांनी केलेले आहे.


ध्वनिसामग्रीच्या दृष्टीने केलेल्या वर्गीकरणात दोन भाषा एखाद्या बाबतीत एकत्र येतील, तर दुसऱ्या एखाद्या बाबतीत दूर जातील. मात्र यासाठी प्रत्येक भाषेचे सूक्ष्म व बिनचूक वर्णन मिळाले, तरच हे शक्य होईल. या अभ्यासामुळे कोणत्याही दोन भाषा परस्परांपासून पूर्णपणे भिन्न नाहीत हे तर कळेलच, पण त्याच्यांत किती प्रमाणात कोणत्या प्रकारचे साम्य आहे, हेही कळेल. त्याचप्रमाणे भाषिक अभिव्यक्ती ज्या विविध प्रक्रियांनी होऊ शकते, त्यांचा शोध लागून मग प्रत्येक भाषेचे स्थान सर्व भाषांच्या समूहात निश्चित करायला मदत होईल.

तुलनात्मक पद्धतीने परभाषेचे अध्यापन केले, तर अशा वर्गीकरणाला लागणारी सामग्री अधिक सुलभतेने गोळा होईल. पुष्कळदा नकळत हे होतच असते, पण तुलनात्मक ऐतिहासिक व्याकरणाप्रमाणे तुलनात्मक वर्णनात्मक व्याकरणाही होऊ शकते, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि भाषाध्यापनात ते उपयुक्त ठरू शकते याची जाणीव झाली, तर हा अभ्यास अधिक तप्तरतेने होऊ शकेल.

संदर्भ : 1. Carroll. John B. The Study of Language, Cambridge, Mass., 1961.

            2. Jakobson, Roman: Halle. Morris, Fundamentals of Language, The Hague, 1956.

            3. Lehmann, Winfred P. Historical Linguistles: An Introduction, New York. 1963.

            4. Pedersen Holger, The Discovery of Language, Bloomington, 1962.

            5. Sapir, Edward, Language, New York, 1921.

कालेलकर, ना. गो.