भाषांगराग : भारतीय संगीतामध्ये रागवर्गीकरणाच्या संदर्भात ‘भाषांगराग‘ ही संज्ञा आढळते. रागाचे वर्गीकरण प्रथम मतंगाच्या बृहद्देशी या संगितविषयक ग्रंथात आढळते. त्यात रागांचे-पुढे मार्गी राग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रागांचे-पाच प्रकार दिले आहेत. त्यातून पुढे ग्रामराग, राग, उपराग, भाषा, विभाषा, आंतरभाषा असे सहा प्रकारचे मार्गी रागांचे वर्गीकरण मानण्यात येऊ लागले. संगीतरत्नाकर या शार्ङ्गदेवाच्या ग्रंथात मार्गी रागांचे हे वर्गीकरण व देशी रागांचे वर्गीकरण-रागांग, भाषांग, क्रियांग व उपांग या स्वरूपात आढळते व त्यात भाषांगराग म्हणजे मार्गी संगीतातील भाषारागांची छाया ज्यात आहे असे राग, अशी कल्पना दिसून येते. पुढे या कल्पनेत थोडा बदल होऊन प्रत्यक्ष गायनक्रियेच्या दृष्टीने भाषांगराग म्हणजे ज्या रागांत प्रादेशिक लोकधुनीची छाया आहे असे राग, अशी कल्पना रूढ झाली. प्रादेशिक भाषा व साहित्य ह्यांना याच सुमारास भरीव रूप येत होते, ही गोष्ट या संदर्भात महत्त्वाची ठरते. पं. भातखंडे यांनी भाषांगरागांचे स्पष्टीकरण पुढील प्रकारे केले आहेः ‘ज्या रागांत शास्त्रीय नियमांना विशेष महत्त्व न देता भिन्न प्रदेशातील भाषा व गायनशैली यांची छाया आढळते, अशा रागांना भाषागराग म्हणतात.’ सध्या भाषांगराग ही संज्ञा लुप्त झाली आहे. परंतु संकल्पनेच्या दृष्टीने पाहता लोकधुनीमधून निर्माण झालेले आणि लोकधून-गायनशैलीची छाया असणारे रग ते भाषांगराग, असे म्हणता येईल. उदा., सावनी, बिहारी, मालवती, भटियार वगैरे प्रकारचे राग भाषांगराग म्हणून मानता येतील. भाषांगराग ही संज्ञा कर्नाटक संगीतातही निर्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष रागवर्गीकरणाच्या संदर्भात ही संकल्पना वापरलेली आढळत नाही.
आठवले, वि. रा.
“