बॅथिस्कॅफ : पाण्यात खूप खोलपर्यंत जाऊ शकणारी एक प्रकारची ⇨ पाणबुडी. तथापि इतर पाणबुड्यांप्रमाणे ही पाण्यातून आडव्या दिशेत दूरपर्यंत संचार करू शकत नाही. जहाजातून इष्ट त्या ठिकाणी बॅथिस्कॅफ नेतात व मग तेथे पाण्यात सोडतात. ऑग्यूस्त पीकार या स्विस अभियंत्यांनी १९४८ साली पहिली बॅथिस्कॅफ (एफएनआरएस-२) तयार केली. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या व पुढे १९५८ मध्ये अमेरिकेच्या नाविक दलाने घेतलेल्या ‘ट्रिएस्ट’ या नावाच्या बॅथिस्कॅफच्या साहाय्याने त्यांचे पुत्र झाक पीकार व अमेरिकेच्या नाविक दलातील डॉन वॉल्श यांनी २३ जानेवारी १९६० रोजी पॅसिफिक महासागरातील ग्वॉम बेटाजवळील मॅरिॲना ट्रेंच येथे १०,९१६ मी. खोली गाठली होती. समुद्राच्या तळाशी असलेल्या खनिज संपत्तीचे व जीवसृष्टीचे संशोधन करण्यासाठी बॅथिस्कॅफ अतिशय उपयुक्त असल्याने तिला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.
पहा : सागरी निमज्जन साधने.
इनामदार, म. न. सप्रे, गो. वि.