बहि:शाल शिक्षण : (एक्स्ट्राम्यूरल एज्युकेशन) शैक्षणिक संस्थांत  रीतसर  प्रवेश  घेऊ  न  शकणाऱ्या  विद्यार्थ्यांना, विशेषतः प्रौढ नागरिकांना, उपलब्ध असणारा आधुनिक शिक्षणाचा प्रकार. मानव्यविद्या, निसर्गविज्ञाने आणि तंत्रविद्या, समाजशास्त्रे, कायदा, वाणिज्य, वैद्यक  अशा  बहुतेक  सर्व  विषयांचा  अंतर्भाव  बहिःशाल शिक्षणात  होतो.  विद्यापीठाजवळ  अभ्यासक्रम, अध्यापक  व ग्रंथालय  या  गोष्टी  तयार  असतात.  त्यांचा  लाभ  प्रौढ  नागरिकांना द्यावा, या उद्देशाने प्रथम हा उपक्रम सुरू झाला. पुढे केवळ बहिःशाल शिक्षणासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री व अभ्यासक्रम यांच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात आल्या. यासाठी विद्यापीठांच्या अध्यापक वर्गाबरोबर बाहेरील शिक्षितांचे अध्यापकवर्ग (अंशकालीन) उपयोगात आणला जातो. प्रौढवर्गाकरिता स्वतंत्र ग्रंथसंग्रहाची सामग्री पुरवली जाते आणि त्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात. या कामी सरकारी संस्था, शिक्षणखाते, खाजगी संघटना, कामगारसंघ व स्वयंसेवी नागरिक यांचा उपयोग विद्यापीठे करून घेतात.

बहिःशाल विद्यार्थीवर्गाचा दर्जा त्या त्या देशातील पूर्वशिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. अमेरिकेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा व्यापक प्रसार झालेला आहे. त्यामुळे तेथील विद्यापीठे माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता उच्च अभ्यासक्रम आखतात. इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झालेला असला, तरी तेथे माध्यमिक शिक्षण न घेतलेले अनेक नागरिक आहेत. म्हणून तेथे माध्यमिक आणि उच्च पातळीवरील अभ्यासक्रम शिकविले जातात. १९७१ च्या जनगणनेनुसार भारतात अद्याप प्राथमिक शिक्षण न घेतलेले ७०.६५% नागरिक आहेत. माध्यमिक शिक्षणही बाल्यावस्थेत आहे. त्यांमुळे बहिःशाल शिक्षणाचे विषय व त्याची पातळी सामान्यपणे माध्यमिक दर्जावर ठेवावी लागते.

 

इंग्लंडमध्ये बहिःशाल शिक्षणाचा प्रारंभ केंब्रिज विद्यापीठाने १८७१ मध्ये केला व हळूहळू इतर विद्यापीठांनी त्याचे अनुकरण केले. १९०३ मध्ये कामगार शिक्षण मंडळ (वर्कर्स एज्युकेशन असोसिएशन) स्थापन झाले. या मंडळाने आपल्या सोयीकरता विद्यापीठाशी सहकार्य करून प्रौढांना बहिःशाल शिक्षण देण्याच्या योजना तयार केल्या. पुढे सरकारी संस्था, शिक्षणखाते आणि प्रौढशिक्षण संस्था यांनीही विद्यापीठांशी काही बाबतींत सहकार्य केले. ग्रेट ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड, केंब्रिज यांसारखी जुनी आणि मँचेस्टर, बर्मिंगहॅमसारखी नवी अशी एकूण २२ विद्यापीठे बहिःशाल शिक्षणाचे कार्य करीत आहेत.

इंग्लंडमधील बहिःशाल शिक्षणाची कल्पना १८९० च्या सुमारास अमेरिकन विद्यापीठांनी उचलली. पुढील पंधरा-वीस वर्षांतच त्यांनी या कल्पनेला, आपल्या सामाजाला व परिस्थितीला अनुरूप असे स्वरूप दिले. तात्त्विक आणि व्यावहारिक, उदार आणि उपयुक्त, उच्च आणि कनिष्ठ दर्जाचे असे सर्व प्रकारचे प्रौढशिक्षण अमेरिकन विद्यापीठे देतात. संघटना, अभ्यासक्रम, साधने आणि विस्तार या सर्वच दृष्टींनी अमेरिकेत बहिःशाल शिक्षणाचा व्याप वाढलेला आहे. विशेषतः शेतकरी, गृहिणी आणि तरूण यांच्याकरिता चालू असलेल्या बहिःशाल शिक्षणाचा व्याप प्रचंड आहे. मिशिगन, विस्कान्सिन, शिकागो, न्यूयॉर्क इ. विद्यापीठे या क्षेत्रात अनुकरणीय कार्य करीत आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान इ. देशांतही बहिःशाल शिक्षणाचा प्रसार होत आहे.

भारतात पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहिःशाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. दिल्ली, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, म्हैसूर इ. विद्यापीठांनी बहिःशाल शिक्षणाचा विभाग सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर मराठवाड्या व शिवाजी या विद्यापीठांनीही बहिःशाल शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. मुबंईस श्रमिक विद्यापीठ ही संस्था बहिःशाल शिक्षणाचे कार्य करीत आहे.

खैर, ग. श्री. गोगटे, श्री. व.