बसोली चित्रशैली : एक भारतीय लघुचित्रण शैली. सतराव्या अठराव्या शतकांत जम्मूमधील शिवालिक टेकड्यांच्या परिसरातील बसोली खोऱ्यात या चित्रशैलीचा उदय झाल्यामुळे तिचे नाव बसोली असे पडले. मानकोट, नुरपूर, कुलू, मंडी, सुकेत, चंबा, गुलेर, कांग्रा या खोर्यांतत तिचा मागाहून प्रसार झाला.

सतराव्या शतकात औरंगजेबाने सर्व कलांवर बंदी घातली, त्यामुळे काही कलावंत बसोलीच्या राजा संग्रामपालकडे (१६३५-७३) आकृष्ट झाले व दिल्लीहून पंजाब, जम्मूच्या डोंगराळ खोऱ्यात रवाना झाले. त्यांची चित्रे बसोली चित्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. काही कलेतिहासकारांच्या मते बसोली कलमाची चित्रे औरंगजेबपूर्व काळातही निर्माण झाली असावीत. पुढे राजा कृपालपालने (१६५०-९३) बसोली चित्रकारांना मोठ्या प्रमाणावर आश्रय दिला. तो स्वतः विद्वान आणि कलाप्रेमी होता. या चित्रशैलीची भरभराट राजा अमृतपाल (१७४९-७६) याच्या कारकीर्दीत झाली.

या चित्रशैलीतील रंगसंगती – त्यातील गर्द तांबडे, पिवळे व हिरवे रंग – तसेच त्यातील अजंठा चित्रशैलीशी साम्य आणि तिचा तिबेटमध्ये सजावटीसाठी केलेला भरपूर वापर यामुळे ती ‘तिबेटी चित्रशैली’ म्हणून ओळखली जाते. वास्तविक पाहता तिबेटी अथवा नेपाळी चित्रशैलीशी तिचा काहीही संबंध नाही.

बसोली चित्रशैली लोककला व मोगल चित्रशैली यांच्या संगमातून  जन्माला  आली.  या  चित्रांतील  स्त्रीपुरूषांचे  पारदर्शक पेहराव  मोगल  पद्धतीचे  आढळतात तर  त्यांचे  चेहरे  खोऱ्यातील लोककलेप्रमाणे  चितारलेले  आढळतात.  चित्रांतील  रेखाटन व रंगसंगती यांवर लोककलेच्या उत्स्फूर्तपणाचा प्रभाव अधिक जाणवतो तर चित्रित व्यक्तींचे पोषाख व बाह्य सजावट यांमध्ये मोगल शैलीच्या प्रभावातून आलेला सुसंस्कृतपणा पाहावयास मिळतो. चित्रांच्या कडा गडद लाल व व्कचित पिवळ्या रंगांत रंगवलेल्या असतात. चित्रांवर टाकरी लिपीतील निर्देशही आढळतात. उदा., कृपालपालच्या व्यक्तिचित्रांवर त्याचे नाव लिहिलेले आढळून येते. बसोलो व कांग्रा या पहाडी लघुचित्रणशैलीच्या दोन प्रमुख शाखा होत. कांग्रा चित्रशैलीचे ठळक वैशिष्टय जसे लयबद्ध रेषा, तसे बसोली  चित्रशैलीचे प्रमुख वैशिष्टय त्यांतील रसरशीत रंग हे होय. त्यांतील तांबडे, पिवळे, हिरवे, निळे रंग आकर्षक व चमकदार दिसतात. अलंकरणामध्ये सोनेरी व चंदेरी रंगांचा वापर सढळपणे केलेला दिसतो. रंगांचा प्रतीकात्मक वापर हेही एक लक्षणीय वैशिष्टय होय. उदा., पिवळा रंग वसंत ऋतूचे तद्वतच प्रेमिकांच्या उफाळलेल्या भावनांचे प्रतीक निळा रंग कृष्णाचे तसेच समृद्धीसूचक कृष्णमेघांचेही प्रतीक.

राजा धीरजपालचे व्यक्तिचित्र, सु. १७२०-२५.


बसोली चित्रशैलीमध्ये भित्तिचित्रांची भव्यता आढळते तर कांग्रा चित्रशैलीत लघुचित्रांचा नाजुकपणा पाहावयास मिळतो. कांग्रा शैलीची तरलता, सूक्ष्मता व परिष्कृतता बसोली शैलीमध्ये अभावानेच आढळत असली, तरी त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जोम, ठाशीवपणा व साधेपणा आढळतो. बसोली चित्रांमध्ये वरच्या बाजूस किंचित मागे वळलेले कपाळ, कमळाच्या पाकळीच्या आकाराचे, सलग रेषांनी रेखाटलेले विशाल नेत्र ही व्यक्तिवैशिष्टये, तसेच उंच क्षितिजरेषा, ढगांचे वैशिष्टयपूर्ण आकार ही वैशिष्टये ठळकपणे दिसून येतात. त्यात कृष्णलीला व राधाकृष्णाच्या प्रणयक्रीडा यांना खास स्थान आहे. भानुदत्ताच्या रसमंजिरीवरील (तेरावे-चौदावे शतक) व गीतगोविंदावरील काव्यात्म चित्रे प्रसन्न व साध्या शैलीमुळे फार वेधक वाटतात. त्यांच्या पाठीमागे संस्कृत श्र्लोक कोरले आहेत. ‘माणकू’ चित्रकाराविषयीचा मजकूर असलेली गीतगोविंदावरील चित्रमालिका फाळणीच्या वेळी अर्धी लाहोर संग्रहालयात आणि अर्धी पतियाळा व दिल्ली येथील भारत कला भवना त असलेली नायक-नायिका व रागमाला या विषयांवरील चित्रे दिल्ली येथील राष्ट्रीय कलासंग्रहालयातील भागवतपुराण व गीतगोविंद यांवर आधारित चित्रे, तसेच जम्मूमधील ‘डोग्रा आर्ट गॅलरी’ मधील रसमंजिरीवरील चित्रे हे महत्त्वाचे बसोली चित्रसंग्रह होत. उत्तरकालीन चित्रकारांनी ‘बारामास’ हा विषय अतिशय कौशल्याने व प्रगल्भ शैलीने हाताळला. रसमंजिरी, गीतगोविंद, भागवतपुराण वा बारामास यांपैकी कोणताही विषय असो, त्याच्या मूळ प्रेरणा कृष्ण व त्याच्या प्रणयलीला यांतच आढळतात. 

बसोली चित्रशैलीतील काही वैशिष्टयपूर्ण चित्रांचा स्थूल परिच-य पुढे करून दिला आहे. चित्रकारांनी आपल्या आश्रयदात्या राजांची जी व्यक्तिचित्रे काढली, त्यांतील राजा कृपालपाल (१६९०—९३ पंजाब म्यूझियम, पतियाळा), धीरजपाल (सु. १७२०—२५ पंजाब म्यूझियम, पतियाळा) व मोदिनीपाल (सु. १७२५—३६ डोग्रा आर्ट गॅलरी, जम्मू) यांची स्वतंत्र व्यक्तिचित्रे बसोली शैलीविशेषांचे प्रातिनिधिक दर्शन घडवितात. यांखेरीज काही उल्लेखनीय चित्रे पुढीलप्रमाणे : पापाचा जन्म (सु. १७३०—४० प्रॉव्हिन्शियल म्यूझियम, लखनौ) : भागवतपुराणावर आधारित.  या  चित्रात  तम, मोह, महामोह, राग, अधःपात  यांचे चित्रण केले  आहे. यात सर्व भूतपिशाचांचा आपापसांतील कलह दाशविला असून त्यांचे डोळे रक्तरंजित दाखविले आहेत. नखे व दात तीक्ष्ण  दाखवून  एकमेकांतील  वैर  प्रभावीपणे  दाखविण्याचा  प्रयत्न केलेला  आढळतो.  हे   चित्र  गर्द  काळा, दगडी  व  तपकिरी  तसेच व्कचित  आढळणाऱ्या  पांढऱ्या  छटा  या  मोजक्या  रंगांत  रंगविल्याने परिणामकारक  झाले  आहे.  संकेतस्थळाच्या  मार्गावर  (सु. १६९०-९५ डोग्रा आर्ट गॅलरी, जम्मू) : रसमंजिरी या चित्रमालिकेतील हे एक सुरेख चित्र आहे. यातील नायिका उत्सुकतेने तिच्या प्रियकराकडे म्हणजे कृष्णाकडे जात आहे. ‘परकिया अभिसारिका’ नायिकेचा उत्कृष्ट आविष्कार तिच्यात पाहावयास मिळतो. लाल फुलांनी बहरलेली झाडे, काळोख्या रात्रीचा प्रहर, धुवाधार कोसळणारा पाऊस, विजांचा लखलखाट, ढगाळ आकाश यांचा कुलशतेने वापर करून चित्राला गहिरेपणा आणला आहे. राधा कृष्णाला लस्सी देताना – (सु. १६९० भारत कला भवन, बनारस) : बिहारीच्या सत्-सैयामधील एका श्र्लोकावर हे चित्र आधारित आहे. या चित्रात राधा कृष्णाला लस्सी देण्यासाठी शिंक्यावरील मडके काढण्यास हात उंचावून उभी आहे. श्र्लोकाचा आशय असा की, तिला त्या अवस्थेत पाहताच कृष्ण सांगतो, ‘हे सुंदरी, तू ते मडके शिंक्यात परत  ठेवू  नकोस  वा  खालीही  काढू  नकोस  तू  आहेस तशीच उभी रहा. तू फार सुंदर दिसतेस’. या सुंदर आशयाबरोबरच, त्यातील राधा व कृष्ण यांच्या आविर्भावांचे सौंदर्य, रेखाटनातील सहजपणा, उत्स्फूर्तता व सुखद रंगसंगती या वैशिष्टयांतून बसोली शैलीचे गुणधर्म ठळकपणे प्रतीत होतात.

पहा : कांग्रा चित्रशैली पहाडी चित्रशैली लघुचित्रण.

संदर्भ : 1. Randhawa, M. S. Basohil Painting, Delhi, 1959.

          2. Sinha, R. P. N. Geeta Govind in Basohil School of Indian Painting, Calcutta, 1959.                    

धुरंधर, नयनतारा


बसोली : ‘संकेतस्थळाच्या मार्गावर’ : ‘रसमंजिरी’ चित्रमालिकेतील एक चित्र, सु. १६९०-९५. बसोली : ‘वसंतऋतूतील कृष्णाच्या क्रीडा’ : ‘गीतगोविंदा’ वर आधारित, १७३०.
बसोली : ‘पापाचा जन्म’ : ‘भागवतपुराणा’ वर आधारित, सु. १७३०-४०. बसोली : ‘प्रेमिकांचा महिना सावन’ : बारामास चित्रमालिकेतील एक चित्र, १८व्या शतकाचा पूर्वार्ध.