बसु, राजशेखर : (१६ मार्च १८८०-२७ एप्रिल १९६०).बगाली कथाकार व भाषाशास्त्रज्ञ. बरद्वान जिल्ह्यातील ब्राह्ममपाडा गावी जन्म व दरभंगा येथील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून ते बी. ए. व तेथूनच रसायनशास्त्र घोऊ ते एम्. ए. झाले. नंतर ते बी. एल्. झाले. पण वकिली न करता ‘बेंगॉल केमिकल अँड फॉर्मास्युटिकल वर्क्स’ या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी आयुष्यभर नोकरी केली, राजशेखर यांच्या कर्तव्यदक्ष व संशोधक वृत्तीमुळे या संस्थेचा उत्कर्ष झाला. कलकत्ता येथे ते निधन पावले.

‘परशुराम’ या टोपणनावाने त्यांनी आपल्या कथालेखनास सुरूवात केली. ‘बिरंची बाबा’ ही त्यांची कथा १९२२ मध्ये भारतवर्ष या पत्रकात प्रसिद्ध झाली व वाचकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. गड्ढलिका (१९२४) हा त्यांचा प्रथम प्रकाशित कथासंग्रह होय. यांशिवाय टोपणनावानेच प्रसिद्ध झालेले त्यांचे कज्जली (१९२७), हनुमानेर स्वप्न (१९३७), कृष्णकलि इत्यादी गल्प (१९५३), आनंदीबाई इत्यादी गल्प (१९५८) इत्यादी कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. अनुवादक म्हणूनही बंगाली साहित्यात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांची वाल्मीकि रामायण (सारानुवाद – १९४६), कृष्णद्वैवायन व्यासकृत महाभारत (सारानुवाद – १९४९), कालिदासेर मेघदूत (संपूर्ण अनुवाद व टीका – १९४३) इ. अनुवादित पुस्तके प्रकाशित आहेत.

भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या प्रचंड संशोधनाची साक्ष चलन्तिका (बंगाली शब्दकोश – १९३०), लवुगुरू (निबंधसंग्रह – १९३९) इ. ग्रंथांवरून पटते. शिवाय ते १९४१ मध्ये पश्र्चिम बंगाल सरकारच्या ‘परिभाषा संसदे’ चे अध्यक्ष असताना त्यांनी केलेले परिभाषाविषयक संशोधन बंगाली भाषेच्या छापखान्यांच्या इतिहासाबाबतचे संशोधन बंगीय साहित्य परिषदेच्या भारतकोश ह्या बंगाली विश्वकोश योजनेला दिलेले सहकार्य व उत्तेजन इ. कार्यामुळे ते विसाव्या शतकातील बंगाली साहित्यातील एक प्रमुख साहित्यिक म्हणून गणले जातात.

सरळ स्पष्ट प्रतिपादन व मार्मिक ताशेरे मारण्याचे कौशल्य हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय होय. कलकत्ता विद्यापीठाने १९४० साली त्यांना ‘जगत्तारिणी सुवर्णपदक’ देऊन व १९४५ साली ‘सरोजिनी पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. १९५५ मध्ये त्यांना पश्र्चिम बंगाल सरकारतर्फे कृष्णकलि इत्यादी गल्प या संग्रहासाठी ‘रवींद्र पुरस्कार’ १९५६ मध्ये भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ १९५८ मध्ये आनंदीबाई इत्यादी गल्प या कथासंग्रहाला साहित्य अकादोमीचा पुरस्कार लाभला. १९५७ साली त्यांना कलकत्ता व जादवपूर विद्यापीठांतर्फे ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही सन्मान्य पदवी मिळाली.

आलासे, वीणा