बसु, बुद्धदेव : (३० नोव्हेंबर १९०८- १८ मार्च १९७४). रवींद्रोत्तर काळातील एक प्रधान आधुनिक बंगाली कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चिंतक व समीक्षक. कोमिल्ला गावी जन्म व नोआलीखाली येथे प्राथमिक शिक्षण. डाक्का येथून शालान्त परीक्षा ते उत्तीर्ण झाले व डाक्का विद्यापीठातूनच इंग्रजी विषयात एम्. ए. झाले. १९३३ मध्ये ते कलकत्त्याच्या रिपन कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून लागले परंतु १९४५ मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली व संपूर्णपणे लेखनव्यवसायास वाहून घेतले. १९५६ मध्ये जादवपूर विद्यापीठात तुल-नात्मक वाङ्-मय हा विभाग स्थापन केला गेला. तेथे विभागप्रमुख या नात्याने त्यांनी पुन्हा अध्यापन- व्यवसाय स्वीकारला. १९६३ मध्ये या विभागातून ते सेवा- निवृत्त झाले. अमेरिकेत ते एकूण तीन वेळा व्याख्यानमाला गुंफ- ण्यास गेले (१९५३, ६१ व ६३). मुंबई विद्यापीठातही १९६२ साली त्यांनी एक व्याख्यानमाला गुंफली. डाक्का येथे असताना अजित दत्त यांच्या सहकार्याने प्रगति (स्था. १९२७) हे पत्रक संपादित केले व कलकत्त्याला आल्यानंतर कविता (स्था.१९३५) हे संपूर्णपणे आधुनिक कवितेला प्रोत्साहन देणारे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.
बुद्धदेव हे चौफेर व्यक्तिमत्त्वाचे लेखक व विश्र्वसाहित्याचे सखोल वाचक होते. त्यांनी केलेले विविध अनुवाद पाहिले, तरी ही गोष्ट चटकन जाणवते. त्यांनी हेल्डरलीन, वोदलेअर, रिल्के, लूईजी पीरांदेल्लो, बरीस पास्तेरनाक, एझरा पाउंड, ई. ई. कमिंग्ज, वॉलिस स्टीव्हन्झ इ. पाश्र्चात्त्य लेखकांच्या निवडक कलाकृतींचे उत्तम बंगाली अनुवाद केलेले आहेत. त्यांच्या गद्यलेखनावर जेम्स जॉइस, व्हर्जिनिया वुल्फ, डी. एच्. लॉरेन्स, टोमास मान इ. समर्थ पाश्चात्त्य लेखकांचे संस्कार आहेत पण बुद्धदेवांनी या लेखकांचे अंधानुकरण केलेले नाही सर्व वाचनसंस्कार आत्मसात करून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र लेखनपिंड घडविला आहे. त्यांच्या समीक्षेवर आय्. ए. रिचड्स यांचा परिणाम जाणवतो. मर्मवाणी (१९२४) हा बुद्धदेवांचा प्रथम प्रकाशित कवितासंग्रह असला, तरी यंदिर वंदना (१९३०) हा त्यांचा पहिला प्रातिनिधिक कवितासंग्रह होय. पौगंडावस्थेतील स्त्रीच आकर्षण, त्यामुळे निर्माण होणारी अपराध भावना व तीवरही मात करणारी दुर्दम्य मोगलालसा यांच्या संघर्षमय चिंतनातून बुद्धदेवांची सुरूवातीची कविता जन्मली. कालांतराने अपराधभाव मावळला व बुद्धदेव निर्भय प्रेमिकाच्या भूमिकेतून विशुद्ध कविता लिहू लागले. अनुभव अधिक परिपक्क झाल्यानंतर त्यांच्या कवितेत एक प्रकारचा शोकात्म एकाकीपणा डोकावू लागला. कंकावती (१९३७), नूतन पाता (१९४०), दमयंती (१९४३), द्रौपदीर साडी (१९४८), शीतेर प्रार्थना : वसंतेर उत्तर (१९५५), जे आँधार आलोर अधिक (१९५८), मोरचे पडा पेरेकर गान (१९६६) हे त्यांचे प्रमुख कवितासंग्रह होत.
अमिनय, अभिनय नय और अन्यान्य गल्प (१९३०) हा बुद्धदेव बसूंचा पहिला कथासंग्रह. कथाकार या भूमिकेत बुद्धदेव हे आधुनिक बंगाली साहित्यातील प्रधान शैलीकार ठरतात. कथालेखनात त्यांची वृत्ती कवितेपेक्षा अधिक मोकळी झालेली दिसते. ते वर्णनात शोभादर्शकासारखी चमत्कृतिपूर्ण दृश्यशैली वापरतात. रेखाचित्र (१९३१), एरा ओरा एंव आरो अनेके (१९३२), अदृष्य शत्रू (१९३३), श्र्वेतपत्र (१९३४), असामान्य मेये (१९३५), घरेते भ्रमर एलो (१९३५), एकटि सकाल ओ एकटि संध्या (१९४५), एकटि कि दुटि पाखी (१९४६), हृदयेर जागरण (१९६१) हे कथासंग्रह त्यांच्या कथालेखनातील प्रमुख टप्पे होत. त्यांचे एकूण पन्नासावर कथासंग्रह प्रकाशित आहेत. साडा (१९३०) ही बुद्धदेवांची पहिली प्रकाशित कादंबरी. याशिवाय जबनिका पतन (१९३२), सानंद (१९३३), जे दिन फुटलो कमल (१९३३), धूसर गोधुली (१९३३), पारिवारिक (१९३६), कालो हवा (१९४२), माया मालंच (१९४४), तिथिडोर (१९४९), निरंजन स्वाक्षर (१९५१), गोलाप कॅनो कालो (१९६८) या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या एरा ओरा एवं आरो अनेके या कथासंग्रहावर व रातमोरे वृष्टी (१९६६) या कादंबरीवर अश्र्लीलतेचा आरोप आल्यामुळे बुद्धदेवांना अनुक्रमे १९३२ व १९६६ साली कायदेशीर खटल्याला तोंड द्यावे लागले. बुद्धदेव बसूंनी नाटकेही अनेक लिहिली आहेत. त्यांपैकी तपस्वी ओ तरंगिणी (१९६६), प्रथम पार्थ (१९६९), अनामी अंगना (१९७०), संक्रांती (१९७०) इ. प्रमुख होत.
छाया कालो कालो (१९४२) व मूतेर मत अद्-भुत (१९४२) ही लहान मुलांसाठी लिहिलेली गोष्टींची पुस्तके बुद्धदेवांचे कथनकौशल्य दर्शवितात. पारो मासेर छडा (१९५६) हे त्यांचे लहान मुलांसाठी लिहिलेल्या कवितांचे पुस्तकही प्रकाशित आहे. समीक्षक बुद्धदेवांची काही पुस्तके इंग्रजीत आहेत. बंगालीत लिहिलेल्या त्यांच्या समीक्षाग्रंथांपैकी कालेर पुतुल (१९४६), रवींद्रनाथ : कथासाहित्य (१९५४), साहित्यचर्चा (१९५४) इ. मौलिक स्वरूपाचे आहेत. यांशिवाय हठात आलोर झलकानि (१९३५), आमि चंचल हे (१९३६), समुद्रतीर (१९३७), सव पेथेचिर देशे (१९४१) इ. आत्मचरित्रात्मक भ्रमणगाथा त्यांचे समृद्ध चिंतन साकार करतात. महाभारतेतर कथा (१९७०) हे आपल्या आयुष्याच्या अखेरीस लिहिलेले त्यांचे महाभारतावरील चिंतनात्मक लेखांचे पुस्तक म्हणजे बुद्धदेवांच्या साहित्यशिल्पावरील कळस आहे. ललित लेखन, चिंतन, सूक्ष्म निरीक्षण, स्वैर कल्पनाविलास इ. विविध पैलूंचे मिश्रण या लेखांमध्ये पहावयास मिळते.
अनेक वाङ्-मयप्रकार समर्थपणे हाताळू शकणारे बुद्धदेव हे आधुनिक बंगाली साहित्यातील प्रधान लेखक ठरतात. त्यांच्या तपस्वी ओ तरंगिणी या नाटकाला १९६७ मध्ये साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला. १९७० मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.
संदर्भ : Dasgupta, Alokeranjan, Buddhadev Bose, New Delhi, 1977.
आलासे, वीणा
“