बलराम दास : (सु. १४७०-सु. १५४०).   ओरिसात पंधराव्या-सोळाव्या  शतकांत  होऊन  गेलेल्या → पंचसखा  कवींतील  एक ज्येष्ठ  वैष्णव  कवी.  उत्कलचा  सूर्यवंशीय  राजा  गजपती  प्रतापरूद्र देव  (कार.  १४९५—१५४०) याच्या कारकीर्दीत बलराम दास होऊन गेले. राजाचा एक मंत्री सोमनाथ महापात्र यांचे बलराम दास हे पुत्र. बलराम दासांच्या मातेचे नाव जंबुवती. बलराम दासांनी ओरिसात वैष्णव पंथाचे प्रवर्तन केले. आजही ह्या वैष्णव पंथाची गादी पुरी येथे विद्यमान आहे.

बलराम दास योग वा ज्ञानमिश्रित भक्तिसाधनेचे पुरस्कर्ते होते आणि ⇨ चैतन्य महाप्रभू (सु. १४८५-सु. १५३३) ओरिसात पुरीस येण्यापूर्वीच प्रसिद्धीसही आले होते तथापि त्यांनी चैतन्यांचे अनुयायित्व स्वीकारले. बलराम दासांची भक्तिविव्हलता पाहून चैतन्य त्यांना ‘मत्त’ वा ‘वेडा’ बलराम म्हणत. योगसाधनेमुळे त्यांना काही सिद्धीही प्राप्त झाल्या होत्या. प्रतापरूद्र देवाने त्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेतली आणि आपल्या अलौकिक सिद्धी सामर्थ्याने ते त्या परीक्षेस उतरलेही. प्रतापरूद्र देव त्यांना गुरूस्थानी मानत असे. पंचसखा कवींत बलराम दास सर्वांत ज्येष्ठ होते आणि बंगाली वैष्णव संप्रदायाच्या ग्रंथांतही त्यांचा चैतन्यांचा एक साथी म्हणून आदराने निर्देश केलेला आढळतो. तथापि बलराम दासांच्या ग्रंथांत चैतन्यांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक शिकवणीविषयी एकही निर्देश आढळत नाही.

बलराम दास हे त्यांनी ओडियात रचलेल्या जगमोहन रामायण  ह्या  महाकाव्यासाठी  प्रसिद्ध आहेत. सर्व उत्तर भारतीय भाषांत रचलेल्या ‘रामायणां’ त बलराम दासांचे हे रामायण आधीचे आहे. तुलसी रामायणाच्याही सु. ५० वर्षे आधी ते त्यांनी रचले. ते इतर ‘रामायणां’ पेक्षा स्वतंत्र तर आहेच पण ते खास ओरिसाचे रामायण आहे. त्यांचे हे महाकाव्य ⇨ सारळादासांच्या महाभारताखालोखाल महत्त्वाचे मानले जाते. वाल्मीकिरामायणाच्या तुलनेत त्यांचे हे रामायण एक स्वतंत्र महाकाव्य म्हणावे लागेल. त्यांनी आपल्या ह्या काव्यात तत्कालीन ओरिसाच्या जीवनाचे व चालीरीतींचे सुस्पष्ट चित्रण केले आहे. जगमोहन रामायणाचा ओरिसाच्या जनजीवनावर खोलवर व विस्तृत प्रमाणावर प्रभाव असून नंतरच्या सु. ३० कवींनी रचलेल्या रामायण-काव्यांचा आधारग्रंथ म्हणून त्याचा लौकिक आहे. ह्या ‘रामायण’ –कवींनी तसेच ⇨उपेंद्र मंज (अठरावे शतक) यानेही (वैदेहिश विलास ह्या महाकाव्यात) बलराम दासांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे ऋण मान्य केले आहे. 

सारळादासांच्या महाभारताप्रमाणेच हे रामायण त्यांनी बंगालीत ‘पयार’ नावाने वा ओडियात ‘असावरी’ किंवा ‘कलसा’ वा ‘दांडी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या १४ अक्षरी वृत्तात रचले आहे. हे वृत्त बरेचसे मुक्तच्छंदासारखे आहे. मुख्य विषय अर्थातच मूळ वाल्मीकिरामायणातील असला, तरी त्यातील अनेक कथांचा त्यांनी आपल्या कल्पनेने स्वतंत्रपणे आविष्कार-विस्तार तर केला आहेच पण त्यात बदलही केले आहेत. त्यातील सर्वच पात्रे दैवी न वाटता हाडामासाची मानवी वाटतात. ह्या ‘मानवी’ स्पर्शामुळेच त्यांचे हे रामायण ओरिसाच्या जनमानसात खोलवर रूजले असून लोकांना ते प्रत्ययकारी वाटते. ओरिसात ह्या रामायणाचे स्थान अपूर्व व सर्वश्रेष्ठ आहे. ओरिसात नंतर अनेक रामायण-काव्ये लिहिली गेली पण बलराम दासांच्या या रामायणाची लोकप्रियता व सर त्यांना नाही.

हे जगमोहन रामायण बलराम दासांनी शिव-पार्वती संवादाच्या रूपाने लिहिले. शिवाचे निवास्थान हिमालयातील कैलास पर्वत नसून ओरिसातील कपिलास पर्वत आहे तसेच मूळ रामायणातील अनेक स्थळे ओरिसातीलच होत असे मानून त्यांनी ही रचना केली. याचेच अनुकरण करून नंतरच्या कवींनी आपली रामायणे रचली व त्यांचे ऋणही मान्य केले. जगन्नाथ दासांची भाषा ओरिसाची जनभाषाच असून ती मधुर, साधीसरळ व सुवोध आहे. सामान्यांच्या या भाषेतही आध्यात्मिक भाव व विचार पेलण्याचे सामर्थ्य असल्याचे या रचनेने सिद्ध केले आहे.

त्यांची दुसरी रचना माबसमुद्र ही असून ती ओरिसाच्या भक्तिसाहित्याचा अमोल ठेवा होय. परी येथील गुंडीचायात्रा या उत्सवात बलराम दास भावविभोर होऊन शुचिर्भूत न होता जगन्नाथाच्या रथावर आरूढ झाले [→जगन्नाथाचा रथ], तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी त्यांना अपमानित करून हाकलून दिले. या प्रसंगाने व्यथित होऊन त्यांनी जगन्नाथाला उद्देशून अत्यंत भावपूर्ण अशी जी ७५० पदे रचली ती यात संगृहीत आहेत. भक्तिभावनेची आर्तता आणि कारूण्याचा त्यात परमोत्कर्ष झालेला दिसतो. त्यांच्या कविव्यक्तिमत्त्वाचा या काव्यात उत्कृष्ट आविष्कार झाला आहे.

ह्या दोन काव्यांव्यतिरिक्त वेदान्तसार गीता, गुप्तगीता, विराट गीता, सप्तांगयोगसार टीका ह्या रचनाही त्यांच्या नावावर असून त्यांत हठयोगाची व राजयोगाची तत्त्वे आणि वेदान्ती तत्त्वमीमांसा सुबोध रीत्या प्रतिपादन केलेली आहे. बट-अबकाशमध्ये जगन्नाथ देवतेची आराधना आहे. त्यांच्या इतरही काही लघुरचना उपलब्ध असून त्यांत मृगुनी स्तुतीलक्ष्मीपुराणसुअंग ह्या प्रसिद्ध आहेत. ह्या रचना आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. लक्ष्मीपुराणावर तर ओरिसात आजही अनेक लोकनाट्ये रचून त्यांचे प्रयोग केले जातात.

बलराम दासांच्या सर्वच रचनांतून एक थोर समाजसुधारक, योगी व परम भक्त म्हणून त्यांची प्रतिमा उभी राहते. जातिवर्णभेदविरहित समाजरचनेचे ते पुरस्कर्ते होते. धर्माच्या नावावर लुबाडणूक करणाऱ्या पुरोहितशाहीस त्यांचा कडवा विरोध होता. स्त्री-पुरूष समानतेचेही ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या रामायण, मावसमुद्र इ. रचनांतून त्यांच्या ह्या सुधारणावादी विचारांचा जागोजाग प्रत्यत येतो. प्राचीन ओडिया साहित्यात एक श्रेष्ठ महाकवी आणि वैष्णव संत म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ : Misra, N. Balaram Das : Oriya Ramayan, Shantiniketan 1955.

दास, कुंजबिहारी

मिश्र, नरेंद्र (इं.)

सुर्वे, भा. ग. (मु.)