बर्लिन, सर आयझेया : (६ जून १९०९-). ब्रिटिश विचारवंत व तत्त्वज्ञ. जन्म रशियातील रीगा, लॅटव्हिया येथे. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या पालकांसमवेत इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. शिक्षण ऑक्सफर्ड येथील सेंट पॉल स्कूल व कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजात. ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळवून ते १९३१ मध्ये बी. ए. व १९३५ मध्ये एम्. ए. झाले. १९३२ पासूनच चे ऑक्सफर्डमध्ये अध्यापन करू लागले. १९४२-४५ मध्ये ते ब्रिटिश दूतावासाच्या सेवेत वॉशिंग्टन येथे होते. १९५७ मध्ये त्यांची ऑक्सफर्डमधील चिचेली अध्यासनावर सामाजिक व राजकीय सिद्धांताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९६६ मध्ये न्यूयॉर्क येथील सिटी युनिव्हर्सिटीत मानव्यविद्येचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले. १९५७ मध्ये त्यांना नाइटहुड (‘सर’ हा किताब) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
‘संकल्पनांचा इतिहास’ ह्या अलीकडे रूढ झालेल्या ज्ञानशाखेत, वेगवेगळ्या युगांतील आणि भिन्न विचारसरणींच्या विचारवंतांच्या मतांचे संवेदनशील व मूलग्राही निरूपण करून त्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांच्या बहुतांशलेखनातून व्यक्तीच्या संकल्पस्वातंत्र्याचा प्रश्र्न केंद्रस्थानी असल्याचे दिसते. ‘टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी’ ह्या विषयावर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात १९५८ मध्ये दिलेले व्याख्यान विशेष गाजले. अभावरूप व भावरूप स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना त्यांनी मांडल्या. हे व्याख्यान १९६९ मध्ये फोर एसेज ऑन लिबर्टी ह्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या ह्या ग्रंथाची तुलना ⇨ जॉन स्टयूअर्ट मिल (१८०६-७३) यांच्या ऑन लिबर्टी (१८५९) ह्या प्रख्यात ग्रंथाशी केली जाते. बर्लिन यांनी आपल्या या ग्रंथात व्यक्तीच्या ‘मर्यादित’ संकल्पस्वातंत्र्याच्या संकल्पनेचे मूलगामी विश्र्लेषम व स्पष्टीकरण केले आहे. टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी ह्या निबंधाचा मराठी अनुवाद मे. पुं. रेगे यांनी नवभारत मासिकातून (ऑक्टो., नोव्हें. १९७७, जाने.-फेब्रु. व मार्च १९७८) क्रमशः केला आहे. इतिहासाच्या तत्त्वज्ञानासंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले आहेत. इतिहासाचा विषय केवळ घटनाच नसतात, तर मानवी कृतीही असतात. म्हणूनच इतिहासकाराला स्वातंत्र्य व नियती ह्या दोन विकल्पांमधून एकाची निवड करावी लागते. आपल्या हिस्टॉरिकल इनएव्हिटॅबिलिटी (१९५५) ह्या निबंधात त्यांनी नियतिवादाचे प्रामाण्य नाकारले नसले, तरी नियतिवादी विचारसरणी इतिहासाम्यासासाठी विसंगत असल्याचे मत प्रतिपादले आहे. कृतीबाबत मानवाला जबाबदार धरण्यासाठी त्याच्या ठिकाणी संकल्पस्वातंत्र्य असल्याचे मानावे लागले. म्हणूनच ऐतिहासिक वर्णनात संकल्पस्वातंत्र्यावर अधिक भर देणे उचित ठरेल. ऐतिहासिक तथ्ये व वैज्ञानिक तथ्ये यांत मूलभूत फरक असतो. ऐतिहासिक तथ्ये मूल्यभारित असतात आणि म्हणूनच त्यांना वैज्ञानिक नियम लावून चालणार नाही. त्यासाठी इतिहाकसाराला नैतिक व मानसशास्त्रीय मूल्यांचा आश्रय काही प्रमाणात तरी घ्यावा लागतो.
कार्ल मार्क्स : हिज लाइफ अँड इन्व्हायर्-न्-मेंट (१९३९), द हेजहॉग अँड द फॉक्स (१९५३), द एज ऑफ एन्लाइट्नमेन्ट (१९५६) व व्हीको अँड हेर्डर (१९७६) हे त्यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ होत. ह्याशिवाय त्यांनी वेळोवेळी लिहिलेले निबंध ४ खंडांत आयझेया बर्लिन सिलेक्टेड राय्-टिंग्ज ह्या मालेत प्रकाशित झाले आहेत. एक चिकित्सक व मूलगामी विश्र्लेषण करणारे विचारवंत म्हणून त्यांनी तत्त्वज्ञानात व एकूण वैचारिक क्षेत्रात घातलेली भर महत्त्वपूर्ण मानली जाते.
सुर्वे, भा. ग.