बर्म्यूडा : उत्तर अटलांटिक महासागरातील ब्रिटिशांकित प्रवाळद्विपे. क्षेत्रफळ ५३ चौ. किमी. लोकसंख्या ५५,००० (१९७७ अंदाज). ही अ. सं. सं. च्या पूर्वेस न्यूयॉर्क शहरापासून १,२९६ किमी. अंतरावर ३२º १५’ उ. अक्षांश आणि ६४º ५१’ प. रेखांश यांदरम्यान पसरलेली आहेत. ३०० पेक्षा अधिक बेटे या समूहात असून त्यांपैकी केवळ २० बेटांवरच मानववस्ती आढळते. बर्म्यूडा, बोअँझ, आयर्लंड, सेंट डेव्हिड्स, सेंट जॉर्जेस, समरसेट आणि वॉटफर्ड ही या द्वीपसमूहातील प्रमुख बेटे आहेत. ही एकमेकांशी पुलांनी जोडलेली असून त्यांपैकी बर्म्यूडा या सर्वात मोठ्या बेटाने एकूण क्षेत्रफळाच्या दोन-तृतीयांश भाग व्यापला आहे. याच बेटावरील हॅमिल्टन ही बर्म्यूडाची राजधानी (लोक. ३,०००-१९७६ अंदाज) आहे.
भूवर्णन : भूवैज्ञानिक दृष्टया ही बेटे एओलिन चुनखडकयुक्त असून प३वाळभित्तींनी बनलेली आहेत. त्यांवर अनेक टेकड्या आणि कटक असून समुद्रसपाटीपासून त्यांची उंची सु. ७६ मी. आहे. बेटांवरील सर्वोच्च शिखर ७९ मी. उंचीचे आहे. चुनखडकाचा वरचा थर सच्छिद्र, अधिक झिरपणारा असल्याने पृष्ठभागावर झरे, प्रवाह अथवा विहिरी आढळत नाहीत. म्हणूनच पाणीपुरवठा केवळ पावसावरच अवलंबून असतो.
या प्रदेशाचे वार्षिक सरासरी तपमान २१º से. असते. हिवाळ्यात ते १७º से. तर उन्हाळ्यात २६º से. पर्यत असते. येथील वार्षिक पर्जन्यमान सु. १४७ सेंमी असून अधूनमधून हरिकेन वादळांचा धोका असतो. बर्म्यूडाच्या वायव्येकडून वाहणाऱ्या गल्फ प्रवाहामुळे या बेटांचे हवामान सौम्य व आरोग्यदायी बनले आहे. यामुळेच हा प्रदेश पर्यटन केंद्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.
या बेटांवर उष्ण कटिबंधीय प्रकारच्या वनस्पती जास्त आढ-ळतात. जूनिपर अथवा बर्म्यूडा सीडार येथे विपुल प्रमाणात आहेत. १९४० मध्ये या वृक्षांवरील किडीमुळे सु. ८० % जंगलांचे नुकसान झाले होते. १९५२ पासून त्यांची पुन्हा लागवड करण्यात आली आहे. या प्रदेशात काही ठिकाणी बर्म्यूडा गवतही उगवते. बेटांवर सरड्यासारखे सरपटणारे प्राणी तसेच बेडूक, उंदीर इ. आढळतात. यांशिवाय सात प्रकारचे स्थानिक पक्षी बेटांवर दिसून येतात. स्थलांतरित पक्षी मात्र बरेच येतात. सागरी पक्ष्यांपैकी बम्यूडा पेट्रेल हा प्रसिद्ध आहे. बेटांच्या सागरी परिसरात अनेक प्रकारचे मासे व कोळंबी सापडते. १९६० पासून मत्स्यव्यवसायासाठी व हौशी प्रवाशांचा छंद म्हणून माशांची वाढ करण्यात आली आहे.
|
इतिहास व राज्यव्यवस्था : सोळाव्या शतकाच्या सुरूवातीलाच (सु. १५०३) स्पॅनिश इतिहासतज्ञ आणि दर्यावर्दी व्हान दे बर्म्यूडाझ याने या बेटास भेट दिली. त्याच्याच नावावरून ही बेटे ‘बर्म्यूडा’ म्हणून ओळखली जातात. २८ जुलै १६०९ रोजी ब्रिटिश वसाहतकाऱ्यांचे ‘सी व्हेंचर’ नावाचे जहाज या बेटांजवळच वादळात नष्ट झाले. त्यातून वाचलेल्या लोकांनी या बेटांवर प्रथम वस्ती केली. तोपर्यंत ही बेटे निर्मनुष्यच होती. सी व्हेंचरचा कप्तान अँडमिरल सर जॉर्ज समर्स याच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही काळ ही बेटे ‘समर्स बेटे’ या नावानेही ओळखली जात. सुरूवातीच्या काळातील या बेटांची राजधानी सेंट जॉर्ज हे शहरही त्याच्याच स्मरणार्थ वसविण्यात आले. १६१० च्या सुमारास इंग्लंडच्या पहिल्या जेम्सने व्हर्जिनिया कंपनीला बर्म्यूडा बेटे बक्षीस दिली. ब्रिटिश व्यापाऱ्यांना या कंपनीने १६१३ मध्ये या बेटांचे हक्क दिले. १६८४ पासून ही ब्रिटिश कॉलनी म्हणून जाहीर करण्यात आली. १८१५ नंतर हॅमिल्टन येथे राजधानी हलविण्यात आली. अठराव्या शतकात वेस्ट इंडीज व उत्तर अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारामुळे बर्म्यूडाची भरभराट झाली. या बेटांजवळच वादळात नष्ट झालेल्या जहाजांवरील माल मात्र बर्म्यूडाला मिळून त्याच्या उत्पन्नात भर पडे. १८४६ मध्ये ‘गिब्ज हिल’ दीपगृह उभारल्यामुळे हे उत्पन्न कमी झाले. आजही हे दीपगृह पाहावयास सापडते. अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्याचा किनारा, बर्म्यूडा व प्वेर्त रीको यांदरम्यानचा एकूण ११,४०,००० चौ. किमी. सागराचा भाग कुप्रसिद्ध ‘बर्म्यूडा ट्रँगल’ किंवा ‘डेव्हिल्स ट्रँगल’ या नावाने ओळखला जातो. या भागात १८५४ पासून एकूण ५० पेक्षा जास्त बोटी व विमाने नष्ट झाली. तेथीवल गूढ अशा वातावरणातील परिस्थितीमुळे हे घडते, असा लोकांचा विश्र्वास आहे. पहिल्या महायुद्धकाळात (१९१४-१८) अ. सं. सं. चा नाविकतळ येथे होता. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९-४५) अमेरिकेने येथे हवाई व नाविक तळ ९९ वर्षांच्या माडेकराराने उभारलेले आहेत. सेंट डेव्हिड्स बेटावरील काइंड्ली हा हवाई तळ आणि बर्म्यूडा बेटावरील नाविक तळ यांवर अमेरिकेची सत्ता आहे. १९५० मध्ये पाश्र्चिमात्य राष्ट्रांतील नेत्यांच्या काही बैठका येथेच भरल्या होत्या. १९६०-७० या दशकात बर्म्यूडातील वर्णविरोधी चळवशीला जोर चढला. निग्रोंचे आधिक्य असल्यामुळे आर्थिक आणि राजकीय बाबतींत त्यांचेच वर्चस्व आढळते.
बर्म्यूडा येथे प्रातिनिधिक सरकार असून ८ जून १९६८ रोजी याला अंतर्गत स्वायत्ता मिळाली. त्याच वर्षीच्या राज्य घटनेनुसार येथील राज्यपालाची निवड पाच वर्षाच्या कालावधीसाठी ग्रेट ब्रिटन सरकार- तर्फे केली जाते. परराष्ट्रीय धोरण, संरक्षण, अंतर्गत सुरक्षितता व पोलिस खाते या बाबी सोडून इतर बाबतींत राज्यपाल मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्यास बांधलेला आहे. मंत्रिमंडळातील सभासदांची नियुक्ती ही द्विसदनी सभागृहातील प्रतिनिधींतून मुख्य मंत्र्याच्या मान्यतेने केली जाते. विधिमंडळ हे विधानपरिषदेचे ११ सभासद व विधानसभेचे ४० सभासद यांचे मिळून पाच वर्षांसाठी निवडलेले असते. या सभागृहाचे सभासद प्रौढ मतदानपद्धतीने निवडलेले असतात. मुख्य मंत्र्यासह इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतो. राज्यात १९७६ मध्ये ‘युनायटेड बम्यूर्डा पार्टी’ आणि ‘प्रोग्रेसिव्ह लेबर पार्टी’ हे दोन प्रमुख राजकीय पक्ष होते. विधिमंडळातील त्यांची सभासदसंख्या अनुक्रमे २६ व १४ होती. बर्म्यूडा रेजिमेंट हे संरक्षण दल असून १९७९ मध्ये त्याचे सैन्यबळ ५०० होते.
सर्वोच्च न्यायालय, अपील न्यायालय व कनिष्ठ न्यायालय अशा न्यायदानाच्या सोयी असून सर्वोच्च न्यायालयात गंभीर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात.
आर्थिक स्थिती : सीमाशुल्क, पर्यटन व्यवसाय व जहाज-दुरू-स्ती ही या प्रदेशातील उत्पन्नाची प्रमुख साधने होत. बेंटावरील निसर्ग-रम्य टेकड्या, दुतर्फा पाम वृक्ष असलेले रूंद रस्ते, रंगीबेरंगी फुलझाडे व चमकदार पुळणी यांमुळे वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते. १९७८ मध्ये ५,५१,४६६ पर्यटकांनी या बेटांस भेट दिली. याच वर्षीच्या अंतर्गत स्थूल उत्पन्नाच्या ४४ % उत्पन्न पर्यटन व्यवसायापासून मिळाले.
बर्म्यूडात १९७८ मध्ये सुमारे २४३ हे. जमीन लागवडीखाली होती. व एकूण कामागारांच्या १.३ % कामगार शेती, मासेमारी या व्यवसायांत गुंतलेले होते. शेती उत्पादनात सुवासिक अर्क, रोपे, केळी, लिंबू जातीची फळे, बटाटे, लिलीची फुले यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यांशिवाय पालेभाज्या, फळभाज्याही होतात. दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन थोड्याफार प्रमाणात चालते. बर्म्यूडाचा व्यापार प्रामुख्याने कॅनडा, ग्रेट ब्रिटन व अमेरिका या देशांशी चालतो.
बर्म्यूडा डॉलर हे येथील अधिकृत चलन असून १ बर्म्यूडा डॉलर = १०० सेंट होतात. मार्च १९७९ मधील विनिमय दर १ स्टर्लिंग पौंड = २.०२ बर्म्यूडा डॉलर व १ अमेरिकी डॉलर = १ बर्म्यूडा डॉलर असा होता. चलनामध्ये १, ५, १०, २०, ५० डॉलरच्या नोटा व १, ५, १०, २५, ५० सेंटची नाणी प्रचारात होती. येथे चार प्रमुख बँका आहेत. सरकारने १९४८ पासून रेल्वेमार्ग बंद करून बसवाहतुकीस प्राधान्य दिले आहे. १९७८ मध्ये येथे एकूण ३५,००० वाहने होती. अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स आणि ईस्टर्न एअरलाइन्स यांद्वारा अमेरिकेशी नियमित हवाई वाहतूक चालते. तसेच ब्रिटिश व कॅनेडियन हवाई सेवाही नियमितपणे उपलब्ध आहे. याचप्रमणे मोठ्या प्रमाणावर जहाजवाहतूकही चालते. १९७७ मध्ये येथे १५ डाकघरे होती. दूरध्वनियंत्रणा खाजगी मालकीची असून १९७८ मध्ये एकूण ४०,००० दूरध्वनी होते. रेडिओ आणि दूरचित्रवाणी सेवा व्यापारी तत्त्वावर चालतात. १९७९ मध्ये येथे फक्त दोन चित्रपटगृहे होती.
लोक व समाजजीवन : ही बेटे पूर्वी निर्मनुष्य होती. वसाहतकाळात (सतरावे-अठरावे शतक) निग्रो गुलामांना या प्रदेशात आणण्यात आले. त्यानंतर येथे पोर्तुगीज कामगारांचे आगमन झाले. या प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या सु. दोन-तृतीयांश लोक निग्रो आहेत आणि इतर लोकांमध्ये पोतुर्गीज व ब्रिटिशांचे आधिक्य आहे.
येथील सर्वच इमारती चुनखडकांच्या असून वैशिष्टयपूर्ण बांधणीच्या असतात. पाणीपुरवठा पावसावर अवलंबून असल्याने छपरावरून पडणाऱ्या पाण्याचा साठा इमारतीच्या तळघरात टाक्यांमध्ये केला जातो. पाण्याचे काही साठे इमारतीबाहेरही असतात. त्या पाण्यात सोडण्यासाठी सरकारतर्फे मासे पुरविण्यात येतात. त्यामुळे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते. पाणीपुरवठा स्वच्छ व्हावा म्हणून छपरे सफेद रंगाने रंगवून ती सतत स्वच्छ ठेवली जातात.
येथे पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९७६ मध्ये येथे दहा शासकीय बालसंगोपन गृहे होती व त्यांत ३९८ मुले होती. त्यांपैकी सहा गृहे अपंगांसाठी होती. याच वर्षी एकूण १८ सरकारी प्राथमिक शाळांत ५,५१० मुले व नऊ माध्यमिक शाळांत ३,९५० मुले शिक्षण घेत होती तसेच चार खाजगी शाळांत २,००० आणि बर्म्यूडा कॉलेजमध्ये (स्था. १९७२) ६२१ विद्यार्थी शिकत होते.
मुलांना १९७० च्या वैद्यकीय कायद्यानुसार मोफत औषधोपचार व प्रौढांना अल्प मोबदल्यात वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. याच वर्षी येथे एकूण ७० डॉक्टर होते.
बर्म्यूडा बेटावरील हॅमिल्टन हे राजधानीचे शहर व प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या परिसरात पर्यटकांसाठी फेरी बोटींची व्यवस्था केलेली आहे. या प्रमुख शहराशिवाय सेंट जॉर्ज. टकर्स टाउन, फ्लॅट्स व्हिलेज, समरसेट इ. शहरे महत्त्वाची आहेत.
चौंडे, मा. ल.
कापडी, सुलभा
“