बर्न्स, रॉबर्ट : (२५ जानेवारी १७५९-२१ जुलै १७९६). विख्यात स्कॉटिश कवी. स्कॉटिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून त्याने काव्यरचना केली. अलोवे, एअर्‌शर येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. औपचारिक शिक्षण त्याला फारसे मिळाले नाही उलट किशोर वयापासूनच अपुऱ्या अन्नावर काबाडकष्ट करावे लागले. तथापि स्वप्रयत्नाने तो शिकला. जॉन मर्‌डॉक ह्या शिक्षकाचेही त्याला काही मार्गदर्शन झाले. शेक्सपिअर, मिल्टन, ड्रायडन ह्यांच्यासारख्या इंग्रजी साहित्यश्रेष्ठींचे साहित्य वाचले होते तसेच समकालीन इंग्रजी साहित्याचाही त्याचा चांगला परिचय होता फ्रेंच आणि लॅटिन ह्या भाषांचेही थोडेफार ज्ञान त्याने मिळविले होते. ॲलन रॅम्से (१६८६-१७५८) आणि रॉबर्ट फर्गसन (१७५०-७४) ह्या स्कॉटिश कवींच्या-विशेषतः रॉबर्ट फर्गसनच्या-कविता वाचीत असताना उपेक्षित अशा स्कॉटिश भाषेच्या अंतःशक्तीची जाणीव त्याला झाली. फर्गसनच्या अनेक कवितांचे अनुकरणही त्याने केले. स्कॉटिश लोकगीते तो बालपणापासून ऐकत आला होता. ह्या संस्कारांतूनच त्याची पृथगात्म कविता अवतरली. पोएम्स, चीफ्ली इन द स्कॉटिश डायलेक्ट्स (१७८६) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्याने बर्न्सला फार मोठी लोकप्रियता मिळवून दिली. स्कॉटिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कविता ह्या संग्रहात अंतर्भूत होत्या,-‘द ट्‌वा डॉब्ज’, ‘द स्कॉच ड्रिंक’, ‘द होली फेअल, ‘द डेथ अँड डाइंग वर्ड्‌स ऑफ पूअर माइली’, ‘टू अ माउस’ ह्या त्या संग्रहातील काही लक्षणीय कविता. 

 

स्कॉटलंडच्या परंपरा आणि संस्कृती ह्यांसंबंधीचा स्वभिमान बर्न्सच्या कवितेतून प्रत्ययास येतो. सामान्य स्कॉटिश माणसाचे जीवन त्याने हळुवारपणे आणि सहानुभूतिने सशब्द केले आहे. स्कॉटिश कवितेच्या आणि लोकगीतांच्य परंपरेचा त्याला मिळालेला वारसाही त्यांतून अनुभवास येतो. बर्न्सने लिहिलेल्या गीतांनी तर त्याला त्याच्या देशाबाहेरही कीर्ती प्राप्त करून दिली. विनोदी आणि उपरोधप्रचुर अशा कविताही त्याने लिहिल्या. ‘टॉम ओ शँटर’ ही त्याची विनोदी कविता विख्यात आहे.

बर्न्सच्या कवितेतून स्वच्छंदतावादी प्रवृत्ती आणि वळणे प्रत्ययास येत असल्यामुळे इंग्रजी साहित्यातील नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्या संक्रमणकाळातील कवी म्हणूनही त्याचे महत्व आहे.

ह्याखेरीस पारंपरिक स्कॉटिश गीतांच्या संकलनाचे फार मोठे कार्य जेम्स जॉन्सन नावाच्या एका व्यक्तीबरोबर बर्न्सने केले. बरीचशी स्कॉटिश गीते त्रुटित स्वरूपात उपलब्ध होती. बर्न्सने त्यांना स्वतःच्या प्रतिभेने पूर्णाकार दिला त्यासाठी आवश्यक तेथे स्वतःची शब्दरचना घातली.काही स्कॉटिश गीतांच्या नुसत्या चालीच उपलब्ध होत्या. बर्न्सने त्यांच्यात शब्द गुंफिले. बर्न्सने केलेले हे संकलन ‘द स्कॉट्स म्यूझिकल म्यूझिअम’ ह्या नावाने सहा खंडात प्रसिद्ध झाले आहे. (१७८७-१८०३).

अबकारी खात्यात १७८९ पासून त्याने नोकरी धरली होती. ह्याच नोकरीत असताना १७९१ मध्ये त्याची डंफ्रीस येथे बदली झाली तेथेच हृदयविकाराने त्याचे निधन झाले.

लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने त्याची संपूर्ण कविता प्रसिद्ध केली आहे (प्रथमावृत्ती, १९०४).

संदर्भ : 1. Chambers, Robert, Ed. The Life and Works of Robert Burns, 4 Vols. 1856-57, rev. Ed, by William Wallace, 1896.

            2. Crawford, Thomas, Burns : A Study of the Poems and Songs, Stanford, Calif.,1960.

            3. Daiches, David, Robert Burns, New York, 1952.

            4. Ferguson, De Lancey, Pride and Passion : Robert Burns, 1759-96, rev. Ed. New York, 1967.

            5. Kinsley, James, Ed. The Poems and Songs of Burns, London, 1968.

            6. Lockhart, John M. The Life of Robert Burns, New York, 1959.

कुलकर्णी, अ. र.