बर्न :स्वित्झर्लंडची राजधानी. उपनगरांसर लोकसंख्या २,८३,६०० (१९७८ अंदाज). आरे नदीने तिन्ही बाजूंनी वेढलेले हे शहर झुरिकच्या नैऋत्येस सु. ९५ किमी. वर एका उंच पठारावर वसलेले आहे. बर्फाच्छादित आल्प्सची पार्श्वभूमी लाभलेल्या या निसर्गसुंदर शहरात मध्ययुगीन काळातील अनेक अवशेष आजही दृष्टीस पडतात. आंतरराष्ट्रीय संघटनांचे केंद्र म्हणूनही बर्नची ख्याती आहे. बहुसंख्य लोक जर्मन भाषिक प्रॉटेस्टेंट आहेत.

संसदभवनाचा दर्शनी भाग, बर्न

त्सेरिंगन वंशातील पाचवा ड्यूक बेर्खटोल्ट याने ११९१ मध्ये मुख्यतः लष्करी तळासाठी या शहराची स्थापना केली. एका दंतकथेनुसार हा ड्यूक एका शिकारीच्या प्रसंगी अस्वलांच्या हल्ल्यापासून बचावला आणि या ईश्वरी कृपेबद्दल त्याने हे शहर उभारले. ‘बारेन’ (अस्वल) या जर्मन शब्दावरूनच शहरास ‘बर्न’ हे नाव पडले असावे. आजही अस्वल हे बर्नचे बोधचिन्ह समजले जाते. पवित्र रोमन साम्राज्यात १२१८ मध्ये बर्नला स्वायत्त शहराचा दर्जा मिळाला . १२८८-१३३९ या काळात येथील लोकांनी हॅप्सबर्गचा रूडॉल्फ, त्याचा मुलगा ॲल्बर्ट आणि बव्हेलियाचा लुई यांचे हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले. १३५३ मध्ये स्विस राज्यसंघाचा आठवा सभासद म्हणून या शहरास मान्यता मिळाली. यानंतर किल्ल्याभोवती वसलेल्या या छोट्याशा शहराचा विकास झपाट्याने झाला. १४०५ मध्ये  अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलेले हे बर्न नव्याने वसविण्यात आले. १८४८ मध्ये बर्न स्वित्झर्लंडची राजधानी बनले. जुने शहर आरे नदीच्या वळणावर असून तेथील मध्ययुगीन इमारती, मनोरे, कारंजी इत्यादींमुळे त्या जुन्या काळाचा भास होतो. शहरात सुंदर कोरीन कारंजी असून त्यांपैकी काही पंधराव्या शतकातील आहेत. जुने बर्न नव्या शहराशी अनेक पुलांनी जोडलेले आहे.

मध्ययुगीन काळापासूनच्या येथील वास्तूंचा समावेश प्रेक्षणीय स्थळांत होतो. पंधराव्या शतकात बांधलेल्या सुप्रसिद्ध खगोलीय घड्याळ मनोऱ्यात (क्लॉक टॉवर) आजही तासांचे टोल पडताना कळसूत्री बाहुल्या, अस्वले, आरवणारा कोंबडा यांचा खेळ दृष्टीस पडतो. गॉथिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पंधराव्या शतकातील कॅथीड्रल प्रेक्षणीय आहे. टाउन हॉलसमोरील मध्ययुगीन चौक हा यूरोपातील एक उत्तम चौक समजला जातो.

शहरातील महत्वाच्या उद्योगांत सुती, रेशमी व लोकरी कापड, शास्त्रीय उपकरणे, यंत्रसामग्री, औषधे, रसायने, चॉकोलेट इत्यादींचा समावेश होत असून सभोवतालच्या कृषिउत्पादनाची बर्न ही प्रमुख बाजारपेठ आहे.

येथे फार मोठ्या उद्योगधंद्यांची वाढ झाली नसली, तरी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची, उदा., युनिव्हर्सल पोस्टल युनियन, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, इंटरनॅशनल कॉपीराइट युनियन इत्यादींची मुख्य कार्यालये येथेच आहे. स्विस स्थलवर्णनात्मक नकाशांचे प्रमुख कार्यालये येथेच आहेत. बर्न विद्यापीठ (स्था.१८३४) येथेच असून अनेक संगीत व कला विद्यालये तसेच व्यापारसंस्था शहरात आहेत. बर्नमधील अनेक प्रकारच्या संग्रहालयांपैकी ऐतिहासिक, सृष्टिविज्ञान-विषयक, कलाविषयक, स्विस अल्पाइन ही प्रसिद्ध आहेत. ‘सिटी अँड युनिव्हर्सिटी लायब्ररी’ मध्ये अनेक हस्तलिखिते व दुर्मिळ ग्रंथ यांचा संग्रह असून ‘स्विस नॅशनल लायब्ररी’ येथेच आहे.

कापडी, सुलभा