बरुआ, हेमकांत (हेम) : (? १९१५-? १९७७). एक अष्टपैलू असमिया साहित्यिक, राजकीय नेते व संसदपटू. जन्म तेजपूर येथे. गौहाती येथील कॉटन कॉलेजमधून १९३६ मध्ये ते बी. ए.आणि १९३८ मध्ये इंग्रजी घेऊन कलकत्ता विद्यापीठातून एम्. ए. झाले. त्यांच्या पत्नी अनु बरुआ ह्याही लेखिका आहेत. हेमकांतांनी एम्. ए झाल्यावर प्रथम जोरहाट येथील जे. बी. कॉलेजमध्ये आणि नंतर गौहाती येथील बी. बरुआ कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. बी. बरुआ कॉलेजमध्ये नंतर ते उपप्राचार्य व १९४५-६७ पर्यंत प्राचार्य होते. १९४२ मधील छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. १९५७ मध्ये ते प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. १९६७ पर्यंत ते लोकसभेवर होते. ते कुशल संसदपटू होते. लोकसभेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्णतेमुळे व प्रभावी वक्तृत्वामुळे गौरविली जात. त्यांची जाहीर भाषणेही गाजत. देशाच्या सांस्कृतिक विषयांचे जाणकार म्हणून त्यांना लोकमानसात आदराचे स्थान होते. साहित्य अकादेमीचेही ते काही काळ सदस्य होते.

 

हेम बरूआप्रतिभासंपन्न कवी व लेखक म्हणून आसाममध्ये व आसामबाहेरही त्यांची ख्याती होती. असमिया आणि इंग्रजी भाषेत त्यांनी विपुल ग्रंथनिर्मिती केली आहे. कलकत्त्यास एम्.ए. चा अभ्यास करत असतानच त्यांनी आपल्या कथालेखनास सुरूवात केली. कथेकडून ते कवितेकडे, साहित्यसमीक्षेकडे व पुढे वैचारिक निबंधलेखनाकडे वळले. आसाममधील वृत्तपत्रांशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता आणि त्यांतून ते सातत्याने लेखनही करीत. काही वेळा ह्या वृत्तपत्रांचे संपादकीय लेखही ते लिहीत. आसाममधील मासिके व वृत्तपत्रे तसेच देशातील इंग्रजी वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून त्यांनी नियमितपणे लेखन केले. पोचोआ (१९४८) ह्या असमिया मासिकाचे तसेच गौहातीवरून निघणाऱ्या आसाम एक्सप्रेस (१९७१) ह्या इंग्रजी दैनिकाचे ते एकेक वर्ष संपादक होते.

असमिया काव्यातील नव्या प्रवाहाचे एक प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. जुन्या स्वच्छंदतावादी काव्याची परंपरा सोडून असमियात सर्वस्वी नव्या वळणाची कविता त्यांनी लिहिली. स्वातंत्र्योत्तर काळातील असमिया काव्यावर त्यांच्या ह्या नवकवितेने कायम ठसा उमटवला आहे. त्यांची कविता प्रतिमा व प्रतीकांच्या द्वारा तरल भाव व्यक्त करते. पौराणिक व्यक्ती, प्रतिमा व प्रतीकांचाही ते नवा जटिल आशय व्यक्त करण्यासाठी मोठ्या कौशल्याने उपयोग करून घेतात. त्यांच्या कवितेतून महायुद्धोत्तर जागतिक संदर्भात समाजाच्या नैतिक अधःपतनाचे उपरोधपूर्ण दर्शन घडते. पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृती आणि वाङ्‌मय यांच्या सखोल परिशीलनातून त्यांची कविता साकारते. जागतिक सांस्कृतिक संदर्भ व त्याची प्रतिमा-प्रतीकात्मक अभिव्यक्ती यांमुळे त्यांची कविता सामान्य वाचकांस काहीशी दुर्बोधही वाटते. वालिचंदा (१९५१) व मनमयुरी (१९६५) हे त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह होत.

 

त्यांनी विविध विषयांवर विपुल निबंधलेखन केले असून, नऊ संग्रहांत ते संकलित आहे. चिंतनशील वृत्ती, सखोल अभ्यास, मार्मिक विश्लेषण, जागतिक संदर्भ व आधुनिक सांस्कृतिक आंदोलनांचा आणि विचारांचा अन्वय लावण्याची बौद्धिक क्षमता ही त्यांच्या निबंध लेखनाची वैशिष्टये होत.

 

देशात व परदेशात त्यांनी विपुल प्रवास केला. अमेरिका, रशिया, इस्त्राएल, तैवान, आग्नेय आशियातील अनेक देशांच्या प्रवासातील अनुभव त्यांनी आपल्या प्रवासवर्णनांतून शब्दांकित केले. असमिया भाषेतील प्रवासवर्णनांत त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला. त्यांची इंग्रजी भाषेतही साहित्य, संस्कृती, लोकजीवन यांवर विपुल व दर्जेदार लेख लिहिले व ग्रंथलेखनही केले. त्यांची इंग्रजी शैली सुबोध, आकर्षक व प्रसन्न आहे. साहित्यसमीक्षक म्हणूनही त्यांना असमियात महत्वपूर्ण स्थान आहे.

 

त्यांचे इतर महत्वपूर्ण ग्रंथ पुढीलप्रमाणे : साहित्यसमीक्षा : आधुनिक साहित्य (१९४८), साहित्य आरू साहित्य (१९६२) निबंधसंग्रह : चपनीया (१९५३), सम्मीहली (१९५८), ऐ गाओ ऐ गीत (१९६१), अंशु फूल (१९६४), पोचोआर रेंगानी (१९६९), सत्य आरु अहिंसा : गांधी (१९७१), छिन्नफूल (१९७३), तलसरा (१९७६) इत्यादी प्रवासवर्णन : सागर देखिछा (अमेरिकेचे प्रवास-वर्णन-१९५४), रंग करबीर फूल (रशिया-१९५९), इझ्‍राएल (१९६५), मेकोंग नोई देखिलो (आग्नेय आशिया – १९६७) इंग्रजी ग्रंथ : ऑगस्ट रेव्होल्यूशन इन आसाम, द रेड रिव्हर अँड द ब्ल्यू हिल्स (१९५४), आयड्ल आवर्स-१९६१ (१९६९), असमीज लिटरेचर (१९६२), फोक साँग्ज ऑफ इंडिया (१९६५), लक्ष्मीनाथ बेझबरुआ (१९६७), मॉडर्न असमीज पोएट्री (असमिया कवींच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद -१९६०) व फेअर्स अँड फेस्टिव्हल्स ऑफ आसाम (जे. डी. बवेजासमवेत – १९५६).

 

दास, जोगेश (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)