बरनी, जियाउद्दीन : (?१२८४?-?१३५७?). भारतातील एक मुस्लिम इतिहासकार. त्याच्या जन्ममृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. दिल्लीचा सुलतान धियासुद्दीन बल्बन याच्या कारकीर्दीत (इ. स. १२६६-८७) आणि नंतरच्या खल्जी काळात (१२९०-१३२०) त्याच्या घराण्यातील लोकांना दरबारी अधिकारपदे लाभली होती. मुअयिद-अल्-मुल्क हे त्याचे वडील. त्याचे मामा मलिक-अला-अल्-मुल्क हे दिल्लीचे कोतवाल होते. तो शेख निजामुद्दीन अवलियाचा भक्त होता. तसेच अमीर खुसरौ (१२५३-१३२५) व अमीर हसन या तत्कालीन प्रसिद्ध कवींशी त्याचे निकटचे संबंध होते. बरनी हा स्वतः मुहम्मद बिन तुघलकाकडे १७ वर्षे (१३२५-५१) नदीम (साथीदार) होता तथापि फिरोजशाह तुघलकाच्या वेळी (१३५१-८८) बादशाहची त्याच्यावर इतराजी झाली व त्याला हद्दपार व्हावे लागले. त्याचे उत्तरायुष्य हालअपेष्टातच गेले. फार्सीमध्ये लिहिलेले त्याचे पुढील इतिहासग्रंथ प्रसिद्ध आहेत : तारिख-इ-फिरोझशाही, फतवा-इ-जहानदारी व नत्-इ-मुहम्मदी यांपैकी तारिख-इ-फिरोझशाही या बृहद्ग्रंथात मुस्लिम राज्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेली राजनीती आणि इस्लामविषयक कर्तव्ये यांचा ऊहापोह आहे. सुलतान बल्बनपासून फिरोझशाह तुघलकाच्या ६ वर्षांच्या कारकीर्दीपर्यंतचा काळ या इतिहासग्रंथात त्याने हाताळला आहे. हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर त्याचे निधन झाले, असे म्हणतात. फतवा-इ-जहानदारी या ग्रंथात इतिहासाच्या धार्मिक तत्वज्ञानाचे विवरण आहे. त्यातून बरनीवरील सुफी विचारप्रणालीचा प्रभाव जाणवतो. इतिहासकाराने राज्यकर्त्यांची दुष्कृत्ये, अनाचार यांची दखल घ्यावी व निःपक्षपाती दृष्टिकोण स्वीकारावा, अशीही भूमिका त्याने घेतल्याचे दिसते. अखबार-इ-बर्मकिय्यान या त्याच्या ग्रंथात तत्कालीन दंतकथा व आख्यायिका यांचे दर्शन घडते.
संदर्भ : रिजवी, सैयिद अतहर अब्बास, आदि तुर्क कालीन भारत, अलिगढ, १९५६.
कुलकर्णी, गो.त्र्यं.