बदाऊनी, अब्दुल कादिर : (२१ ऑगस्ट १५४०-?). प्रसिद्ध मुस्लिम इतिहासकार व अकबराच्या दरबारातील एक विद्वान. जन्म जयपूर संस्थानातील तोडा (तडाभीम) या गावी झाला. वडील मुलूकशाह यांनी त्यास भरतपूर संस्थानातील बसावर या ठिकाणी लहानपणी नेले. पुढे  वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्यास संभळ येथे शेख हाकीम संभाली याच्या मार्गदर्शानाखाली ठेवले. तिथून तो शिक्षणासाठी आग्रा येथे गेला (१९५८-५९) आणि अबुल फज्ल आणी फैजी यांच्या बरोबर शेख मुबारक नागवरी यांच्याकडे त्याने अध्ययन केले. इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान यांबरोबरच त्याने काजी अबू अल्-माली यांच्या मार्गदर्शनाखाली हनफी न्यायशास्त्राचा [⟶अबू हनीफा] अभ्यास केला. वडिलांच्या मृत्यूनंतर (१५६२) तो उत्तर प्रदेशातील बदाऊन (बदयून) येथे गेला आणि येथील वास्तव्यामुळेच तो बदाऊनी या नावाने ओळखला जाऊ लागला. बदाऊनहून पतियाळाला येऊन हुसेन खानाकडे त्याने सु. ९ वर्षे नोकरी केली (१५६५-७४) पण दोघांत मतभेद आल्यानंतर तो पुन्हा आग्र्यास गेला. त्या वेळी जलालखान कुरैशी (मनसबदार) व हाकीम ऐन अल्-मुल्क (राजवैद्य) यांनी त्याची अकबर बादशाहकडे शिफारस केली. अकबराने त्यास इमाम नेमून (१५७५-७६) पुढे बदाऊन येथे मदद-इ-माश म्हणून १०,००० बिघे जमीन दिली (१५८९). तसेच त्यास आपल्या दरबारी विद्वानांत स्थान दिले. अकबराने त्याला संस्कृत व अरबी ग्रंथांचे भाषांतर करण्याचे काम दिले. दरबारातील अबुल फज्लच्या प्रभावामुळे तो मागे पडला.

बदाऊनीने अनेक मौलिक ग्रंथ रचलेः किताब-अल्-हादिस, तारिख-इ-अल्फी, नजात- अल् रशीद, मुन्तखाब-अल्-तवारिख किंवा तारिख-इ-बदाऊनी. बहर-अल-अस्मार, तर्जुमाह-इ-महाभारत, तर्जुमाह-इ-रामायण,तर्जुमाह-इ-सिंहासन बत्तिशी, आणि तर्जुमाह-इ-तारिख-इ-कश्मीर हे पाच ग्रंथ अनुक्रमे कथासरित्सागर, महाभारत, रामायण, सिंहासन बत्तिशीराजतरंगिणी या संस्कृत ग्रंथांची त्याची फार्सी भाषांतरे होत. किताब-अल्-हादिस यात जिहादची (धर्मयुद्धाची) व मुस्लिम परंपरेची हकिकत आहे तर तारिख-इ-अल्फी हा अकबराच्या आज्ञेवरून संकलित केलेला सर्वसाधारण इतिहास आहे. त्याच्या सर्व ग्रंथांत मुन्तखाब-अल्-तवारिख या ग्रंथास ऐतिहासिक दृष्टया अनन्यसाधारण महत्व आहे. हा ग्रंथ त्याने १५९६ च्या फेब्रुवारीत पूर्ण केला. त्याला प्रस्तावनेत प्रस्तुत ग्रंथ निजामुद्दीन अहमद याच्या तबकात-इ-अकबरी या ग्रंथाच्या आधारे रचल्याने त्याने नमूद केले आहे. त्यातील काही माहिती तारिख-इ-मुबारकशाही या ग्रंथामधूनही घेतली आहे, असेही तो म्हणतो. या ग्रंथाचे बदाऊनीने तीन खंड केले असून पहिल्या खंडात बाबर व हुमायून यांच्या कारकीर्दीची माहिती आहे. दुसऱ्या खंडात अकबराची १५९४ पर्यंतच्या कारकीर्दीची चिकित्सक मीमांसा असून त्याच्या प्रशासकीय आणि विशेषतः त्याच्या धार्मिक धोरणावर टीका आहे. म्हणूनच हा ग्रंथ त्याने अकबराच्या हयातीत प्रसिद्ध केला नाही. तिसऱ्या खंडात मुसलमान साधुसंत व विद्वान धर्मपंडित यांची लहान-मोठी चरित्रे आहेत. त्याच्या या इतिहासप्रसिद्ध ग्रंथात काही घटनांचे तपशिल आणि काही कालनिर्देश यांत सदोषता आढळते. बदाऊनीच्या इतिहासलेखनामागे जी प्रेरणा आहे, ती तत्कालीन विशेषतः अकबराच्या धार्मिक धोरणाविषयीचे आणि त्यामुळे इस्लाम धर्माचे शबलित झालेल्या मूळ स्वरूपाबद्दलचे तीव्र असमाधान, हे असावे असे दिसते. त्याच्या मते इतिहास हे एक उच्च आणि उदात्त शास्त्र असून सर्व ज्ञानाचा तो मूळ स्त्रोत आहे. त्याच्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर रँकिंग आणि डब्ल्यू. एच. लो यांनी केला (१८९८).

संदर्भ: 1. Luniya, B.N. Some Historians of Medieval India, Agra, 1969.

           2. Gibb, H.A.R. Kramers, J.H. &amp Others, Ed. The Encyclopaedia of Islam, Vol. I, Leiden,1960.

कुलकर्णी, गो. त्र्यं.