बझूका : अमेरिकन पायदळाचे रणगाडाविध्वंसक रॉकेटक्षेपक अस्त्र. बझूका नावाच्या वाद्याच्या आकारासारखे हे क्षेपणास्त्र दिसत असल्यामुळे त्यात बझूका हे नाव पडले. दुसऱ्या महायुध्दात उत्तर आफ्रिकेतील लढायांत (१९४२-४३) जर्मन रणगांड्यांच्या विध्वंसनासाठी बझूका उपयुक्त ठरले. काँक्रीट गुटिका मोर्च्यासाठीही बझूकाचा उपयोग करण्यात येई. बझूकांत दोनही बाजूंची तोंडे खुली असलेला एक नळीक्षेपक असतो. आतून गुळगुळीत असलेल्या या नळीचा व्यास ३४ मिमी. ते ८८मिमी. व लांबी १.६५ मी. असते. रॉकेट ४८ ते ७३ सेमी.पर्यंत लांब असून त्याचे वजन १.५ ते ४.० किग्रँ. पर्यंत असते. पेंटोलाईट, आरडीएक्स किंवा शीर्षाचा स्फोट ‘आकृतिबध्द’ किंवा ‘पोकळ’ भार (चार्ज) प्रकाराने होतो. क्षेपकाच्या एका तोंडातून रॉकेट फेकले जाते, तर मागच्या तोंडातून वायुदाब निसटून जातो. त्यामुळे क्षेपणाचा धक्का (रीकॉइल) बसत नाही. हे बझूकाचे वैशिष्ट्ये होय. नळी एक किंवा दुसंधी असते. नळीच्या मध्यभागी रॉकेट डागण्यासाठी विजेचा चाप,नेमनिर्देशक व मूठ असते. खांद्यावर नळी धरून एक सैनिक रॉकेट सोडतो व त्याचा सहकारी नळीत रॉकेट भरतो. रॉकेट अग्निबाणाप्रमाणे स्वयंचलित असते. त्याचा पल्ला १५० ते ९०० मी. पर्यंत असतो. हे अस्त्र १२० मिमी. जाडीचे पोलादी चिलखत भेदू शकते. बझूकाच्या मागील २० ते ३० मी. पर्यंतचे क्षेत्र वायुदाबामुळे प्राणघातक असते. म्हणून खुल्या ठिकाणीच बझूका वापरण्यात येते. बझूकाचा नेम अचून नसतो. बझूकाप्रमाणेच ग्रेट ब्रिटनने पियाट (प्रोजेक्टर इन्फ्रंट्री अँटि-टँक), जर्मनीने पँत्सरफाउस्ट व रशियाने आर-पी-जी हे रॉकेटक्षेपक तयार केले होते.
पहिल्या महायुध्दात अमेरिकेतील कर्नल गॉडर्ड याने रॉकेटक्षेपकाचे प्रयोग केले होते. १९१८ पर्यंत त्यांने ५० मिमी. ते ७५ मिमी. व्यासाच्या व १.६५ मी. लांबीच्या नळीतून २.५ ते २५ किग्रॅ. रॉकेटक्षेपणाची प्रात्याक्षिके केली. युध्दानंतर ते प्रयोग बंद झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये १९३९ साली चिलखतभेदी बॉईज रायफल प्रचारात आली परंतु ती परिणामकारक ठरली नाही. कर्नल गॉडर्डच्या अनुभवाचा फायदा घेऊन कर्नल स्कीनर, हिकमान, मूर व लेफ्टनंट उद्दल यांनी १९४१ च्या सुमारास पायदळाला उपयोगी असे रॉकेटनळी–क्षेपण तयार केले. याच प्रकारची रॉकेटक्षेपके इतर यूरोपीय देशांत १९४३ ते १९५० सालांत तयार झाली.
रेडिओ, रडार, वीज व इतर इलेक्ट्रॉनीय उपकरणे मार्गनिर्देशनासाठी उपलब्ध असल्यामुळे व क्षेपणास्त्रांत सुधारणा झाल्याचे बझूका व तत्सम अस्त्रे कालबाह्य होत आहेत. त्याऐवजी स्नॅपर, सॅगर, स्वॉटर, टो इ. २,००० ते ३,००० मी. पल्ल्याची, ताशी ३५० किमी. वेगाची, सैनिकांनी खांद्यावरून किंवा वाहनांतून नेण्यासारखी क्षेपकअस्त्रे अधिक परिणामकारक ठरतात. या आधुनिक अस्त्रांचा प्रभावमुळे रणगाडे निष्प्रभ ठरतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
पहा : तोफ व तोफखाना दारूगोळा रॉकेट क्षेपणास्त्रे.
संदर्भ : Braun, Wernher Von, Ordway, Frederick, I. History of Rocketry & Space Travel, New Jersey, 1967.
दीक्षित, हे. वि.
“