बझर्ड : फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील ॲक्सिपिट्रिडी कुलाच्या ब्युटिओनिनी उपकुलातील पक्ष्यांना बझर्ड असे म्हणतात. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ब्युटिओ ब्युटिओ असे आहे. ॲक्सिपिट्रिडी या कुलातील पक्ष्यांना सर्वसाधारणपणे गिधाड म्हणतात. भारतात यांच्या काळे गिधाड आणि बंगाली गिधाड या जाती सर्वत्र आढळतात [⟶गिधाड]. इंग्लंडमध्ये शिकऱ्यासमान दिसणाऱ्या ब्युटिओ वंशाच्या पक्ष्यांना बझर्ड म्हणतात. उत्तर अमेरिकेत कॅथार्टिडी कुलातील गिधाडासारख्या दिसणाऱ्या पक्ष्यांनाही बझर्ड म्हणून संबोधिले जाते व ब्युटिओ वंशाच्या पक्ष्यांना बझर्ड हॉक किंवा नुसते हॉक (शिकारा) असे म्हणतात. ब्युटिओ ब्युटिओ किंवा कॉमन बझर्ड ही जाती प्रसिध्द आहे व ती स्कँडिनेव्हियापासून भूमध्य समुद्रापर्यंत व यूरोप, आशिया आणि आफ्रिका या प्रदेशांतही आढळते. या पक्ष्यांच्या इतर जाती पृथ्वीवर उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळतात. हे पक्षी शरीराने भरभक्कम असतात व त्यांचे पंख लांब, चौकोनी व गोलसर टोकांचे असतात. त्याच्यात व गरूडात याबाबतीत बरेच साम्य आढळते पण याची चोच तळापासूनच वक्र असते आणि पायाच्या खालील भागावर पंख नसतात. बझर्ड पक्ष्यांची उडण्याची गती मंद असते पण ते अत्यंत सावध असतात. दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला करण्यापेक्षा जमिनीतील प्राणी लपून पकडणे व ते जास्त पसंत करतात. काही वेळा कुजके मांस किंवा वनस्पतींचाही ते खाद्य म्हणून उपयोग करतात. कॉमन बझर्ड पक्ष्यांच्या पंखांचा विस्तार १.५ मी. असतो. याच्या रूंद व विस्तारलेल्या पंखांमुळे उडत असताना ते इतर शिकारी पक्ष्यांपासून वेगळे असे ओळखू येतात. शिकार करताना ते तासन्तास आकाशात भराऱ्या मारतात. यांच्या पाठीवरील पंखांच्या रंग गडद तपकिरी, तर पोटावरील पंखांचा रंग पांढरा किंवा ठिपकेदार पांढरा असतो. उन्हाळ्यात स्कँडिनेव्हिया व जर्मनी येथे घरटी करणारे बझर्ड हिवाळ्यात पश्चिम यूरोपात जातात. स्कॉटलंड, वेल्स व पश्चिम इंग्लंड येथेही यांचे प्रजोत्पादन होते. कुंपन व झाडे असलेल्या शेतात हे राहतात. एका पायावर एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून ते भक्ष्याची टेहळणी करतात व उंदीर किंवा तत्सम एखादा प्राणी दिसला की, त्यावर झेप घेऊन तेथल्या तेथे त्यास गट्ट करतात. यांच्या आहारात मुख्यतेवेकरून छछुंदर (मोल), उंदीर, सरीसृप (सरपटणारे) व उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी आणि कीटक यांचा समावेश असतो. यामुळे अप्रत्यक्ष रीत्या हे पक्षी मानवास उपयुक्त आहेत.
बझर्ड आपले घरटे अत्यंत काळजीपूर्वक तयार करतो. हे घरटे झाडावर दोन फांद्यांच्या मध्ये असते. हे काटक्यांचे बनविलेले असून त्यात आतून हरिता, फर व इतर मऊ पदार्थाचे अस्तर असते. दरवेळी नवीन घरटे न बांधता पुष्कळ वेळा जुने घरटे दुरूस्त करून वापरले जाते.
नरमादीची जोडी मार्च एप्रिल या महिन्यात जमते. नंतर मादी २ ते ४ घालते. ही अंडी पांढरी असून त्यांवर तपकीरी ठिपके असतात. आळीपाळीने नर व मादी अंडी उबवितात. सुमारे एक महिन्याने अंड्यांतून पिले बाहेर येतात. पुढे काही महिने नरमादी पिलांना अन्न आणून देतात. पिले मोठी झाली की, स्वतंत्र जीवन जगू लागतात.
पहा : गिधाड, तीसा, शिकरा.
चंद्रराणा, प्रतिभा, न.