बगदाद रेल्वे : यूरोप, आशिया मायनर व मध्यपूर्वेकडील देश यांना लोहमार्गाने जोडणाऱ्या  प्रकल्पाचे नाव. तुर्कस्तानमधील इस्तंबूलपासून सुरू होणारा हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय लोहमार्ग इराकच्या बगदाद व पुढे बसरा या शहरांपर्यंत जातो. बगदाद लोहमार्ग हा इस्तंबूल–एस्किशहर–अंकरा–इनजेसू–नीदे–आलेप्पो–मोसूल–बगदाद–बसरा असा सु. २,६५० किमी. लांबीचा आहे. शाखीय व प्रत्यावर्ती लोहमार्ग यांच्या साहाय्याने बगदाद लोहमार्ग हा उत्तर इराण, रशिया, सिरिया, व इझ्राएल या देशांनाही जोडतो. ऑटोमन साम्राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरलेला हा प्रकल्प पहिल्या महायुध्दास तोंड लागेपर्यंतच्या प्रारंभीच्या काळात पूर्ण होईपर्यंत आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धा तीव्र झालेली होती कारण या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे यूरोप, मध्यपूर्वे व भारत यांना सांधणाऱ्या सागरी मार्गाची मक्तेदारी असलेल्या बड्या राष्ट्रांना (रशिया, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स) आघात पोहोचण्याची शक्यता होती.

तुर्कस्थानचा सुलतान दुसरा अब्दुल हमीद याने जर्मनीच्या डॉइश बँकेला १८८८ मध्ये हैदर पाशा ते इस्मिद हा पूर्वीचा प्रचलित लोहमार्ग अंकारापर्यंत वाढविण्याची सवलत दिली. या विस्तारित लोहमार्गाला ‘ॲनातोलियन लोहमार्ग’ असे नाव देण्यात आले. १८९५-९६ च्या दरम्यान अंकारापर्यंतचा लोहमार्ग तसेच एस्किशहर व कोन्या यांना जोडणारा दुसरा एक लोहमार्ग पुरा करण्यात आला. हळूहळू तुर्कस्तानमधील जर्मन प्रभाव वाढू लागला. रशियाला ऑटोमन साम्राज्य नष्ट करावयाचे होते ग्रेट ब्रिटनला इराणचे आखात  व भारतातील आपले साम्राज्य यांचे संरक्षण करावयाचे होते आणि फ्रान्स सिरियाच्या राजकारणात गुंतला होता. यामुळेच सुलतानला केवळ जर्मनी हे एकमेव राष्ट्र आपल्या देशाचा विकास करून देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकेल अशी खात्री वाटली. म्हणून सुलतानाने १९०२ मध्ये डॉइश बँकेला ॲनातोलियन लोहमार्ग बगदादपर्यंत वाढविण्याकरिता सवलती देऊ केल्या. अशा तऱ्हेने बगदाद रेल्वे प्रकल्प म्हणजे तुर्कस्तान-जर्मनी यांचा संयुक्त उपक्रमच ठरला. हा मार्ग १९०४ मध्ये बुलगुर्ल् हा शहरापर्यंत पूर्ण करण्यात आला. आर्थिक, राजकीय व तांत्रिक अडचणींमुळे (टॉरस पर्वतातून बोगदे खणण्याचे कार्य) लोहमार्गा बांधणीची प्रगती कूर्मगतीनेच होत होती. १९१२ पर्यंत लोहमार्गाचा युफ्रेटीसपर्यंतचा पूर्वभाग पूर्ण करण्यात आला.

प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनला बगदाद रेल्वे प्रकल्प म्हणजे आपल्या भारतातील साम्राज्याला मोठा धोका असल्याचे कळून चुकले. तुर्कस्तानमधील जर्मनीचा प्रभाव वाढत गेला आणि परिणामतः बगदाद रेल्वे प्रकल्प पहिल्या महायुध्दामागील एक स्फोटक कारण ठरले. तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने  युध्दात सहभागी झाल्यामुळे लोहमार्गाच्या बांधकामाने विलक्षण वेग घेतला. युध्दाला तोंड फुटले तेव्हा टॉरस पर्वतामधून बोगदे खणण्याचे काम चालूच होते.

डॉइश बँकेने ‘बगदादरेल्वे कंपनी’च्या वतीने बगदाद लोहमार्ग ग्रेट ब्रिटनच्या पूर्वसंमतीशिवाय बगदादच्या पुढे इराणच्या आखाताकडे वाढविला जाणार नसल्याचे आश्वासन देऊन ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि तुर्कस्तान यांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला.  फेब्रुवारी १९१४ मध्ये फ्रान्स व तुर्कस्तान या राष्ट्रांत करण्यात आलेल्या एका करारान्वये उत्तर ॲनातोलियामध्ये फ्रान्सला रेल्वे सवलती देण्यात आल्या. जून १९१४ मधील अशाच प्रकारच्या ग्रेट ब्रिटन  व जर्मनी यांच्यातील करारानुसार वसरा व इराणचे आखात यांमधील बगदाद रेल्वेचा भाग ग्रेट ब्रिटनच्या पूर्वसंमतीशिवाय बांधावयाचा नाही, असे ठरविण्यात आले त्याचप्रमाणे ग्रेट ब्रिटनला टायग्रिस व युफ्रेटिस नद्यांवरील नौवहन अधिकार देण्यात आले.

हा लोहमार्ग १९१८ च्या सुमारास बॉस्पोरस ते निसिबिन असा तयार झाला तथापि बगदादपर्यंतचा ४८५ किमी. लांबीचा मार्ग पूर्ण करावयाचा राहिला. पहिल्या महायुध्दानंतर घडून आलेल्या तुर्की क्रांतीमुळे तुर्कस्तानने जर्मनीला दिलेल्या पूर्वीच्या सवलती स्वतःकडे घेतल्या आणि ॲनातोलिया भागात ‘तुर्की राष्ट्रीय रेल्वे यंत्रणा’ निर्माण केली. सिरिया व इराक या देशांच्या शासनांनी बगदाद लोहमार्गाच्या आपापल्या प्रदेशातील भागाचे अपूर्ण काम आपल्या अंगावर घेऊन पूर्ण केले. काही काळाने हा लोहमार्ग बगदादपर्यंत पूर्ण करण्यात आला. त्यापुढे बगदाद ते बसरा (इराणच्या आखाताजवळील) असा लोहमार्गाचा विस्तार करण्यात आला. बगदाद लोहमार्गाचा अंतिम टप्पा १९४० मध्ये पूर्ण करण्यात आला. सांप्रत हा लोहमार्ग बॉस्पोरसला इराणच्या आखाताशी जोडतो. तथापि हवाई व इतर वाहतूक माध्यमांच्या सततच्या विकासामुळे बगदाद लोहमार्गासारख्या अत्यंत मोक्याच्या वाहतूक माध्यमाचे महत्त्व बरेचसे कमी झाले आहे.

संदर्भ : Wolf, B.The Diplomatle History of the Boghdad Railroad, New York, 1973. 

गद्रे,  वि. रा.