बकिलिडीझ : (सु. ५०५ –सु.४५० इ.स.पू.) ग्रीक भावकवी. जन्म कीऑस बेटावर. सिरक्यूसचा सत्ताधिश हाय्अरऑन पहिला (कार. ४७८-४६६ इ.स.पू.) ह्याच्या दरबाराला बकिलिडीझने भेट दिली असावी. ⇨कीऑसचा सायमॉनिडील्ल ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ग्रीक भावकवीचा बकिलिडीझ हा पुतण्या. तीन उद्देशिका लिहून ह्या सत्ताधिशाचा गौरव त्याने केला आहे. पपायरीवर लिहिलेल्या त्याच्या १९ कविता आज उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातं १४ क्रीडाविजयगीते असून ५ डिथिरॅम गीते (ग्रीक वृंदागीतांचा एक प्रकार) आहेत. ह्या डिथिरॅम गीतांपैकी एक पूर्णतः संवादात्मक आहे. ग्रीसमध्ये होणाऱ्या क्रीडास्पर्धांत विजयी होणाऱ्या विविध वीरांवर क्रीडाविजयगीते लिहिली जात. बकिलीडीझने आपल्या क्रीडाविजयगीतांतून अशा अनेक वीरांचा गौरव केलेला आहे .त्याच्या तल्लाख कल्पनाशक्तीचा आणि उत्कृष्ट निवेदनशैलीचा प्रत्यय त्याच्या कवितेतून येतो.

कुलकर्णी, अ. र.