बंगलोर विद्यापीठ : कर्नाटकातील एक विद्यापीठ. बंगलोर येथे १० जूलै १९६४ रोजी त्याची स्थापना झाली. विद्यापीठीय क्षेत्रात बंगलोर, तुमकूर आणि कोलार या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. त्याचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. विद्यापीठाच्या कक्षेत चार विद्यापीठीय महाविद्यालये, ९५ संलग्न महाविद्यालये तसेच विविध ज्ञानशाखांतील अध्यापन व संशोधन करणारे एकूण ३० विभाग आहेत. विद्यापीठाचे संविधान सर्वसाधारणपणे इतर विद्यापीठांच्या संविधानाप्रमाणे असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी विद्यापीठाची प्रशासन-व्यवस्था पाहतात.
विद्यापीठ क्षेत्रे दोन आहेत : (१) शहर क्षेत्र (सिटी कँपस) व (२) ज्ञानभारती क्षेत्र. पहिल्यात सेंट्रल कॉलेज, लॉ कॉलेज व विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा समावेश होतो. ज्ञानभारती क्षेत्र सु. ४०० हेक्टरांचे असून ते बंगलोर-म्हैसूर हमरस्त्यावर बंगलोरपासून १२ किमी. आहे. तेथे विद्यापीठाचे प्रमुख कार्यालय, मानव्यविद्या, भूविज्ञान, वास्तुकला, स्थापत्य अभियांत्रिकी इ. विभाग असून शारीरिक शिक्षण महाविद्यालयही आहे. याशिवाय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे वसतिगृह, अध्यापक व अध्यापकेतरांची निवासस्थाने उपहारगृह, दवाखाना, सहकारी भांडार इ. सुविधा या ठिकाणी आहेत. वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र विभाग थोड्या दिवसांतच ज्ञानभारती क्षेत्रात जातील. इतर विभागांचेही बांधकाम वेगाने सुरू आहे.
विद्यापीठात कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, शिक्षण, वैद्यक, तंत्रविद्या, दळणवळण, अभियांत्रिकी, मानसिक आरोग्य व तंत्रिकाविज्ञाने अशा विद्याशाखा आहेत. शैक्षणिक वर्ष (वैद्यक व शिक्षणशास्त्र विद्याशाखांखेरीज) सामान्यतः जून ते मार्च असे असते व त्यात दोन सत्रे असतात. विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम स्वीकारलेला असून त्याचे माध्यम इंग्रजी व कन्नड आहे. विद्यापीठातील विद्यार्थिसंख्या ५५,९८८ व अध्यापकसंख्या ३,५५६ (१९७९-८०) आहे.
विद्यापीठातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणार्थ १९७२ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यासाठी ५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे (१९७८-७९). या समितीतर्फे शहरात प्रशिक्षणकेंद्राचे आयोजन करण्यात येऊन पुस्तकपेढ्यांतर्फे मागासवर्गीय जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविली जातात. विद्यापीठीय महाविद्यालयात ‘कमवा आणि शिका’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना आढळते. या योजनेखाली गरीब होतकरू विद्यार्थ्यांना फावल्या वेळेत रोज दोन तास काम पुरविले जाते. नाताळाच्या सुटीतील अध्यापनवर्ग, पत्रद्वारा शिक्षण, सायंकाळचे अध्यापन व प्रशिक्षणवर्ग याचीही सोय विद्यापीठाने केलेली आहे.
विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी या विद्यापीठाने एक योजना तयार केली आहे. या योजनेनुसार २० विद्यार्थ्यांचा एक गट तयार करण्यात येतो. अशा प्रत्येक गटाचा एक प्रतिनिधी व प्रत्येक महाविद्यालयाचा एक प्रमुख प्रतिनिधी यांच्यातर्फे विद्यार्थ्याना सर्व बाबतींत मार्गदर्शन केले जाते.
विद्यापीठाचे एक रोजगार मार्गदर्शन केंद्र आहे. ते विद्यार्थ्यांना तांत्रिक, यांत्रिक व इतर प्रकारचे अभ्यासक्रम आणि स्पर्धापरीक्षा यांसंबंधी उपयुक्त साहित्य तसेच सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना अंशकालिक रोजगार उपलब्ध करून देते. विद्यापीठाचे स्वतंत्र आरोग्यकेंद्र असून ते विद्यार्थ्यांना विविध आरोग्यसेवा पुरविते. विद्यार्थि-विद्यार्थिनींची वसतिगृहे सुधारण्यासाठी विद्यापीठाने ८४,००० रुपयांची तरतूद केली आहे (१९७९-८०). क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस, बास्केटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो तसेच अनेक अंतर्गेही खेळांच्या बाबतीत विद्यापीठ खास सवलती देते. प्रस्तुत विद्यापीठ एक व्यायामशाळाही चालविते.
विद्यापीठाने विस्तार व्याख्याने, प्रकाशन व मुद्रणालय यांसाठी ‘प्रसरंग संचालनालया’ची स्थापना केली. कन्नड भाषेचा तुलनात्मक इतिहास हा दहा खंडांत प्रकाशित करावयाचे कार्य ह्या संचालनालयाने हाती घेतले असून त्यांपैकी तीन खंडांचे प्रकाशन झाले आहे (१९७६-७७). जागतिक अन्नपुरवठा योजनेद्वारा विद्यापीठातर्फे ५०० गरीब विद्यार्थ्यांना दररोज दुपारचे जेवण मोफत देण्यात येत असे.
विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात २,२६,५०२ ग्रंथ व १,०९९ नियतकालिके आहेत (१९७९-८०). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे २,०३,७६,३९९ रु. आणि १,९२,७९,७२६ रु. आहे..
मिसार, म. व्यं.