परीक्षापद्धति, शैक्षणिक : विद्यार्थ्यांनी कितपत ज्ञान संपादित केले, संपादित ज्ञानाचे उपयोजन त्यांना कितपत करता येते, प्राप्त केलेल्या क्रियाकौशल्यांचा त्यांना किती परिणामकारक रीतीने उपयोग करता येतो वा त्यांनी प्राप्त केलेल्या क्रियाकौशल्यांची गुणवत्ता किती आहे व तिचा किती परिणामकारक रीतीने उपयोग करता येतो इ. प्रश्नांची उत्तरे ज्या प्रक्रियेतून मिळतात, तिला शैक्षणिक परीक्षा असे स्थूलमानाने म्हणता येईल. नियत कालावधीत अध्ययन-अध्यापन पुरे झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. शिक्षणशास्त्रातील आधुनिक कल्पनांनुसार परीक्षापद्धतीत शिकणाऱ्‍याची अभ्यासातील प्रगती, शिकविणाऱ्‍याची अध्यापनपद्धती, अभ्यासक्रमाची योग्यायोग्यता, शिकणाऱ्‍याच्या अभ्यासाच्या सवयी, ज्या ठिकाणी अध्ययन-अध्यापन चालते. तेथील शिक्षणानुकूल वातावरण तसेच ज्या प्रशासनाखाली शिक्षण चालते, त्याची परिणामकारकता यांसारख्या सर्वच गोष्टींची गुणवत्ता जोखली जाते.

 स्थूल ऐतिहासिक आढावा : परीक्षापद्धतीला विशेष महत्त्व देऊन काटेकोरपणे तिचा उपयोग करणारा पहिला देश चीन होय. इ.स. पू. सातव्या शतकापासून तेथे परीक्षापद्धत चालू झाली आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत तीच पद्धत अव्याहत चालू होती. देशाच्या राज्यकारभारासाठी लायक व्यक्तींची निवड करणे, हा या परीक्षेचा हेतू होता. कनिष्ठ, मध्यम व वरिष्ठ अशा तीन चढत्या पातळ्यांवर क्रमशः ती घेतली जाई. कनिष्ठ पातळीवरील परीक्षा जिल्हास्तरांवर, तर वरिष्ठ परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होई. धर्मशास्त्रीय आणि काव्यशास्त्रीय विषयांवर निबंधरचना हाही परीक्षेचा महत्त्वाचा भाग असे. बुद्धिमान व्यक्तींची निवड करण्यावर भर असल्याने परीक्षांचे निर्णय कडक असत. त्यांना देण्यात येणाऱ्‍या पदव्या ‘बुद्धि-पुष्प’, ‘उत्तीर्ण पंडित’ आणि ‘प्रविष्ट पंडित’ या अर्थाच्या असत. प्रविष्ट पंडितांतून उच्च शासकीय अधिकारपदांसाठी व्यक्ती निवडल्या जात. शाही अकादमीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रविष्ट पंडितांनाही उच्चतम परीक्षा द्यावी लागे.

मध्ययुगीन युरोपमध्ये इटलीतील ⇨बोलोन्या विद्यापीठात विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी आपल्या विषयासंबंधी आपले शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी यांच्याशी वादविवाद करावा लागे, तटस्थ निरीक्षक त्या वादविवादाचे निरीक्षण करीत व त्यावरून विद्यार्थ्याला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय देत. हे निरीक्षक तिपाईवर (ट्रायपॉस) बसत असत. त्यावरून केंब्रिज विद्यापीठात दिल्या जाणाऱ्‍या पदव्यांना ‘ट्रायपॉस’’ म्हणण्याचा प्रघात पडला. सोळाव्या शतकात जेझुइट लोकांनी प्रथम तोंडी परीक्षेची पद्धत सुरू केली. इ. स. १५९९ मध्ये परीक्षा कशा घ्याव्यात, याबद्दल त्यांनी एक नियमावली तयार केली. १८३२ पर्यंत ती बदलण्यात आलेली नव्हती. या पद्धतीमध्ये पाठांतर व विद्यार्थ्यांमधील चढाओढ या गोष्टींवर भर दिलेला होता. सामान्यतः एकोणिसाव्या शतकात पश्चिमी विद्यापीठांतून औपचारिक परीक्षेस सुरुवात झाली.

प्राचीन भारतात परीक्षेची अशी तंत्रनिष्ठा व औपचारिक पद्धती नव्हती. गुरुगृही चालणाऱ्‍या अध्ययनात एक संथा पचनी पडली, की पुढची संथा मिळे. गुरुकुळात प्रत्यक्ष काम करून व्यावहारिक शिक्षण मिळे आणि सामाजिक विकासही घडे. जरा वरच्या स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा शलाकापद्धतीने घेतली जाई. म्हणजे ग्रंथात कोणतेही पान काडी घालून उघडावयाचे व त्या पानावरील भागाचे स्पष्टीकरण विद्यार्थाला करता आले पाहिजे, अशी अपेक्षा होती. साहित्यग्रंथांचा अर्थ लावताना व्याकरण, अलंकार, रस-ध्वनी इत्यादिंचेही विवरण करता आले पाहिजे, अशी अपेक्षा होती. विद्वत् -परिषदांत पंडितांची परीक्षा घेतली जाई. अध्ययनाची सखोलता, विवेचनाची स्पष्टता यांबरोबरच वक्तृत्व, वादकौशल्य, व्युत्पन्नमतित्व, समयचातुर्य इ. गुणही पारखले जात. भारतात विद्यापीठे निघाल्यावर ‘पारंगत’, ‘मयूरव’, ‘भास्कर’ इ. पदव्या (उपाधी) देण्याचीही पद्धती सुरू झाली. परीक्षांचे स्वरूप सर्वस्वी मौखिक होते.

एकोणिसाव्या शतकात जी शिक्षणपद्धती बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत रूढ झाली, तिच्यात श्रेणीबद्ध इयत्ताक्रम आणि वर्गपद्धती यांना महत्त्व आले. सामुदायिक अध्ययन, एकेका इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम व त्यामुळे सर्वांना समान परीक्षा या गोष्टी रूढ झाल्या. समान परीक्षा घ्यावयाला लेखी परीक्षांचे तंत्र सुलभ असल्याचे अनुभवास आले. वेळेची बचत हाही मोठाच फायदा होता. वर्षाअखेर विद्यार्थ्यांची सर्व विषयांची परीक्षा घ्यावयाची, काही ठराविक टक्के गुण मिळाले, की ते पुढील वर्गात जावयास पात्र म्हणजे उत्तीर्ण समजावयाचे, अशी ही पद्धत अगदी पहिल्या इयत्तेपासून पदवी परीक्षेपर्यंत सर्वत्र सारखीच तयार झाली. विद्यार्थ्यांना तीन तासांत सोडविता येतील, इतकेच प्रश्र द्यावयाचे असल्याने प्रश्रसंख्या मर्यादित झाली. प्रश्रांची उत्तरे निबंधात्मक स्वरूपात अपेक्षिली जात. ‘फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे सांगा’, किंवा ‘अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्धच्या लढ्याची कारणे देऊन परिणामांची चर्चा करा’, असे मोघम नि व्यापक स्वरूपाचे प्रश्र विचारले जात. ब्रिटिशांनी भारतात आपली शिक्षणपद्धती आणली, तेव्हा आपली परीक्षापद्धतीही आणली. हुशार विद्यार्थी निवडणे व त्यांना नोकऱ्‍या देणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट असल्याने परीक्षेत चढाओढीला महत्त्व आले आणि नोकरीशी सांगड बसली.

परीक्षापद्धतीची उद्दिष्टे : विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती तपासणे, हा परीक्षेचा प्रमुख हेतू असतो परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांला अभ्यासाची प्रेरणा लाभावी, पुष्कळ गुण आणि वरची श्रेणी मिळविण्यास त्याने प्रवृत्त व्हावे, अपयश आल्यास असे अपयश का आले, याचे त्याने आत्मसंशोधन करावे इ. हेतू परीक्षेतून साध्य होतात.

अध्यापनातील गुणदोष लक्षात येण्यासाठीही परीक्षापद्धतीचा उपयोग संभवतो. मुलांची बौद्धिक कुवत आणि पूर्वतयारी यांचा विचार करून अध्यापन करावे लागते. त्याचप्रमाणे सर्वच विषयांसाठी एकच अध्यापनपद्धती वापरून चालत नाही. तेव्हा अध्यापन परिणामकारक झाले आहे की नाही, हे परीक्षेच्या साहाय्याने कळू शकते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करणे, हा परीक्षेचा तिसरा हेतू. विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत, कल, अभिरुची इ. लक्षात घेऊन त्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणता व्यवसाय निवडावा यांचे मार्गदर्शन चाचणी घेऊन करता येते. 

विशिष्ट अभ्यासक्रमासाठी निवड करणे हा परीक्षांचा चौथा हेतू होय. उच्च अभ्यासक्रमसाठी जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी स्थिती असते. तेव्हा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करणे भाग असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे, हा परीक्षापद्धतीचाच एक घटक आहे. 


परीक्षांचे प्रकार : परीक्षेचा सर्वांत जुना प्रकार म्हणजे तोंडी परीक्षा होय. पाढे म्हणावयास सांगणे, कविता पाठ म्हणून घेणे, वाचन करावयास सांगणे, प्रश्र विचारणे इ. मार्गांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चाचणी घेतली जाते. उच्च परीक्षांच्या बाबतीत या तोंडी परीक्षेला परीक्षक व विद्यार्थी यांमधील चर्चेचे स्वरूप येते. मुलाखत ही एक प्रकारे तोंडी परीक्षाच असते. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन विद्यार्थी निवडताना मुलाखत घेतात. तोंडी परीक्षेतील गुण परीक्षकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणावर अवलंबून असल्याने ही पद्धत तितकीशी विश्वसनीय ठरत नाही. 

मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेण्यास लेखी परीक्षा उपयुक्त असते. त्यातही निबंधरूप परीक्षा आणि वस्तुनिष्ठ परीक्षा असे प्रकार आहेत. प्रश्नपत्रिका काढणे, तिच्या पुरेशा प्रती तयार करणे, परीक्षेच्या स्थानी त्या पाठविणे, त्या योग्य प्रकारे सुरक्षित ठेवणे व योग्य वेळी विद्यार्थ्यांना वाटणे, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एकत्र करणे, त्या तपासण्यासाठी पाठविणे व त्या तपासून आल्यानंतर निकालपत्रक तयार करणे  इ. गोष्टी लेखी परीक्षांच्या बाबतीत कराव्या लागतात. 

अनेक तांत्रिक, वैज्ञानिक विषयांत काही क्रियाकौशल्ये संपादणे हा हेतू असतो. उदा., सुतारकामात दिलेल्या नमुन्याप्रमाणे वस्तू करणे, वास्तुशिल्पात नमुने तयार करणे, विज्ञानात विविध प्रकारचे शास्त्रीय प्रयोग करणे. अशा विषयांसाठी लेखी आणि तोंंडी परीक्षेशिवाय  प्रयोगरूप (प्रॅक्टिकल) परीक्षा घेतल्या जातात. 

लेखी, तोंडी आणि प्रयोगरूप परिक्षांप्रमाणे कृतिसत्रातील वा चर्चासत्रातील सहभाग, निबंधवाचन, प्रबंधलेखन इ. मार्गांनीही परीक्षा घेतली जाते. 

परीक्षापद्धतीतील दोष व सुधारणा : इंग्लंड-अमेरिकेत या स्वरूपाची पद्धती रूढ व्हावयास लागल्यापासूनच टीकाकारांनी तिच्यातील दोषस्थळे नि दुर्बल स्थाने विविध दृष्टिकोणांतून दाखवावयास आरंभ केला. सर्व विद्यार्थ्यांची व्यक्तिगत कुवत, अभिरुची इ. लक्षात न घेता सर्वांना समान प्रश्र विचारणे, वर्षभरातल्या अध्ययनाचे अवघ्या तीन तासांत मोजमाप करणे, प्रश्नांचे स्वरूप संदिग्ध असणे, निबंधरचनात्मक कौशल्याला अतिरित्त्क महत्त्व देणे इ. दोष तर प्रमुख आहेतच. शिवाय, शिक्षणाच्या व्यापक ध्येयांशीही ती पद्धत सुसंगत नाही. ही परीक्षापद्धती केवळ बौद्धिक सामर्थ्याचीच चाचणी ठरते त्यातही स्मरणशक्तीचीच अधिक. विद्यार्थ्यांचा भावनात्मक विकास, सामाजिकता आणि मिळविलेल्या ज्ञानाच्या उपयोजनाचे कौशल्य यांचे मोजमाप केलेच जात नाही. निबंधात्मक उत्तरांची तपासणी ही सदोष असते. परीक्षकांच्या आवडीनिवडी, अभिरुची नि तपासण्याच्या वेळची मनःस्थिती यांचा तपासणीवर परिणाम होतो. इंग्लंडमध्ये हार टॉख समितीच्या ‘एक्झॅमिनेशन ऑफ एक्झॅमिनेशन्स’ या संशोधनात्मक अहवालात या सर्व दोषांची विस्ताराने चर्चा झाली. मानसशास्त्र व्यक्तिगत भिन्नतेवर भर देऊ लागले. अध्यापनाचे स्वरूप व्यक्तिसापेक्ष असावे, या दृष्टीने अध्यापनपद्धतीत सुधारणा होऊ लागल्या. लेविस टर्मन आणि अँल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापनाच्या कसोट्या निर्माण केल्या. या सर्वांचा संकलित परिणाम म्हणजे परीक्षापद्धती सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले.

भारतातही वेगवेगळ्या शैक्षणिक आयोगांनी परीक्षांंना देण्यात येणारे अतिरिक्त महत्त्व, त्यांच्यातील दोष, परीक्षानिष्ठेमुळे शिक्षणाचा घसरणारा दर्जा, येनकेनप्रकारेण वैध-अवैध मार्गांचा अवलंब करून उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र मिळवण्याची विद्यार्थ्यांची धडपड या सर्वांची चिकित्सा केली आहे. मुदलियार आयोगाने ही चर्चा विशेष तपशीलपूर्वक केली आहे. 

परीक्षापद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता ‘नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ व विद्यापीठ अनुदान मंडळ या संस्थांनी मान्य केली आहे. १९५७ मध्ये भारत सरकारने अमेरिकन शिक्षणतज्ञ डॉ. बेंजामिन ब्लूम यांची परीक्षांचे सल्लागार म्हणून नेमणूक केली. त्यांनीही भारतीय शिक्षणपद्धतीत व परीक्षापद्धतीत आमूलाग्र सुधारणा करावी, असा सल्ला दिला. 

परीक्षापद्धतीत सुधारणा करण्यात पुढील अडथळे आहेत : (१) अनेक शिक्षकांना व शिक्षणतज्ञांना प्रचलित परीक्षापद्धती ही आत्मनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) आहे, हे मान्य होत नाही आणि मान्य झालेच, तर नव्या पद्धतीत ही आत्मनिष्ठता जाईल हे पटत नाही. (२) रूढ परीक्षापद्धतीत अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांचा सुघारणांना विरोध आहे. (३) सध्याची परीक्षापद्धती बदलली, तर विद्यापीठ सध्या देत असलेल्या पदवीची किंमत कमी होईल, अशी भीती विद्यापीठचालकांना वाटते. 

या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील तत्त्वांच्या आधारे परीक्षा-सुधारणा कराव्यात, असे विद्यापीठ अनुदान मंडळाने सुचविले आहे : (१) ज्यांनी शिकवावयाचे, त्यांनीच परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा घेणे हा अध्यापनाचाच एक भाग समजला पाहिजे. (२) वर्षाअखेरीस एकदाच परीक्षा घेऊन त्या परीक्षेच्या आधारे निकाल न लावता वर्षभर आणि निरंतर परीक्षा घेणे चालू राहिले पाहिजे. तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके, निबंधलेखन, चर्चासत्रात सहभाग या सर्व पध्दतींच्या साहाय्याने विद्यार्थांच्या प्रगतीचे मूल्यमापन होत राहिले पाहिजे. (३) जर सत्राच्या अथवा वर्षाच्या शेवटी परीक्षा आवश्यक ठेवली, तर अशा परीक्षेस शंभर टक्के गुण ठेवू नयेत. वर्षभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जे निरीक्षण केले असेल वा चाचणी घेतली असेल, त्यासाठी चाळीस टक्क्यांपर्यत गुण राखून ठेवले पाहिजेत. (४) परीक्षांचा निकाल लावताना रूढ पद्धतीनुसार गुण व वर्ग (पहिला, दुसरा इ.) दिले जातात. परीक्षा घेण्याचे एकूण स्वरूप पाहता गुण देणे काही विद्यार्थांच्या बाबतीत अन्याय्य ठरण्याची शक्यता आहे. म्हणून विषयवार निकष ठरवून श्रेणी (ग्रेड्स) देण्यात याव्यात. (५) व्यावसायिक अभ्यासक्रमास अथवा स्पर्धात्मक अभ्यासक्रमास प्रवेश देताना वेगळी प्रवेश-परीक्षा घ्यावी व त्या परीक्षेतील गुण-श्रेणींप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. (६) अभ्यासक्रमात सत्रपद्धतीचा अवलंब करावा.

विद्यापीठ अनुदान मंडळाने देशातील बारा विद्यापीठांची परीक्षा-सुधारणांसाठी निवड केली असून महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ हे त्यांपैकी एक आहे. या बारा विद्यापीठांत १९७७-७८ या शैक्षणिक वर्षात सत्र-पद्धती आणि परीक्षा-सुधारणां झाल्या असून त्यांचे नेमके परिणाम कळण्यास किमान चार-पाच वर्षे लागतील.  

विद्यापीठ अनुदान मंडळाने असेही सुचविले आहे, की प्रत्येक विषयात आणि प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेच्या माध्यमात राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र परीक्षा घ्यावी. या परीक्षांचा दर्जा प्रथम-पदवी परीक्षेचा असावा. देशभर अभ्यासक्रम एकच असावा व ज्याची इच्छा असेल, त्या कोणाही प्रौढ व्यक्तीस या परीक्षेस बसण्याची मुभा असावी. विद्यापीठ अनुदान मंडळाची राष्ट्रीय परीक्षेची ही सूचना अद्याप अंमलात आलेली नाही. 

पहा : शिक्षणशास्त्र शैक्षणिक मूल्यमापन. 

संदर्भ :1. Govt. of India, University Grants Commission, Examination Reform: A Plan of Action, New Delhi, 1973.

    2. Govt. of india, University Grants Commission, Recommendations of Zonal Workshops on Examination Reforms, New Delhi, 1975.

अकोलकर, ग. वि. गोगटे, श्री.ब.